मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठानचा “११वा वर्धापन दिवस” उत्साहात संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई)
आपल्या आजूबाजूला असणाऱ्या राजकारणाला बाजूला सारून समाजातील अनेक विषयांवर गेले १० वर्ष प्रामाणिकपणे महाराष्ट्रातील तमाम युवकांना एकत्र करून निस्वार्थीपणे काम करणाऱ्या मंडणगड दापोली सामाजिक प्रतिष्ठान अर्थात MDSP या संघटनेचा ११ वा वर्धापन दिवस १ सप्टेंबर २०२४ रोजी प्रशिक बुद्ध विहार, कासारवाडी येथे उत्साहात संपन्न झाला.
संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सुमेध सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली सदर वर्धापन दिन पार पडला. कार्यक्रमांना बुध्द वंदनेने सुरुवात झाली. त्यानंतर केक कापून सर्वांचे तोंड गोड करण्यात आले. संस्थेचे सरचिटणीस उज्वल खैरे यांनी संस्थेचा आतापर्यंतचा प्रवास थोडक्यात व्यक्त केला. भविष्यात देखील MDSP चे काम आपण सर्वांनी मिळून पार पाडू असा विश्वास व्यक्त केला. संस्थेचे संस्थापक सदस्य, माजी अध्यक्ष कॅन्सर सारख्या आजाराशी झुंज देत असताना सुद्धा प्रदीप जाधव हे व्हिडीओ कॉल द्वारे जोडले गेले. त्यांनी सर्वांना वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष सुमेध सकपाळ, माजी सचिव राहुल अहिरे, सुनील तांबे, तुषार नेवरेकर, निखिल कवडे, सचिन कांबळे, महेश भातकुंडे, उमेश जाधव, उज्ज्वल खैरे आदी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस उज्वल खैरे यांनी केले. सर्वांना शुभेच्छा देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.