मुंडे महाविद्यालयाचा २८ वा वर्धापन दिन उत्साहात संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान वरिष्ठ महाविद्यालय व पद्मश्री कर्मवीर भि. रा. तथा दादा इदाते वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयाचा 28 वा वर्धापन दिन संस्थाध्यक्षा सौ. संपदाताई पारकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी संस्थेचे कोषाध्यक्ष रवींद्रकुमार मिश्रा, सहकोषाध्यक्ष सुनीलभाई मेहता, संचालक वैभव कोकाटे, संतोष चव्हाण, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव, उपप्राचार्य डॉ. वाल्मिक परहर, सेवानिवृत्त प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकनेते गोपीनाथजी मुंडे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत करुन आपल्या प्रास्ताविक भाषणात संस्था व महाविद्यालयाच्या यशस्वी वाटचालीचा थोडक्यात आढावा घेतला. संस्था मोठी करण्यामध्ये पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. मंडणगड व परिसरातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी दादा यांनी अथक परिश्रमातून व संघर्षातून या महाविद्यालयाची १९९६ साली उभारणी करून उच्च शिक्षणाची सोय केली. संस्था पदाधिकार्यायांपासून ते शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, हितचिंतक या सर्वांचे महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासातील सहकार्य उल्लेखनीय असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मंडणगड तालुक्यात बारावी वाणिज्य व विज्ञान शाखेत प्रथम आलेली कु. मैथिली अनंत भोपणे व प्रज्वल दिनेशकुमार जाधव या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला. तसेच महाविद्यालयातून इयत्ता बारावी वाणिज्य वर्गात कु. मैथिली भोपणे, कु. सरीन हसबुले व कु. कीर्ती कदम या विध्यार्थ्यानी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केले, तर बारावी विज्ञान वर्गात प्रज्वल जाधव, शिवम घाणेकर, कु. वफा रहाटविलकर या विध्यार्थ्यानी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केले. तर तृतीय वर्ष कला, वाणिज्य व विज्ञान वर्गाचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये कला वर्गात कु. सानिका साळुंके, कु मीनाली लोखंडे व कु. अस्मिता माने या विद्यार्थिनीनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केले. वाणिज्य वर्गात विपुल नाडकर, कु. ऋतिका दिवेकर व खतिजा पावसकर या विध्यार्थ्यानी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केले. विज्ञान वर्गात नूरजहान सय्य्यद, वैष्णवी खांडेकर व दुर्वेश जाधव या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, व्दितीय व तृतीय क्रमांक संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू व गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी सरीन हसबुले, वफा रहाटविलकर, सेवानिवृत्त प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आत्माराम शेळके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना संस्थाध्यक्षा सौ.संपदाताई पारकर यांनी सांगितले, की ज्या तालुक्याकडे काळया पाण्याची शिक्षा म्हणून पाहिले जायचे त्या तालुक्यात महामहीम राष्ट्रपती येऊन गेले. आज मंडणगड तालुका जगाच्या पटलावर आला आहे. सर्वांच्या दृष्टिने ही आनंदाची बाब आहे. वास्तविक या महाविद्यालयामुळे मंडणगडचे परिवर्तन घडले, याचा विसर पडता कामा नये. संस्थापक अध्यक्ष पद्मश्री कर्मवीर दादा यांनी अतिशय कष्टातून हे महाविद्यालय सुरू केले. त्याला आज अठ्ठावीस वर्षे पूर्ण झाली. आपण सर्वांनी मिळून या महाविद्यालयाची उत्तरोत्तर अधिक प्रगती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. महाविद्यालयाने निकालाची उज्ज्वल परंपरा कायम टिकवून ठेवली आहे. याबद्दल प्राध्यापकांचे त्यांनी कौतुक केले. आजकाल विद्यार्थ्यांना अभ्यासाचे फारसे गांभीर्य राहिलेले नाही. त्यांना अभ्यासाची जाणीव करून द्यावी लागते. हे सांगण्याचे प्रामाणिक कार्य प्राध्यापक करत असतात. म्हणून यशाचे श्रेय विध्यार्थ्याना न देता ते प्राध्यापकांना दिले पाहिजे. असे प्रतिपादन संस्थाध्यक्षांनी केले. यशस्वी सर्व विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या. यानंतर महाविद्यालय परिसरात वर्धापनदिनानिमित्त मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. संगीता घाडगे यांनी केले तर शेवटी आभार डॉ. शैलेश भैसारे यांनी मानले.