मन शांत ठेवायचं आहे- प्राची परचुरे वैद्य
(दिशा महाराष्ट्राची / पुणे)
सध्याचे जीवन हे स्पर्धेचे युग आहे. आजकाल आपण पाहतो की प्रत्येकजण आपापल्या कार्यक्षेत्रात खूप व्यग्र आहे. स्पर्धेच्या युगात टिकून राहण्यासाठी प्रत्येकाची धडपड सुरु आहे मग त्याबरोबरीनेच मानसिक ताणतणाव आलेच आणि या मानसिक ताणतणाव कमी होण्यासाठी आजकाल बरेच जण योगा, प्राणायाम, मेडिटेशन करताना दिसून येतात. पण मन याने मन खरेच शांत होते का? मन शांत करणे ही खरोखरच अवघड गोष्ट आहे, आपल्या मनात विविध विचारांचे थैमान सुरु असते. डोळे बंद करून ध्यानस्त बसण्याचा प्रयत्न केला जरी तरी एक नाही तर अनेक प्रश्नांनी मनात काहूर निर्माण होते. मेडिटेशन करणाऱ्या प्रत्येकाला हा प्राथमिक अनुभव येतोच. कारण, मेडिटेशन ही काही एका दिवसात शिकण्याची गोष्ट नाही. त्यासाठी प्रयत्नपूर्वक सराव करावा लागतो.
अशातच, आपलं मन इतक्या कामात, गोष्टींत अडकलेले असते, की तिथून सोडवून ते ध्यानमग्न करणे, म्हणजे फारच कठीण काम ! मात्र, सरावाने आणि सकारात्मकतेने कोणतीही गोष्ट साध्य करता येते. आपल्या मराठीत एक सुविचार आहेच प्रयत्ने वाळूचे कण रगडीता …. वेळेची बचत म्हणून आपण चार गोष्टी एकावेळी करू पाहतो. मात्र त्यामुळे एकाही कामाला उचित न्याय मिळत नाही किंवा तसे करता करता एखादे काम नीट होत नाही किंवा चुकते. टीव्ही- जेवण, गाणी- स्वयंपाक, अशी अनेक चुकीची समीकरणे आपण जोडून घेतली आहेत. असे करण्यापेक्षा जेवताना व्यवस्थित आपण काय जेवतो तेथे लक्ष देऊन जेवल्यास जेवणातील जीवनरस आपल्याला पूर्णपणे मिळण्यास मदत होते. तसेच गाणी ऐकताना व्यवस्थित गाणे ऐकले तर ते गाणे व्यवस्थित कळते, त्या गाण्यातील भाव आपल्यापर्यंत पूर्ण पोचतात . प्रत्येक कामाची मजा घेत काम करणे , हीच मेडिटेशनची प्राथमिक पायरी आहे.
आपल्याला लहानपणी एक गोष्ट सांगतात की, अभ्यास करताना लक्ष देऊन अभ्यास कर. बाकी इतरत्र कुठेही लक्ष देऊ नको. म्हणजेच अभ्यास करताना डोक्यात बाकीचे विचार आणू नकोस. पण याच सुचनेचे आपण मोठे झाल्यावर पालन करतो का? अनेकदा आपण देहाने एकीकडे आणि मनाने दुसरीकडे उपस्थित असतो. तसे होऊ न देता, हाती घेतलेल्या कामावर तन-मन केंद्रित करण्याची सवय लावली, की ध्यानधारणा आपोआप जमेल.
मेडिटेशन हा शब्द उच्चारल्यावर स्थिर, शांत, स्तब्ध बसलेली व्यक्ती, असे चित्र आपल्या डोळ्यासमोर येते. तो ही मेडिटेशनचा प्रकार आहेच, परंतु दैनंदिन जीवनात प्रत्येक गोष्टीचा भरभरून आनंद घेणे, प्रत्येक गोष्ट नीट समजावून घेणे, शिकणे या गोष्टी मेडिटेशन थेरेपीत येतात, उपचाराप्रमाणे काम करतात आणि आपले मन आटोक्यात आणून ध्यानधारणेसाठी तयार करतात.
ध्यानधारणेच्या सरावाला सुरुवात करताना सकाळची वेळ निवडा कारण संध्याकाळी दिवसभरात बऱ्याच गोष्टी घडून गेलेल्या असतात मग त्या चांगल्या असू शकतात किंवा वाईट वा दुःखद. मग ध्यानधारणेला बसल्यावर त्या विचारांचे काहूर माजते व व्यवस्थित ध्यानधारणा होऊ शकत नाही ध्यानधारणेच्या वेळेस जमल्यास मोबाईल बंद ठेवावा. त्यामुळे मन एकाग्र होण्याच्या दृष्टीने मार्ग मोकळा असतो. तरीदेखील विचार येत असतील, तर येऊ द्या. काहीवेळाने तेही निघून जातील. हळू हळू एखाद्या नदीच्या शांत डोहाप्रमाणे मनातील तरंग थांबतील आणि मन ध्यानधारणेसाठी तयार होईल.
मुळातच सगळ्या गोष्टीतून मन अलिप्त करण्यासाठी ध्यान धारणा केली जाते. हळूहळू श्वासावर लक्ष केंद्रित करा म्हणजे मनातील विचारही कमी होतील. अशाप्रकारे आपल्याला मेडिटेशन करता येईल व रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा वेळ स्वतः साठी देता येईल व आपले मनही शांत होईल.
– प्राची परचुरे वैद्य
मो. नं. – ९७६७६१३१४२