ठाणे येथे नवलेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा संपन्न
दिशा महाराष्ट्राची / ठाणे
महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि ऑगस्ट मीडिया अँड ट्रेनिंग यांच्या संयुक्त विद्यमाने नवलेखकांसाठी कथालेखन कार्यशाळा ठाणे येथे आयोजित करण्यात आली होती.
या कार्यशाळेला उद्घाटक म्हणून ग्रंथालीचे प्रमुख विश्वस्त सुदेश हिंगलासपुरकर आणि मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे चे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर हे उपस्थित होते. सुदेश हिंगलासपुरकर यांनी या पुढच्या काळातले लेखन कसे असेल यावर भाष्य केले तर विद्याधर ठाणेकर यांनी मराठी ग्रंथ संग्रहालय ठाणे येथील पुस्तकांची माहिती दिली. लेखिका, कथाकार डॉक्टर स्मिता दातार, लेखिका, दिग्दर्शक हर्षदा बोरकर आणि सुप्रसिद्ध लेखक, कवी किरण येले यांनी कार्यशाळेत मार्गदर्शन केले .
स्मिता दातार यांनी कथालेखनाचे तंत्र आणि कथेचा इतिहास यावर अतिशय विस्तृत विवेचन केले. कथेचा आरंभ , मध्य, शेवट याबद्दल सांगितले. हर्षदा बोरकर यांनी सुचलेला विषय कसा फुलवावा, कथा कशी बांधावी याबद्दल विस्तृत माहिती दिली. वेगवेगळ्या उदाहरणाद्वारे त्यांनी हे सत्र फुलविले.
किरण येले म्हणाले, “स्वतःला लेखक समजायला लागलात तर तुम्ही लेखक होणार नाही.” एखादी उत्तम कलाकृती किंवा लेखन जर आपल्या हातून घडायचे असेल तर त्यासाठी काय काय आवश्यक आहे त्यासाठी किती वेळ द्यावा लागेल आणि काही वेळ थांबावेही लागेल याबद्दल त्यांनी विवेचन केले. ऑगस्ट मीडिया अँड ट्रेनिंग च्या संचालिका डॉ मृण्मयी भजक यांनी कार्यशाळेची प्रस्तावना केली आणि उपस्थितांचे आभार मानले.
या शिबिराला सहभागींचा उत्तम प्रतिसाद मिळाला. ठाणे, मुंबई, पेण, वसई, नवी मुंबई अशा वेगवेगळ्या ठिकाणहून शिबिरार्थी या कार्यशाळेसाठी आले होते.