मुंडे महाविद्यालयात ‘अर्थसंकल्प 2022-23’ वर चर्चासत्र संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व अर्थशास्त्र विभागाच्या वतीने नुकतेच ‘ अर्थसंकल्प 2022- 23’ वर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग उपस्थित होता.
यामध्ये सुरुवातील केद्रीय अर्थसंकल्पाचे थेट प्रक्षेपण दाखविण्यात आले. त्यानंतर डॉ. भरतकुमार सोलापुरे यांनी अर्थसंकल्पातील विविध तरतुदींवर व कर रचनेवर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. यामध्ये प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष करामध्ये झालेले बदल त्याचा उत्पन्नावर होणारा परिणाम, कराच्या अभ्यासाचे सर्व घटकांसाठी महत्व, प्रत्येक रुपयाचे आय आणि व्ययाच्या रुपात अर्थसंकल्पात होणारे विश्लेषण इत्यादी संबंधितीची माहिती सर्व घटकांना अतिशय उपयुक्तरित्या आणि सरळ साध्या भाषेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
सदर अर्थसंकल्पीय चर्चेमध्ये उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, डॉ. राम देवरे, डॉ. भरतकुमार सोलापूरे, डॉ. अशोक साळुंखे, प्रा. संजयकुमार इंगोले, डॉ. शामराव वाघमारे, डॉ. विष्णू जायभाये, डॉ. पुरुषोत्तम पिलगुलवार आदींनी अर्थसंकल्प चर्चेमध्ये सहभाग घेतला.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना प्राचार्य डॉ. राहूल जाधव म्हणाले की, सरकारचा अर्थसंकल्प थेट जनतेशी संबंधीत असतो, त्यातील तरतुदींचा थेट लाभ होतो तर कर आकारणीमुळे जनतेवर थेट भार पडतो. त्यामुळे अर्थसंकल्पाविषयी समाजामध्ये जागरुकता निर्माण होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने अर्थसंकल्पाच्या सादरीकरणाचे थेट प्रक्षेपण त्याच वेळी त्याचे विश्लेषण करण्याचा अर्थशास्त्र विभागाचा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी नमुद केले.
सदर चर्चासत्राच्या शेवटी उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर यांनी उपस्थितांचे आभार मानले.