बळीराज सेना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदी पराग कांबळे यांची नियुक्ती
दिशा महाराष्ट्राची/ गुहागर:- उदय दणदणे)
शेतकरी,कष्टकरी बहुजनांच्या न्याय हक्कासाठी निर्माण झालेला बळीराज सेना पक्ष अध्यक्ष अशोक वालम यांचा कोकण सह राज्यात गावभेटी दौरा सुरू असून गुहागर विधानसभा क्षेत्रात बळीराज सेनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गुहागर विधानसभा मतदारसंघातील कुणबी समाज कार्यकर्ते, तसेच पत्रकार पराग कांबळे यांची रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर जिल्ह्यासह गुहागर मतदार संघात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुणबी समाजाचे कट्टर कार्यकर्ते असलेले पराग कांबळे यांच्याकडे भावी आमदार म्हणून पाहिले जाते. ते स्वतः इच्छुकही असल्याचे जाहीर आहे.
गुहागर मतदार संघात कुणबी समाज मोठ्या संख्येने बळीराज सेनेकडे जोडला जात असून नुकत्याच जाहिर झालेल्या बळीराज सेना गुहागर कार्यकारणीत गुहागर तालुका प्रमुख पदी तुकाराम निवाते तर जिल्हा परिषद गट: वेळणेश्वर गट प्रमुख पदी- संदिप गोरीवले, अंजनवेल गट प्रमुख पदी- पराग कांबळे, पालशेत गट प्रमुख पदी- सुभाष नितोरे, तवसाळ गट प्रमुख पदी- विशाल गोताड तर सदस्य पदी- शंकर मोरे (शीर), विजय नाचरे (तवसाळ), विनायक घाणेकर (पालपेणे), अरुण भुवड (वरवेली),रामचंद्र आडविलकर (परचुरी), मंगेश मते (शीर) यांची निवड झाली आहे.
बळीराज सेना रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर पराग कांबळे यांनी दैनिक अक्षराज मीडियाला पहिली प्रतिक्रिया दिली की बळीराज सेनेच्या वतीने माझी जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली,पक्षप्रमुख यांनी व तमाम कार्यकर्त्यांनी माझ्यावर जो विश्वास दाखविला आहे तो मी सार्थ करून दाखवीन.
बळीराज सेना हा पक्ष बहुजनांचा आणि सर्वसामान्य जनतेचा पक्ष आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून देण्याचे काम सर्व कार्यकर्त्यांच्या मदतीने आपण निश्चित करू, मजूर कामगार वर्ग यांना न्याय देण्याचा प्रयत्न करु. शासन, प्रशासन आणि सर्वसामान्य कार्यकर्ता आणि विकास कार्य यामध्ये समन्वय म्हणून आपण काम करण्याचा प्रयत्न करू. कोकणातील विविध प्रकारचे जे प्रश्न आहेत. शैक्षणिक औद्योगिक सामाजिक सांस्कृतिक आणि कृषी मत्स्य विभागातील प्रश्न आरोग्य, विभागातील विविध प्रकारच्या समस्या आहेत, त्या सोडवण्यासाठी बळीराज सेनेच्या माध्यमातून निश्चित प्रयत्न करू राजकारण आणि समाजकारण या नाण्याच्या दोन बाजू असल्या तरी सर्वसामान्य जनतेला सोबत घेऊन काम करू असे आश्वाशीत केले.