राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न
(दिशा महाराष्ट्राची / पुणे- गुरुदत्त वाकदेकर)
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने आयोजित केलेला राज्यस्तरीय महाविद्यालयीन नियतकालिक स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळा डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध पुणे येथे मोठ्या उत्साहात पार पडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, औंध पुणे ‘अक्षरकिमया’ ह्या नियतकालिकेला चव्हाण सेंटरचा तृतीय क्रमांकाचा हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
जेव्हा सगळं जग बंद होतं त्या वेळी आपल्या महाविद्यालयाने अक्षर किमया केली आहे. महिलांसाठीचे हजारो वर्षांचं लॉकडाऊन सावित्रीमाईंनी अनलॉक केले. आपल्या सर्व महिलांसाठी, ज्या ज्या महापुरुषांनी, महामातांनी आपल्यासाठी करून ठेवलं आहे त्यांना आपण नेहमीच सांभाळून ठेवलं पाहिजे. कुठलाही पुरस्कार आपल्याला एकत्रित आणत नाही, आणतात ती अक्षरं! अक्षरं कारागृहाना भेदून जातात हे आपल्याला माहिती आहे आणि हे समर्पित आहे त्या भगतसिंगला ज्याने युवा असतानाच देशाला आपलं जीवन वाहिलं.
आज आपण जिवंत आहोत का हा विचार करणं गरजेचं आहे, कधी स्वतःशी बोलणं पण गरजेचं आहे, ‘क्या कहेंगे लोग’ हा आपला सर्वात मोठा रोग आहे आणि हा रोग संपवायचं काम अक्षर करतात. असं कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, लेखक व विचारवंत मा. डॉ. श्रीरंजन आवटे उपस्थितांना मार्गदर्शन करतांना म्हणाले.
याच विषयाला अनुसरून रयत शिक्षण संस्था आणि यशवंतराव चव्हाण सेंटर असे परिवार एकत्रित यायला पाहिजेत आणि समानतेचा, अक्षराचे कुटुंब वाढले पाहिजे, अक्षराची किमया हे नाव खूपच सार्थक आहे आणि ह्या अक्षराची किमया ही अशीच वाढली पहिजे, असे यशवंतराव चव्हाण सेंटरचे दत्ता बाळसराफ यांनी उपस्थितांशी संवाद साधताना म्हणाले.
यशवंतराव चव्हाण सेंटर तर्फे देण्यात आलेला पुरस्कार हा खुप मोलाचा आहे आणि त्यातून पुरस्कार सोहळा त्याच महाविद्यालयामध्ये जाऊन प्रदान केला जातो ह्यातून युवांना अधिक उत्साह व प्रेरणा मिळते, असं कार्यक्रमाचे अध्यक्ष व महाविद्यालयाचे प्राचार्य मा. डॉ. अरुण आंधळे म्हणाले.
या कार्यक्रमात यशवंतराव चव्हाण सेंटरचे उद्देश आणि संपूर्ण महाराष्ट्रात राबविण्यात येणाऱ्या तसेच युवा विभागाच्या वतीने चालविण्यात येणारे उपक्रम युवा विभागाचे प्रमुख संतोष मेकाले यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. प्रभंजन चव्हाण ह्यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रगीताच्या सामूहिक गायनाने या कार्यक्रमाची सांगता झाली.