बौद्धजन विकास मंडळ निवे बु. येथे भव्य बुद्धविहाराचे दिमाखात उदघाटन संपन्न
(दिशा महाराष्ट्राची/ रत्नागिरी- दीपेश मोहिते)
बौद्धजन विकास मंडळ निवे बु. स्थानिक व मुंबई कमिटी आणि माता यशोधरा महिला मंडळ आयोजित भव्य बुद्धविहार उदघाट्न सोहळा रविवार दिनांक १४ मे २०२३ रोजी, निवे बु., रत्नागिरी येथे अनेक दिग्गज मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
मागील अनेक वर्षे निवे बु. च्या ग्रामस्थांनी या बुद्धविहाराचे स्वप्न पाहिले होते. अनेक प्रश्न, संकटं यांना तोंड देत अथक परिश्रमाने त्यांच्या या स्वप्नाला आता मूर्त स्वरूप आले असल्याने सर्व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या बुद्धविहाराच्या उदघाट्नाला भदंत एस संबोधी थेरो (आम्रपाली बुद्धविहार बुद्धवन कोल्हापूर) यांची उपस्थिती महत्वाची होती. यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना झाली. आमदार शेखर निकम यांचीही प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला होती. आयु. ताराबाई भिकाजी जाधव यांच्या हस्ते या बुद्धविहाराचे उदघाटन संपन्न झाले.
तत्पूर्वी या बुद्धविहारातील मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्रातल्या अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली. अगदी पोलीस पाटील, जिल्हाधिकारी, सरपंच ते अनेक न्युज चॅनेलची संबंधित माणसं, पत्रकार उपस्थित होते. त्याच बरोबर अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. महिलांसाठी, लहान मुलांसाठी स्पर्धा, त्याचबरोबर प्रबोधनात्मक व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.१४ मे ते १५ मे अशी दोन दिवस भरगच्च कार्यक्रमाची जत्राच भरवण्यात आलेली होती. शेवटच्या दिवशी “बोधिसत्व ऑर्केस्ट्रा” हे ही आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरला.
वरील सर्व कार्यक्रमाची माहिती देण्यात आणि नियोजनात निवे बु.|| मुंबई कमिटी अध्यक्ष तथा आंबेडकर स्मारक देवरुख या संस्थेचे अध्यक्ष अशोकजी जाधव, स्थानिक अध्यक्ष संतोष जाधव , राजू काशिनाथ जाधव (सचिव, मुंबई), स्थानिक सचिव संजय जाधव तसेच सर्व कमिटी पदाधिकारी यांचं मोलाचं सहकार्य लाभलं. विशेष म्हणजे या पूर्ण कार्यक्रमाचे प्रक्षेपण दिशा महाराष्ट्राची या न्युज चॅनेलच्या समाज माध्यमावर प्रक्षेपित करण्यात आले. या न्युज चॅनेलचे संपादक तुषार नेवरेकर तसेच पत्रकार दीपेश मोहिते यांचीही या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती. निवे बु. येथील एकूणच बुद्धविहार आणि कार्यक्रमाची पूर्ण पंचक्रोशीत चर्चा तसेच विशेष दखल घेण्यात येत आहे.