कबुतरखाने मुंबईकरांच्या जिवावर उठले- फुप्फुसाच्या आजाराचे रुग्ण तब्बल पाच पट वाढले
(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)
कबुतरांना सतत खाऊ घालण्याचे पुण्यकर्म पदरी पाडून घेताना आपण माणसांचा जीव घेत आहोत याचे भान सुटले आणि पारंपरिक कबुतरखान्यासह अनेक भागांत नवे कबूतरखानेही उदयास येत या पक्ष्यांची संख्या वाढली आणि मुंबईकरांच्या ती आता जिवावर उठलेली दिसते.
मुंबईत कबुतरांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली असून त्यांच्यासोबतच हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीस या फुप्फुसाच्या जीवघेण्या आजाराचे रुग्णही तब्बल पाच पट वाढले आहेत.
पोट भरण्यासाठी मुंबईच्या कबुतरांना कुठेही जावे लागत नाही. त्यांचे दाणा- पाणी घेऊन मुंबईकरच त्यांच्या सेवेत हजर असतात. ही कबुतरे दिवसभर खातात आणि घाण करत राहतात. त्यांचे सतत फडफडणे आणि घाण करणे यातूनच हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीस हा फुप्फुसाचा फोफावतो आहे. कबुतरांच्या घाणीशी किंवा पिसांशी संपर्क आल्याने हा रोग होतो. वेळेवर उपचार घेतला नाही तर फुप्फुस कायमचे निकामी होते. या रुग्णांच्या फुप्फुसांवर अक्षरशः ओरखडे ( स्कार्स) पडतात. हे ओरखडे बरे करणे अत्यंत अवघड आहे. फुप्फुस बदलून टाकणे हा एकमेव पर्याय डॉक्टरांच्या हाती उरतो. या दरम्यान, रुग्णाला २४ तास ऑक्सिजनवर ठेवावे लागते.
गेल्या काही दिवसांत मुंबईत या आजाराचे रुग्ण वाढले आणि फुप्फुस विकार तज्ज्ञांनी या वाढत्या संख्येचा संबंध थेट वाढत्या कबुतरांशी जोडला. गेल्या सात ते नऊ वर्षांत मुंबईत हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीसच्या रुग्णांमध्ये पाचपट वाढ झाली असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञ सांगतात. हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीसचे प्रमाण वाढून क्रोनिक हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीस किंवा पलमोनरी फायब्रोसीस हे विकार होतात. हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीस हा इम्युन सिस्टिमशी संबंधित आजार आहे. ऑरगॅनिक अँण्टीजेन्स किंवा कमी वजनाचे वेट कॉम्पोनन्ट्स श्वसनाद्वारे शरीरात गेल्याने हा विकार होतो. सुमारे दशकभरापूर्वी कबुतरखाना स्वच्छ करणारे कर्मचारी, पक्ष्यांना खाऊ घालणारे नागरिक, बर्ड फिडिंग पॉईंटच्या शेजारी राहणारे लोक किंवा व्हेटर्नरी क्षेत्राशी संबंधित लोकांना हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीस व्हायचा. परंतु, आता मुंबईच्या जवळपास सर्वच भागांतील रहिवाशांमध्ये या विकाराची लक्षणे दिसून येत आहेत.
हिंदुजा हॉस्पिटलचे कन्सल्टंट पुलमोनॉलॉजिस्ट आणि इपिडेमिओलॉजिस्ट डॉ. लान्सलॉट पिंटो यांच्या मते यापूर्वी एका महिन्यात एक ते दोन रुग्ण हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीसचे येत. आता एका आठवड्यातच तीन ते चार रुग्ण येत आहेत. या रुग्णांच्या घराच्या बाल्कनीत किंवा शेजारी कबुतरांचे वास्तव्य असल्याचे पहिल्या भेटीतच लक्षात आले.
दी इंडियन चेस्ट सोसायटीने अलीकडेच केलेल्या सर्वेक्षणात मुंबईतील विविध २३ दवाखान्यांमध्ये ११०० नमुने गोळा करण्यात आले. त्या रुग्णांना झालेल्या इंटरस्टिटिअल लंग्ज विकारात हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीस एक प्रमुख आजार दिसला. हायपर सेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीसच्या जवळपास सर्व प्रकरणांमध्ये घराच्या बाल्कनीत किंवा शेजारी कबुतरांचे अस्तित्व कारणीभूत असल्याचेही लक्षात आले.
कबुतरांच्या घाणीतूनच मुंबईत हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूमनायटीस वाढला. कबुतरांची घाण अत्यंत ॲसिडिक असते. त्यातील केमिकल्स वातावरणात लगेच पसरतात. या केमिकल्समुळे दम्याच्या रुग्णांना दम्याचे अटॅक येऊ शकतात. तसेच खोकलाही येऊ शकतो. हायपरसेन्सिटिव्हिटी न्यूनायटीस हा इम्यून सिस्टिमचा डिस्ऑर्डर आहे. त्याचा तुमच्या फुप्फुसांवर परिणाम होतो.
पक्ष्यांची घाण, पिसं किंवा जनावरांच्या कातडीशी संबंधित वातावरणात श्वास घेतल्याने होतो. फुप्फुसांमध्ये अल्प किंवा दीर्घ स्वरुपाचे इन्फेमेशन होऊ शकते. वेळेवर उपचार न घेतल्यास फुप्फुसे कायमस्वरुपी निकामी होऊ शकतात.