आबिटगावची सुकन्या अनन्या खेराडे हिची स्टार प्रवाह वरील “लिटिल चॅॅम्प्स” कार्यक्रमात निवड
(दिशा महाराष्ट्राची/दिपक कारकर- चिपळूण)
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी विविध कलात्मक गुण असतात. मात्र आवड, जिद्द चिकाटी असेल तर अशी अनेक व्यक्तिमत्वे जगासमोर येतात ह्याचे ताजे उदाहरण चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागातील आबिटगाव (खालचीवाडी) येथील अतिशय सामान्य शेतकरी कुटुंबातील कु.अनन्या विजय खेराडे हिच्या बाबतीत प्रत्येकाला आले आहे. नुकतीच तिची महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या आणि आपल्या स्वरांनी अवघ्या महाराष्ट्राला मंत्रमुग्ध करणाऱ्या स्टार प्रवाह ह्या टेलिव्हिजन चॅनेल वरील प्रेक्षकांच्या आवडत्या “लिटिल चॅम्प्स” कार्यक्रमात निवड झाली आहे.
अंगीकृत कला सादर करण्याची अनमोल संधी तिला प्राप्त झाली आहे. आबिटगाव येथील जिल्हा परिषदेच्या ४ थी इयत्तेत शिक्षण घेणारी अनन्या होय. लहानपणीच गायन, नृत्य कलेची प्रचंड आवड असणारी अनन्या सावर्डे येथील शारदा संगीत साहित्य,कला, क्रीडा अकादमीच्या संगीत विद्यालयात गुरुवर्य वरद केळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत आहे.
अनन्याने श्री चंडिका नाट्य नमन मंडळ,आबिटगाव उपरोक्त मंडळाच्या नमन कलेत देखील गायन करून रसिक मनावर वेगळीच थाप पाडली होती. अशा हुशार, संयमी गोड आवाज असणाऱ्या अनन्याचे तालुका, पंचक्रोशीसह विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.