ध्येय ठरवून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळविता येते- डॉ. भरतकुमार सोलापुरे
(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रामार्फत ‘एमपीएससी व युपीएससी अभ्यासक्रम’ या विषयावर व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
मार्गदर्शक म्हणून याच महाविद्यालयातील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे समन्वयक डॉ. भरतकुमार सोलापुरे हे लाभले होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहूल जाधव होते. यावेळी आय. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. शामराव वाघमारे, स्पर्धा परीक्षा विभागाचे प्रा. संदीप निर्वाण, डॉ. शैलेश भैसारे, ग्रंथपाल दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.
सुरुवातीला प्राचार्य डॉ. राहूल जाधव यांच्या हस्ते मार्गदर्शक डॉ. भरतकुमार सोलापुरे यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले तत्पूर्वी डॉ. शैलेश भैसारे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला.
प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना डॉ. भरतकुमार सोलापुरे म्हणाले की, ध्येय ठरवून वाटचाल केल्यास यश निश्चित मिळविता येते. आज सर्वच क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे. एम. पी. एस. सी., बॅंकिंग परीक्षेचे स्वरुप बदलेले असून त्याचप्रमाणे विद्याथ्र्यांनी अभ्यास करणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाबरोरच इतर अवांतर वाचनावरही भर देणे गरजेचे आहे. विविध स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी आतापासूनच तयारी करणे महत्वाचे असून आजच्या युगात शिक्षणानाबरोबरच व्यावसायिक शिक्षणाचीही नितांत गरज आहे.
विद्यार्थ्यानी आपला आत्मविश्वास वाढविण्यासाठी व्यवसायाभिमुख शिक्षणाकडे वळले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यानी आपल्या विचाराची कक्षा वाढविली पाहिजे. ग्रंथालयामधील विविध संदर्भ साधनाचा उपयोग विद्यार्थ्यानी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शैलेश भैसारे यांनी तर आभार ग्रंथपाल दगडू जगताप यांनी मानले.