बचत गट चळवळीने महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मिळवून दिला आहे- सामाजिक कार्यकर्त्या सुनिता गांधी
(दिशा महाराष्ट्राची / मंडणगड)
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विशाखा समिती, इतिहास विभाग, महिला विकास कक्ष व वनस्पतीशास्त्र विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंडणगड तालुक्यातील अडखळ या गावातील महिलांना ‘स्त्री जागरण’ कार्यक्रमा अंतर्गत ‘बचत गट: संधी व आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शनपर कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
मार्गदर्शक म्हणून चिपळूण येथील सामाजिक कार्यकर्त्या सुनिता गांधी या उपस्थित होत्या.यावेळी विशाखा समितीच्या डॉ. ज्योती पेठकर, महिला विकास कक्षाच्या डॉ. संगीता घाडगे, डॉ. विनोदकुमार चव्हाण, प्रा. प्राची कदम, डॉ. प्रभाकर पेंडसे, सौ. जयश्री पेंडसे आदी मान्यवरही उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉ. ज्योती पेठकर यांनी उपस्थितांचे स्वागत करुन कार्यक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर डॉ. संगीता घाडगे यांनी प्रमुख पाहुण्यांची थोडक्यात ओळख करुन दिली. डॉ. प्रभाकर पेंडसे, सौ. जयश्री पेंडसे यांनी सदर कार्यक्रमास शुभेच्छा देताना महिलांच्या दृष्टीने हा उपक्रम महत्वपूर्ण असल्याचे सांगितले.
यावेळी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना सुनिता गांधी यांनी सांगितले की, आज बचत गट चळवळीने महिलांना आत्मनिर्भर होण्याचा मार्ग मिळवून दिला आहे. बचत गट ही संकल्पना सर्वसमावेशक आहे, परंतु बचत गट म्हटले की महिला व बचत गट असे समीकरणचं बनले आहे. बचत गटाला मोठं करण्यात महिलांचा सर्वात मोठा वाटा आहे, कारण बचत गटाच्या माध्यमातून महिला आणि व्यवसाय यांची जणू एक चळवळच उभी राहिलेली आहे. आज गावागावात अनेक छोटे मोठे बचत गट कार्यरत आहेत. ग्रामीण आणि महिला उद्योजकता विकसित करण्यात बचत गटाचा मोठा हात आहे. तसेच आजच्या स्त्रियांनी बदलत्या काळातील आव्हानांना कसे सामोरे जावे, पहिल्यांदा बचत गटाची सुरुवात कशी करावी, या माध्यमातून कोणकोणत्या प्रकारचे व्यवसाय करतात येतात, व्यवसाय करताना येणा-या समस्या, बाजारपेठेतील विविध संधी याविषयी मार्गदर्शन करताना सरकारकडून बचत गटास उपलब्ध असणा-या विविध योजना, उपलब्ध असणा-या संधी याची माहिती त्यांनी विस्ताराने सांगितली. यावेळी महिलांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समाधानकारक उत्तरे दिली.
सदर कार्यक्रमास महिला मोठया संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. जयश्री पेंडसे व त्यांच्या सहका-यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा समिती समन्वयक डॉ. ज्योती पेठकर यांनी तर आभार डॉ. संगीता घाडगे यांनी मानले.