समाज माध्यमांचा अतिरेक वापर
दिशा महाराष्ट्राची/ पुणे
सध्या सतत आपण ऐकत असतो की, माणूस समाज माध्यमांचा गुलाम झालाय….? समाज माध्यमे उपलब्ध झाली लोकांना व्यक्त होण्याची, विचार मांडण्याची साधने उपलब्ध झाली. ही अतिशय जमेची बाजू म्हणावी लागेल. मला समजलेली बातमी कधी एकदा इतरांना सांगून मोकळा होईन असं माणसाला होतं. किंबहुना प्रत्येक बातमी माझ्यामुळेच इतरांना कळावी असा त्याचा सतत प्रयत्न असतो. त्यामुळे पेपरात आलेली हेडलाईन न्यूज सुद्धा तो फोटो काढून सामाजिक माध्यमांवर टाकत राहतो. इतर लोकही पेपर वाचतात, टीव्ही बघतात हे त्याला पटतच नाही. मी सगळ्यात आधी बातमी दिली हा आनंद मिळवण्यासाठी आपण अनेकदा आलेला संदेश न वाचता आलेली बातमी खात्री न करता फॉरवर्ड करू लागलो.
प्रसिद्धीची इच्छा सर्वांच्यात नैसर्गिकच असते. प्रसिद्धी मोजण्याचे परिमाण समाज माध्यमांनी निर्माण करून दिले आहे त्याला लाईक असे म्हणतात. मग या लाईक्स मिळवण्यासाठी धडपड चालू होते. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी बरेचदा आलेला मेसेज त्याची सत्यता पडताळून न वाचता व पाहता पुढे पाठवला जातो. परंतु त्यामुळे होणाऱ्या सामाजिक नुकसानीची त्या व्यक्तीस किंचितही जाणीव नसते. वस्तुतः बहुतांशी समाज हा भावनाप्रधान व जाणीव असलेला आहे. परंतु प्रसिद्धीच्या इच्छेपुढे समाज माध्यमाचा उपयोग कसा करावा याची माहिती नसते पण त्यात एक तोटा म्हणजे योग्य व चांगले संदेश देखील लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत.
प्रत्येकाच्या काही आवडी- निवडी असतात, प्रत्येकाचे काही ठाम विचार असतात. प्रत्येकाच्या अभ्यासाचा चिंतनाचा भाग, आवडीचे विषय, विचार करण्याची पद्धत वेगवेगळी असते. त्या विषयात त्यांनी आपली मते नोंदवणे अगदी उचित आहे परंतु बरेच वेळा ज्या गोष्टीशी काहीही संबंध नाही, त्याबद्दल काही माहिती नाही तोही बिनधास्तपणे व ठामपणे आपली मते मांडत असतो हे अतिशय चुकीचे आहे. आपले घर, आपले कुटुंब, अशा अनेक खाजगी व वैयक्तिक गोष्टी असतात. पण आपल्या खाजगी गोष्टी विनाकारण सर्वांना सांगून त्यांना डिस्टर्ब करणे योग्य नाही.
आपण कुठे सहलीला गेलो की तेथील काही कुटुंबासोबतचे फोटो तसेच रोज जेवणात काय आहे त्याचे फोटो हे सर्व कशासाठी? कुटुंबियांचे वाढदिवस घरी साजरे करा तुमच्या पद्धतीने पण त्याचे सर्वांसमोर प्रदर्शन कशाला? एकाद्या नवीन ठिकाणासंदर्भात माहिती द्यायची असेल तर जरूर द्यावी, त्याचे फोटो टाकावेत की जेणेकरून सर्वांना कळेल. कोणाला किती व काय माहिती द्यावी या सर्व गोष्टींसाठी मर्यादा हव्यात पण ही मर्यादा ठरवणार कोण? हा मुख्य प्रश्न आहे.
सुटसुटीत, कमी शब्दात जास्तीत जास्त आशय असणारा संदेश लोकांना भावतो. अनेक वेळा लोक एखाद्या ग्रुपवर वैयक्तिक गप्पा मारत बसतात त्याचा इतर सदस्यांना त्रास होतो. त्यामुळे वैयक्तिक चॅटिंग च्या वेळी व्यक्तिगत अकाउंट वापरले तर हा त्रास टाळता येतो. मासे जसे ठराविक काळानंतर श्वास घ्यायला पाण्यावर येतात तसेच काही जणांना कुतूहलापोटी पाच मिनिट झाले की फोन बघायची सवय लागते. यामुळे प्रसंगी नवरा- बायको व कौटुंबिक सदस्यांमध्ये भांडणे झाल्याचे देखील ऐकिवात येते. लक्ष फोनमध्ये असल्यामुळे समोरची व्यक्ती काय म्हणते हे नीट समजत नाही त्यामुळे बरेच वेळा गैरसमजाचे वातावरण निर्माण होते. या गोष्टी कोणा एकाच्या बाबतीत घडतात असे नक्कीच नाही. प्रत्येक जणांच्या बाबतीतच कमी-अधिक प्रमाणात असे घडते. कुटुंबातील सदस्य, घरी आलेले पाहुणे यांच्याशी बोलताना फोन बाजूला ठेवावा कारण त्यांच्या म्हणण्याकडे दुर्लक्ष होते व साहजिकच त्यांचा अपमान होतो.
यासाठी अनेक छोटे-छोटे उपाय करून बघता येतील. कामाव्यतिरिक्त मोबाईल डेटा बंद करून ठेवणे, ठराविक वेळेत आलेले सर्व संदेश बघणे व त्यांना उत्तर देणे. अनावश्यक व कमी महत्त्वाचे संदेश एकमेकांना पाठवणे बंद करणे. अगदी महत्त्वाचे काम असेल तेव्हा प्रत्यक्ष फोनवर चर्चा करणे किंवा प्रत्यक्ष संपर्क करणे. शक्यतो फोन शरीरापासून विशेषकरून झोपताना दूर ठेवणे, कुटुंबातील सदस्यांनी किमान एकवेळचे भोजन एकत्र करणे. त्यावेळी टीव्ही सुरू असायला नको.
मानसिक शांततेसाठी आठवड्यातून एक दिवस आपण फोन बंद ठेवू शकतो. महत्वाचे निरोप मिळावेत म्हणून कुटुंबातील प्रत्येक सदस्याच्या सोयीनुसार हा दिवस ठरवता येईल. वाचन, लेखन, कला साहित्य, वादन,गायन विविध छंदांमध्ये स्वतःला गुंतवून घेतल्यास मोबाईलचे व्यसन कमी होईल.
“अति तिथे माती” ही एक म्हण आहे. तंत्रज्ञान जितके चांगले तितकेच वाईट आहे त्यामुळे त्याचे चांगले तेवढे घेऊन, त्याचा वापर योग्य तिथे व योग्य त्या प्रमाणात कुठे करावा हे ज्याला कळते तोच यशस्वी होतो.