कर्दे येथे विजेच्या धक्क्याने वायरमन निखिल नार्वेकर याचा दुर्देवी मृत्यू
(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर- उदय दणदणे)
…तर दुर्घटना टाळता आली असती- उपकार्यकारी अभियंता गणेश गलांडे
गुहागर तालुक्यातील मौजे कर्दे गावात गुरुवार दिनांक १८ मे २०२३ रोजी सायंकाळी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. सदर गावचे वायरमन निखिल नार्वेकर यांना माहिती मिळताच त्यांनी आपले साथीदार न घेता एकटेच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी गेले असता सोबत साथीदार नसल्याने घाईगडबडीत दुसऱ्याच भागाचा वीजप्रवाह खंडित करून तांत्रिक दुरुस्तीच्या कामासाठी विद्युत खांबावर चढला असता मात्र वीजप्रवाह सुरू असल्याने काम सुरू करताच क्षणी विजेचा जोराचा धक्का लागून खाली कोसळला. जमीनीवर पडून जोराचा मार लागल्याने वायरमन निखील नार्वेकर वय वर्षे २४ राहणार अडूर (पडयाळवाडी) यांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना कर्दे गावी (कर्दे फाटा) येथे घडली.
कर्दे ग्रामस्थांनी तातडीने त्याला वैद्यकीय उपचारासाठी चिखली प्राथमिक आरोग्य केंद्र येथे घेऊन गेले तपासणी अंतिम वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषित केले.
शुक्रवार दिनांक १९ मे २०२३ रोजी शवविच्छेदन करून निखिलचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. साधारण गेली ६ महिने कंत्राटी तत्वावर एम. एस. इ. बी. विद्युत कंपनीत सेवेत कार्यरत असणाऱ्या अडुर येथील निखिल नार्वेकर या लाईनमनचा विजेच्या धक्क्याने दुर्देवी मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केला जात आहे. काम करत असताना वीजपुरवठा सुरूच राहिल्याने लाईनमनचा मृत्यू झाल्याची ही दुर्देवी घटना प्राथमिक माहितीत समोर आली आहे.
घडलेली घटना अतिशय दुःखदायक असून यामुळे महावितरण कंपनी व नार्वेकर परिवार आणि मित्र परिवाराचे न भरून येणारे मोठे नुकसान झाले आहे. अशाप्रकारे अकस्मात घडणाऱ्या घटना अनेकांच्या आयुष्यात पोकळी निर्माण करतात आणि संबंधितांच्या कुटुंबाला अनिश्चिततेच्या छायेत आयुष्य काढावे लागते. हा प्रसंग नक्कीच टाळता येण्यासारखा होता.
भविष्यात अशी एकही अप्रिय घटना घडू नये याकरीता सर्व तांत्रिक कर्मचाऱ्यांना मी आवाहन करतो की घाई गडबडीमध्ये कोणतेही काम हाती घेऊ नये. काम करताना पूर्ण एकाग्र चित्ताने फक्त कामातच लक्ष असावे व सुरक्षा साधनांचा वापर केला पाहिजे. तसेच काम करताना मोबाईलचा अनावश्यक वापर टाळला पाहिजे. जेथे कुठे यंत्रणेची माहिती नाही किंवा त्याबद्दल शंका आहे तिथे वरिष्ठांच्या देखरेखीखाली काम करावे असे समस्त कर्मचारी वर्गाला गणेश मनोहर गलांडे उपकार्यकारी अभियंता- गुहागर उपविभाग, महावितरण यांनी सदर घटनेप्रति संवेदनशील प्रतिक्रिया देताना महत्वपूर्ण आवाहन केले आहे.
निखिल नार्वेकर एक उत्कृष्ट कबड्डी खेळाडु होता विविध स्पर्धेत तो सक्रिय सहभाग घेत असायचा त्याच्या अचानक जाण्याने अडूर क्रीडा नगरीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे. संपूर्ण अडूर पंचक्रोशी ग्रामस्थांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.