Home शैक्षणिक मुंडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

मुंडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

Spread the love

मुंडे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन


(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)

मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षांतर्गत रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र विभागाच्यावतीने दि. 28 व 29 एप्रिल 2025 रोजी ऑनलाईन/आभासी पध्दतीने ‘‘शाश्वत विकासासाठी रासायनिक आणि भौतिक विज्ञानातील समतोल’’ या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून युएई विद्यापीठ, युएई येथील प्रा. डॉ. जफर सईद हे उपस्थित राहणार आहेत, तर कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष म्हणून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व भारत सरकारच्या विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या जमाती विकास व कल्याण मंडळाचे माजी अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा इदाते हे उपस्थित राहणार आहेत.

सदर परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या अध्यक्षा सौ. संपदाताई पारकर यांच्या हस्ते होणार आहे तर डॉ. अकबर इनामदार, डॉ. रविंद्र बुलाखे (दक्षिण कोरिया), डॉ. शिवाजी मारकड (युएसए), प्रा. डॉ. नंदकिशोर चंदन, डॉ. अनिल पालवे, डॉ. रमेश देवकाते, डॉ. भिमराव खाडे हे तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘‘शाश्वत विकासासाठी रासायनिक आणि भौतिक विज्ञानातील समतोल’’ या आंतरराष्ट्रीय ई-परिषदेमध्ये देशातील व देशाबाहेरील रासायनिक आणि भौतिक विज्ञानातील विविध विषयांतील शिक्षणतज्ज्ञ तसेच नवोदित शास्त्रज्ञ आणि संशोधक विद्यार्थ्यांशी संवाद साधण्यासाठी या ई-परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांचे संशोधन कार्य जगासमोर सादर करण्याची संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने रसायनशास्त्र व भौतिकशास्त्र या अभ्यासशाखेतील संशोधन क्षेत्र हा परिषदेचा प्रमुख विषय असणार आहे.

रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील शाश्वतता म्हणजेच पर्यावरणाचे रक्षण करणारे, संसाधनाचे संवर्धन करणारे आणि दिर्घकालीन पर्यावरणीय समतोलनाला समर्थन देणा-या वैज्ञानिक तत्वांचा आणि तंत्रज्ञानाचा विकास व वापर होय. हवामान बदल, प्रदूषण आणि संसाधनांचा -हास यासारख्या जागतिक आव्हानांना तोंड देण्यासाठी दोन्ही विषय योगदान देतात. स्वच्छ, सुरक्षित आणि अधिक लवचिक भविष्य घडविण्यासाठी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातील शाश्वत पध्दती महत्वाच्या आहेत. हाच या परिषद घेण्यामागील उद्देश आहे.

सदर परिषदेसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी, अभ्यासक उपस्थित राहणार आहेत. तरी या परिषदेस मंडणगड तालुक्यातील व परिसरातील जाणकारांनी उपस्थित राहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहूल जाधव व उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी केले आहे. परिषद यशस्वी होण्यासाठी संयोजन समितीचे संयोजक डॉ. सूरज बुलाखे, सहसंयोजक प्रा. संदीप निर्वाण, आयोजन सचिव डॉ. मुकेश कदम, समन्वयक प्रा. शरिफ काझी, डॉ. भरतकुमार सोलापुरे, डॉ. महेश कुलकर्णी, ग्रंथपाल डॉ. दगडू जगताप हे प्रयत्न करत आहेत.

Related Posts

Leave a Comment