उद्या छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसील कार्यालय गुहागर येथे बौद्ध समाजाचा जनआक्रोश मोर्चा
दिशा महाराष्ट्राची/ गुहागर (संदेश कदम)-
महाराष्ट्रातील परभणी शहरामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आहे. त्या परिसरात संविधान प्रतिकृती शिल्पाची १० डिसेंबर २०२४ रोजी एका समाजद्रोही व्यक्तीने तोडफोड करुन विटंबना केली. या विरोधात परभणी शहरामध्ये आंबेडकरी अनुयायांनी उग्र स्वरूपाचे आंदोलन करुन सदर आरोपीला पोलीसांच्या ताब्यात दिले. परंतू आंदोलन आंबेडकरी अनुयायांवर स्थानिक पोलीस अधिकारी यांनी गुन्हे दाखल करुन त्यांना ताब्यात घेतले.
या आंदोलनकर्त्यांपैकी भिमसैनिक सोमनाथ सुर्यवंशी या आंबेडकरी अनुयायाला पोलीसांनी अमानुष मारहाण केल्यामुळे त्याचा पोलीस कोठडीत मृत्यु झाला. त्याचबरोबर केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल चुकीचे वक्तव्य केल्याबद्दल जाहिर निषेध करण्यासाठी गुहागर तालुक्यामध्ये उद्या गुरुवार दिनांक ०९ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११:०० ते ३:०० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते तहसीलदार कार्यालय गुहागर येथे जनआक्रोश मोर्चा,धरणे आंदोलन व तीव्र निदर्शने करण्यात येणार आहे.
या मोर्चात गुहागर तालुक्यातील बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या सामाजिक, धम्म संघटना उत्स्फूर्तपणे सहभागी होणार असून बौद्ध जनतेने या मोर्चात बहूसंख्येने वेळेत सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन बौद्धजन सहकारी संघ तालुका गुहागर या धम्म संघटनेचे अध्यक्ष आयु. सुरेश (दादा) सावंत, कार्याध्यक्ष आयु. मारुती मोहिते, सरचिटणीस आयु. सुनिल गमरे, आणि भारतीय बुद्ध सासन सभा तालुका गुहागर या धम्म संघटनेचे गुहागर तालुका प्रमुख आयु. सखाराम सुर्वे, भारतीय बुद्ध सासन सभा शाखा आबलोली या धम्म संघटनेचे अध्यक्ष आयु. दत्ताराम कदम यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.