Home ताज्या बातम्या सेन्सेक्सची तीन दिवसांनंतर ८४७ अंकांनी उसळी

सेन्सेक्सची तीन दिवसांनंतर ८४७ अंकांनी उसळी

Spread the love

सेन्सेक्सची तीन दिवसांनंतर ८४७ अंकांनी उसळी

 


(दिशा महाराष्ट्राची / मुंबई- गुरुदत्त वाकदेकर)


 

नववर्षाच्या पहिल्या आठवड्यात मागील तीन दिवसांच्या घसरणीनंतर भारतीय शेअर बाजारात आठवड्याच्या पहिल्या दिवशी सोमवारी गुंतवणूकदारांचा खरेदीचा उत्साह दिसून आला. जागतिक बाजारातील सकारात्मक व्यवहारामुळे दोन्ही निर्देशांक १ टक्क्यांहून अधिक वधारले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८४७ अंकांनी उसळला. तर, निफ्टी २४२ अंकांनी वधारला. रिलायन्स इंडस्ट्रीज आणि आयटी कंपन्यांच्या समभागांची जोरदार खरेदी झाली.

सेन्सेक्स सोमवारी ८४६. ९४ अंकांनी उसळून ६०,७४७.३१ वर बंद झाला. दिवसभरात तो ९८९.०४ अंकांनी उसळून ६०,८८९.४१ ही कमाल पातळी गाठली होती. तर, राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी २४१.७५ अंकांनी वधारून १८,१०१.२० वर बंद झाला.

सेन्सेक्स वर्गवारीत महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, एचसीएल टेक्नॉलॉजीज, इंडसइंड बँक, टीसीएस, भारती एअरटेल, टेक महिंद्रा, विप्रो, इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि अक्सीस बँक यांच्या समभागात वाढ झाली. टीसीएसचा तिमाही वित्तीय निकाल जाहीर होण्याच्या पार्श्वभूमीवर कंपनीच्या समभागांची जोरदार खरेदी झाली. तर टायटन, बजाज फिनसर्व आणि मारुतीच्या समभागात घसरण झाली.

आशियाई बाजारात सेऊल, शांघायमध्ये वाढ तर युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत सकारात्मक व्यवहार सुरू होते. तर आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड २.६७ टक्के वधारून प्रति बॅरल दर ८०.६७ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी शुक्रवारी २,९०२.४६ कोटींच्या समभागांची विक्री केली, अशी माहिती शेअर बाजाराने दिली.

भारतीय रुपया ८२.७२ च्या आधीच्या बंदच्या तुलनेत प्रति डॉलर ८२.३७ वर बंद झाला.

Related Posts

Leave a Comment