गुहागर आगाराच्या जुन्या गाड्या माथी मारू नये नवीन गाड्या मिळाव्यात- प्रवाशी संघटनेचा प्रशासनाला इशारा
दिशा महाराष्ट्राची/ गुहागर (संदेश कदम) –
गुहागर आगारात लालपरी गाड्या कमी आहेत त्यामुळे प्रवाशी वर्ग व शालेय विद्यार्थी व व्यापारी यांना मोठा फटका बसत आहे. गुहागर आगाराला दापोली येथून दोन जुन्या गाड्या देण्यात आल्या आहेत. पुन्हा जुन्या गाड्या देण्याचा घाट सुरु आहे. मात्र आमचे गुहागर आगाराला किमान पंचवीस गाड्यांची गरज आहे व त्या नवीन गाड्या मिळाव्यात अशी आमची मागणी आहे. तसेच असगोली रूटला मिनी बस मिळावी अशी मागणी आहे. जर का गुहागर आगाराला वरून जुन्या गाड्या लादत असतील तर मात्र प्रवाशी वर्गाला व संघटनेला आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल असा सज्जड इशारा संघटनेचे अध्यक्ष व सर्व पदाधिकारी यांनी महामंडळं व अधिकारी यांना दिला आहे.
याबाबत संबधीत मंत्री व अधिकारी यांना यापूर्वीच नवीन गाड्या मिळाव्यात यासाठी निवेदन दिलेले आहे. याबाबत आमदार भास्कर जाधव यांनी सुद्धा मागणी केली आहे असे पराग कांबळे यांनी म्हटले आहे. जिल्हा प्रशासन व अधिकारी यांनी गुहागर आगाराच्या माथी जाणीवपूर्वक जुन्या गाड्या मारू नये असे पराग कांबळे यांनी म्हटले आहे अन्यथा वेगळा आंदोलनाचा विचार करावा लागेल असा इशाराही पराग कांबळे यांनी दिला आहे