हरोली, कोल्हापूर येथे पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न
दिशा महाराष्ट्राची/ कोल्हापूर –
हरोली ता. शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे 19 जानेवारी 2025 रोजी भिमक्रांती सोशल फाउंडेशन हरोली व कवी सरकार वाचनालय आयोजित पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले.
पहिल्या सत्रामध्ये कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी सरकार, प्रमुख पाहुणे प्राध्यापक सुरेश कुराडे सर, मा. तुषार नेवरेकर आणि दीपक पवार यांच्या हस्ते महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले. सर्व मान्यवरांचे स्वागत स्वागताध्यक्ष बाळासाहेब कांबळे हरोली यांनी केले.
हरोलीतील हे पहिले संमेलन भविष्यातील एक सोनेरी पान असेल अशा शब्दात कुराडे साहेबांनी आयोजकांचे अभिनंदन केले. तर भविष्यात कवी कवयित्रींना यूट्यूब चैनल वर प्रसिद्ध देण्याचे आश्वासन तुषार नेवरेकर यांनी दिले. प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संमेलनाचे विशेष अंक आणि कविता तत्वे भोसले लिखित हे भाव माझ्या मनातली या काव्यसंग्रहाचे उद्घाटन संपन्न झाले.

विशेष अंकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
दुसरे सत्र कवी अशोक मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. कवी संमेलनामध्ये अमरनाथ कांबळे (अतिग्रे) काशिनाथ आव्हाड (अकोले), भाऊसो कांबळे (ममदापूर), दादासाहेब शेख, दिनेश पवार (रत्नागिरी), रामचंद्र चोथे (आकिवाट), आरती लाटणे (इचलकरंजी), विद्या खामकर (गारगोटी) इत्यादी कवी कवयित्रींनी आपल्या काव्यरचना सादर केल्या. काव्यसंमेलना नंतर भिमक्रांती साहित्य प्रेरणा पुरस्काराने डीपी क्षेत्रातील प्रगतिशील अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये अमर गंगथडे समाज भूषण प्रेरणा, सुस्मिता रेंदाळकर (पुणे) भीम क्रांती साहित्य, अशोक मोहिते आदर्श देशभक्ती, तुषार नेवरेकर भीम क्रांती प्रेरणा, भाऊसो कांबळे भीम क्रांती साहित्य प्रेरणा, अभिनेत्री राधा चव्हाण भीम क्रांती कलाभूषण, अंजली आकळे भिमक्रांती कला भुषण, इ. पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. भिम क्रांती सोशल फाउंडेशन च्या वतीने समाजातील अनेक होतकरू आणि प्रगतीशील नागरिकांना सन्मानित करण्यात आले.
संमेलनाला खूप दूर वरून साहित्यिक मंडळींनी हजेरी लावली होती. तर हरोली ग्रामस्थांनीही या साहित्य संमेलनाचा आनंद घेतला.फाउंडेशनच्या वतीने बाळासाहेब कांबळे, राजेंद्र सर यांनी मान्यवरांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आरती लाटणे आणि विद्या खामकर यांनी केले.