तळवली प्रशाले मध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा शुभेच्छा कार्यक्रम संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ नवी मुंबई- मंगेश जाधव)
न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवली या प्रशालेतील शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील इ. १०वी च्या विद्यार्थ्यांना SSC बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा देण्यासाठी आयोजित कार्यक्रम उत्साहात पार पडला.
प्रारंभी मुख्याध्यापक श्री बसवंत थरकार सर यांनी पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीचे संचालक श्री रत्नाकर आग्रे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री प्रदीप चव्हाण यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. प्रास्ताविक श्री गुरसळे सर यांनी केले. त्या नंतर इ.९वी च्या विद्यार्थ्यांनी इ. १०वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
इ.१०वी च्या विद्यार्थ्यांनी सुंदर शब्दांत आपली मनोगते व्यक्त केली. जेष्ठ शिक्षक श्री वैद्य सर, श्री कचरे सर, सौ.नाईक मॅडम, श्री कुळे सर, श्री गवळी सर, श्री केळस्कर सर, सौ कांबळे मॅडम यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री प्रदीप चव्हाण यांनी विद्यार्थी विद्यार्थिनी व शिक्षकांचे कौतुक केले तसेच संपूर्ण वेळ अभ्यासासाठी घालवावा असे सांगून परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. संचालक श्री रत्नाकर आग्रे यांनी मनोगतातून स्वानुभव कथन करुन विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. संस्थेचे सहसचिव श्री मंगेश जोशी तसेच तळवली गट विकास मंडळाचे अध्यक्ष श्री विनायक मुळे यांनी विद्यार्थ्यांना मोबाईलवरुन शुभेच्छा कळविल्या.
या प्रसंगी मुख्याध्यापक श्री बसवंत थरकार यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी परीक्षा काळात घ्यावयाची खबरदारी या विषयी माहिती दिली. तसेच काॅपिमुक्त, भयमुक्त वातावरणात परीक्षा पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे सांगितले. दहावी नंतर आपल्याच कनिष्ठ महाविद्यालयात अकरावी कला व वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यावा, असे आवाहन केले.
श्री साळुंके सर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्रदर्शन श्री देवरुखकर सर यांनी केले. इ. ९वी च्या विद्यार्थ्यांकडून सर्वांना अल्पोपहार देण्यात आला. ग्रुप फोटो नंतर कार्यक्रमाचा समारोप झाला.