उमराठ नं. १ शाळेतील उपशिक्षिका प्रियांका कीर यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ संपन्न
(दिशा महाराष्ट्राची / गुहागर- उदय दणदणे)
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली गुहागर तालुक्यातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळांमधून अध्यापनाचे धडे शिकवत वयाच्या ५८ व्या वर्षी उमराठ शाळा नं. १ च्या उपशिक्षिका प्रियांका विलास कीर मॅडम नुकत्याच ३१ जानेवारी- २०२३ रोजी नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्या. पेशाने शिक्षिका असलेल्या प्रियांका कीर यांची एकूण ३७ वर्षे ५ महिने शिक्षिका म्हणून संपूर्ण सेवा झाली. गुहागर तालुक्यातील पालशेत हे त्यांचे मुळ गाव. त्यांचा स्वभाव शांत, प्रेमळ, मनमिळावू, परोपकारी व शिस्तप्रिय, स्वच्छताप्रिय असल्यामुळे त्या जेथे जेथे शाळेत कार्यरत होत्या तेथे तेथे त्या विद्यार्थ्यांच्या कर्तव्यदक्ष आवडत्या शिक्षिका म्हणून नावलौकिकाने प्रसिद्ध होत्या.
प्रियांका कीर यांचा सेवानिवृत्ती निमित्त निरोप समारंभ उमराठ शाळा नं. १ येथे ३१ जानेवारी २०२३ रोजी आयोजित करण्यात आला होता. दुर्मिळ योगायोग जुळून यावा असा एकाच दिवशी त्यांचा वाढदिवस आणि सेवानिवृत्तीचा दिवस होता. असा दुर्मिळ योग क्वचितच एकाद्याच्या भाग्याला येतो. त्या दिवशी अर्थातच त्यांच्या कुटुंबीयांनी (पतीने) आणलेला केक तसेच पालकवर्ग आणि शाळेतील शिक्षकवृंद यांनी सुद्धा आणलेला केक असे दोन केक त्यांच्या हस्ते कापून मोठ्या दिमाखात वाढदिवस सुद्धा साजरा करण्यात आला.
सदर समारंभास ग्रामपंचायत उमराठचे सरपंच जनार्दन आंबेकर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष वसंत कदम, माजी अध्यक्ष संदीप गोरिवले तसेच बहुसंख्य ग्रामस्थ महिला व पुरुष मंडळी उपस्थित होते. त्याचबरोबर प्रियांका कीर यांचे पती विलासराव कीर आणि कुटुंबीय मंडळी उपस्थित होती.
या समारंभात सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या हस्ते प्रियांका कीर मॅडम यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तर विद्यार्थी पालकवर्ग व शाळेतील शिक्षकवृद यांच्याकडून विद्येची देवता सरस्वती देवीची मूर्ती स्मृतीचिन्ह म्हणून देऊन त्यांना गौरविण्यात आले. तर प्रियांका कीर यांनी सुद्धा शाळेला आठवण भेटवस्तू म्हणून स्पिकर हॅंड सेट दिला. खुर्द उमराठच्या पोलीस पाटील वासंती आंबेकर यांनी आदर्श शिक्षिका प्रियांका कीर मॅडम यांच्या जीवनावर रचलेली कवितेची ध्वनीफित तसेच नोकरी निमित्ताने पुण्याला असणारी त्यांची सुकन्या सदर कार्यक्रमाला येऊ शकली नाही परंतु तिने आईच्या आठवणी व गुणगौरवांची पाठवलेली ध्वनीफित, या दोन्ही ध्वनीफित या समारंभाचे खास आकर्षण ठरले.
यावेळी सरपंच जनार्दन आंबेकर यांच्या सह उपस्थित सर्वच मान्यवरांनी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षिका प्रियांका कीर मॅडम यांच्या सेवा कार्याचा गौरव करून भावी आयुष्य सुखसमृद्धीचे, निरोगी, निरामय दिर्घायुष्य लाभो अशा शुभेच्छा दिल्या. शाळेतील विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त करताना मॅडमनी आम्हाला कसे घडवले याबाबत विवेचन करून आदर व्यक्त केला. यावेळी विद्यार्थ्यी सुद्धा भावनिक झाले होते. शाळेचे मुख्याध्यापक प्रदिप रामाणे सर, अनिल अवेरे सर तसेच शिक्षिका सायली पालशेतकर यांनी सुद्धा सेवाकाळातील अनेक आठवणींना उजाळा देत आपल्या सहकारी शिक्षिका प्रियांका कीर मॅडम यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर निरोप समारंभात आपले मनोगत व्यक्त करताना प्रियांका कीर मॅडम भावनावश झालेल्या होत्या. त्यांनी सुद्धा आपले सेवाकाळातील अनेक अनुभव सांगून मिळालेल्या सहकार्या बद्दल सर्वांचे आभार मानले.