मराठी विकिपीडिया अधिकाधिक समृद्ध करूया- डॉ. राजेश राजम
(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)
‘‘विकिपीडिया” हा एक मुक्त ज्ञानकोश व माहितीचा स्त्रोत असून त्यावरील मराठी नोंदींचे लेखन करून मराठी विकिपीडिया समृद्ध करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे’ असे प्रतिपादन आय. सी. एस. महाविद्यालय, खेड येथील ग्रंथपाल डॉ. राजेश राजम यांनी केले. ते सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष विभागाअंतर्गत मराठी वाङ्मय मंडळ आयोजित ‘‘मराठी भाषा गौरव दिना निमित्त ‘‘विकिपिडियावरील मराठी नोंदींचे लेखन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत बोलत होते.कार्यशाळेचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मराठी विभागप्रमुख प्रा. संजयकुमार इंगोले यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करुन प्रास्ताविकात सदर कार्यषाळेचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर डॉ. संगीता घाडगे यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करुन दिली.
डॉ. राजेश राजम यांनी सांगितले की, इंग्रजी किंवा अन्य भारतीय भाषाच्या तुलनेत विकिपीडियावरील मराठी भाषेतील लेखांचे प्रमाण अत्यल्प आहे. मराठी ही आपली मातृभाषा असून प्रत्येकाने यावर विविध अंगांनी लेखन व संपादन करून त्यामध्ये अधिकाधिक भर घातली पाहिजे. यासाठी प्रथम विकिपीडियावर स्वतःचे खाते उघडावे व नवीन लेखन तसेच उपलब्ध माहितीमध्ये आपल्यापरीने संपादन करून आपले योगदान द्यावे व आपली माहिती इंटरनेटवर प्रकाशित करावी. मात्र आपले लेखन एकांगी असू नये याचीही दक्षता घ्यावी. विकिपीडियावर अत्यंत चांगल्या प्रकारची माहितीही उपलब्ध असल्याने प्रत्येकाने त्याचा वापर करावा असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी पीपीटीच्या माध्यमातून व इंटरनेटच्या सहाय्याने विकिपीडियावर खाते उघडणे व त्यावर नोंदी करण्याबाबतचे प्रात्यक्षिक दाखविले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर म्हणाले की, जागतिक पातळीवर मराठी भाषेचा प्रचार व प्रसार होण्यासाठी मराठी भाषा जगली पाहिजे, आज संगणक व मोबाईल सारखी साधने मराठी भाषेतून वापरणे सहज शक्य आहे. परंतु आपल्या अज्ञानामुळे किंवा आळसामुळे आपण या साधनांचा मराठी भाषेतून वापर करत नाही. संगणक व इतर तांत्रिक क्षेत्रात मराठी भाषेचा वापर वाढला तर मराठी भाषा माहितीची व ज्ञानाची होईल. इतर भाषाचा व्देश न करता आपण आपल्या भाषेच्या वापराचा आग्रह धरला पाहिजे, त्याकरिता आपण सार्वांनी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यानिमित्ताने महाविद्यालयात सकाळी ठीक 8.30 वाजता राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. तांत्रिक सहाय्यक म्हणून प्रा. सुरज बुलाखे व डॉ. महेश कुलकर्णी यांनी काम पाहिले.
सदर कार्यशाळेस शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग मोठया संख्येने सहभागी झाले होते. प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. संजयकुमार इंगोले, डॉ. धनपाल कांबळे, ग्रंथपाल दगडू जगताप, प्रा. सुरज बुलाखे, डॉ. महेश कुलकर्णी यांनी या उपक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी तर आभार डॉ. अशोक साळुंखे यांनी मानले.