योगतंत्र या योगप्रशिक्षण संस्थेचा वर्धापन व योग दिवस उत्साहात साजरा

Spread the love

योगतंत्र या योगप्रशिक्षण संस्थेचा वर्धापन व योग दिवस उत्साहात साजरा

 


(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे- दिपेश मोहिते)


 

योग जगण्यातला अविभाज्य घटक आहे. योग एक समृद्ध जीवनशैली आहे आणि तो प्रत्येकापर्यंत पोहचला पाहिजे, हा विचार घेऊन “योगतंत्र” या संस्थेची स्थापना २००८ साली करण्यात आली.
सध्याच्या धावपळीच्या जगात स्वतःकडे लक्ष देण्यासाठी कोणाकडेच वेळ नाही, परंतु या सगळ्याने शरीरावर होणारे परिणाम, आजार, रोग या सगळ्यातून बाहेर पडून तंदुरुस्त रहायचे असेल तर नियमित योग करणं गरजेचं आहे.
सध्या सर्वत्र अनेक योग वर्ग घेणारे दिसण्यात येतात, परंतु त्यांच्या शिकवण्याच्या तंत्राविषयी अनेक शंका मनात निर्माण होतात. या सगळ्यात “योगतंत्र” आपले वेगळेपण अबाधित ठेवत, पुरातन हठयोगावर आधारित सर्व क्रिया शिकवून योग शिक्षणाचे महत्व टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरत आहे. पूज्य हठयोगी निकम गुरुजी यांच्या योग शिक्षणाचा वारसा पुढे नेण्याचे काम योगतंत्र संचालक ओनील खरे सर आणि संचालिका विजया खरे मॅडम करत आहेत.
दरवर्षी २५ जुन या दिवशी “योग दिवस आणि योगतंत्र वर्धापन दिवस” साजरा होतो. याही वर्षी तो साजरा झाला. मुलुंड येथील “वामनराव शाळेच्या डाफोडील” सभागृहात संध्याकाळी रंगलेल्या या कार्यक्रमात अनेक योगप्रेमी आणि योगतंत्राच्या आजी- माजी विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमाला तुडुंब गर्दी जमली होती. सुरुवातीला योगतंत्र या संस्थेच्या प्रवासाची माहिती देण्यात आली. संस्थेचे ट्रस्टी आणि खरे यांचे पुत्र ओम खरे यांनी या प्रवासाचे सविस्तर वर्णन अगदी ओघवत्या भाषेत केले. तत्पूर्वी वामनराव शाळेच्या मुख्याध्यपिका यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर योगासनांवर आधारित डेमो दाखवण्यात आला. नवीन विदयार्थ्यांचा हा डेमो काही कठीण आसनांसह लोकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला.
यानंतर काही जुन्या विद्यार्थ्यांच्या मनोगताने योग जगताना किती महत्वाचा आहे हे जास्त कळले. अनेक उपस्थित न राहू शकलेल्या विद्यार्थ्यांनीही आपले मनोगत व्हिडिओ द्वारे पाठवले होते. त्यानंतर यावर्षी बेसिक कोर्स, ऍडव्हान्स कोर्स आणि शिक्षक म्हणून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. त्यानंतर योगतंत्र संचालिका विजया खरे मॅडम यांचे “साक्षीभाव ध्यान” या महत्वाच्या विषयावरील विवेचनात अत्यंत साध्या आणि सोप्या भाषेत ध्यानाचे महत्व, उपयोग आणि आवश्यकता त्यांनी पटवून दिले. साधारण ३ – ३.३० चालू असलेल्या कार्यक्रमाचा शेवट प्रार्थनेने करत पुन्हा पुढील वर्षी भेटण्याच्या निश्चयाने करण्यात आला.

Related Posts

Leave a Comment