पालशेत बाजारपेठेत खड्डयांचे साम्राज्य; गणेशोत्सवात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता
(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर: उदय दणदणे)
गुहागर तालुक्यातील पालशेत येथील बाजारपेठत रस्त्यावर भलेमोठे खड्डे पडले असून याठिकाणी तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
पालशेत- निवोशी ग्रामपंचायत महसूल क्षेत्रातील पालशेत बाजारपेठ हे येथील पंचक्रोशीतील जनतेसाठी महत्वपूर्ण बाजारपेठ असून येथे ग्राहकांची, पर्यटकांची, तसेच स्थानिकांची तसेच वाहनांची फार मोठी वर्दळ असते, परंतु येथील प्रमुख रस्त्याची जीर्णवस्था झाली असून प्रतिवर्षी पावसाळ्यात याठिकाणी मोठमोठे खड्डे पडत असून याठिकाणी जनतेला मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीलाही सामोरे जावे लागत आहे, शिवाय पावसाळ्यामध्ये ये-जा करणाऱ्या वाहनांमुळे येथील दुकानांमध्ये चिखल उडून दुकानदारांचे फार मोठे नुकसान होत आहे. तर येथे मच्छीविक्री करणाऱ्या महिलांनाही चिखल, धुळीला सामोरे जावे लागत आहे.
प्रतिवर्षी पावसाळ्यात सदर बाजारपेठेतील रस्ते साद्या दगड मातीने भरले जात असून ते काम निष्कृष्ट दर्जाचे होत असते. विशेष म्हणजे येथील ग्रामपंचायतच्या अगदी काही हाकेच्या अंतरावर असलेल्या बाजारपेठेतील या खड्यांकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होते ही शरमेची बाब आहे. तर प्रशासन, येथील लोकप्रतिनिधी यांचे हे अपयशच म्हणावे लागेल.
बाजारपेठेत गणेशोत्सववाच्या खरेदीची लगबग सुरू झाली असून ऐन गणेशोत्सवात येथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असल्याने संबंधित प्रशासन, लोकप्रतिनिधी यांनी गणेशोत्सवपूर्व पालशेत बाजारपेठेतील हे खड्डे भरण्याबरोबरच लवकरात लवकर ह्या रस्त्याची दरजोन्नती करून येथील जनतेला दिलासा द्यावा.