तथागत गौतम बुद्धांच्या विचारांनी जगही प्रबुध्द करू- मेघना सुर्वे
(दिशा महाराष्ट्राची- ठाणे)
सध्या वर्तमानपत्राचे कोणतेही पान वाचायला घ्या किंवा कोणतेही वृत्तवाहिनी पहा. त्यात कुठे दोन देशातील खदखदणारा सीमावाद दिसतो, तर काही ठिकाणी सुडाच्या भावनेने देशातील नागरिकांवर होणारे विषारी वायू हल्ले, कुठे प्रातवादासाठी केले जाणाऱ्या जीवघेण्या कारवाया, देशांत वाढता आतंकवाद, दहशतवाद तसेच ‘सर्व धर्म समभाव’ ही आपल्या देशाची ओळख असूनही धार्मिक भेद आहेच. रशिया आणि युक्रेन मधील युद्ध थंड होतोय तोपर्यंत सीरियातील वाढत असलेली यादवीमुळे झालेला नरसंहार आपण पाहिला आणि आपल्याच देशात देशांतर्गत फोफावणारा नक्षलवाद त्याचप्रमाणे आपल्या आजूबाजुला घडणारा कुटुंब कलह, स्त्री अत्याचार, मारामऱ्या, रक्तपाताच्या घटना… अशा कितीतरी बातम्या आपण दरोज वाचतो, पाहता आणि शांत डोक्याने ` काय चाललयं सध्या?’ अशा प्रतिकिया देऊन गप्प होतो.
आज जो तो सुखाच्या शोधात भटक आहेत आणि आजच्या युगात सुख म्हणजे पैसा.. आणि तो मिळविण्यासाठी मनुष्य कोणत्याही थराला जाऊ शकतो. आपल्या आजूबाजूला जे आज वातावरण तयार होत आहे त्याचे मुळ कारण म्हणजे मनाला न लाभलेले मानसिक समाधान होय. प्रत्येकजण कोणत्या का कोणत्या चिंतेत व विवेचनेत असतो. ज्याच्याकडे आर्थिक सुख आहे असा मनुष्यही दुःखी आणि ज्याच्याकडे हे सुख नाही तोही दुःखीच असतो. असे म्हणतात की, चिता आणि चिंता या दोन शब्दांमध्ये केवळ एका बिंदूचा फरक आहे. एक चिता मृत झालेल्या
मनुष्याला जाळते आणि दुसरी चिंता ही जिवंत माणसाला जाळत असते. एकुणच काय अगदी बालवाडीत शिकणाऱ्या मुलापासून ते मरणाच्या दारात उभ्या असलेल्या वृध्द माणसालाही कसली ना कसली चिंता सतावत असते. आज आपण जरी तंत्रयुगात जगत असलो आणि अगदी एका बटणाच्या क्लिकवर आपल्याला साऱ्या सुखसुविधांचा लाभ जरी मिळत असला तरी प्रत्येक मनुष्य प्राण्याला कसलेच समाधान मिळत नाही.
सांगायचं हे सारे सांगण्या मागचे प्रयोजन म्हणजे आज बुद्ध पौर्णिमा यानिमित्ताने तथागत गौतम बुध्द यांनी सांगितलेल्या तत्वांना आचरणात आणायला सुरवात करायला हवे. संपूर्ण जीवनात दुःखाचे मुळ कारण शोधणाऱ्या सिध्दार्थाला जेव्हा ज्ञान पाप्ती झाली तेव्हा तो सिध्दार्थाचा तथागत गौतम बुध्द झाला. अगदी ऐश्वर्यात लोळणारी सर्व सुखे पायाशी असणाऱ्या सिध्दार्थाने केवळ विश्वाचे कल्याण करण्यासाठी आई वडील, पत्नी यशोधरा, बाळ राहुल या साऱ्या सांसारीक आणि भौतिक सुखाचा त्याग करुन संपूर्ण जगाला शांतीचा, करुणेचा संदेश दिला. तथागतांचे कार्य आतच्या काळात खरे म्हणजे प्रेरणादायी आहे. त्यांनी सांगितलेले तत्वज्ञानही आज जगातील प्रत्येक थोर विचारवंतांनी मान्य केले आहे.इतकंच काय जगविख्यात विचारवंत कार्ल मार्क्सच्या विचारातही तथागत गौतम बुध्द डोकावतात. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेले `भगवान बुध्द आणि त्यांचा धम्म’ हा ग्रंथ जगातील सवर्च प्राणीमात्रांना बहाल केलेली देगणीच होय. तथागतांच्या प्रवचनांमध्ये इतके बळ होते की, वैशाली नगराची नगरवधू आम्रपाली, डाकू अंगूलीमाल यांना सदमार्गाची दिशा मिळाली. पिसाळलेला हत्ती नालागिरी शांत झाला आणि आपल्या मृत मुलाला जिंवत करायला सांगणाऱ्या किस्सा गौतमीला त्यांनी जीवन – मृत्यु हे शाश्वत असल्याचे पटवुन दिले आणि साऱ्या जगाला धम्माचे तत्वज्ञान सांगत त्यामागील वैज्ञानिकता सांगून प्रबुध्द केले. गौतम बुध्दांनी कधीच कर्मकांडाचा, तंत्रमंत्रांचा उपयोग केला नव्हता. बुध्द हे विज्ञानवादी होतेच, पण त्यांनी कधीच स्वत:ला थोर, महान समजले नाही. ते लोकांना सांगत की,“ मी देव नाही वा देवाचा प्रेषित नाही, मी तुमच्या सारखाच हाडामासाचा माणूस आहे आणि मी जे तुम्हाला सांगातो ते स्वत:ला पटले तरच आत्मसात करा , मी सांगतोय म्हणून काही करू नका”
भारताला अनेक संस्कृतीचा भला मोठा वारसा लाभला आहे. त्यातलीच आपली बौध्द संस्कृती फार प्राचिन मानली गेली. अनेक लेणी, प्राचिन मंदीरे याचा मुकपणे इतिहास सांगतात. आर्यांच्या आक्रमणांने ही संस्कृती भारतातून हद्पार झाली खरी, पण शेकडो वर्षांनंतर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हाच बौध्द धम्म भारतात आणला. जातीव्यवस्थेला चिरडून माणसाला माणूस म्हणून घडविणारा हा धम्म आज जगातील इतर प्रमुख धर्मांपैकीच श्रेष्ठ मानला जातो. आशियाई देशाबरोबरच युरोप, अमेरिका अशा सात खंडात लाखोंच्या संख्येने बौध्द अनुयायी आपल्याला दिसतील. गौतम बुध्दांची इतकी लोकप्रियता पाहून काही धुर्त मनुवाद्यांनी त्यांना विष्णूचा अवतार मानले. आजही अनेक देवळात ,मंदिरात आणि लेण्यात बौध्दकालीन संस्कृतीच्या खुणा सापडतात. भारतात अशी कितीतरी प्रसिद्ध देवळे आहेत ज्यात बुद्धांच्या मूर्तीचे इतर धर्माच्या देवांमध्ये शेंदूर लावून रूपांतरण केले. काही वर्षांपूर्वी अयोध्यातील वादग्रस्त जागेवर राम मंदिर बांधण्यासाठी जमीन खोदली गेली तेव्हा त्यात तथागत गौतम बुद्धांच्या मुर्त्या सापडल्या म्हणजे इथल्या मातीतही शेकडो वर्ष ‘बुध्द’ रुजलेला आहे हे सिद्ध होते.
चक्रवर्ती राजा सम्राट अशोक कलिंगच्या युध्दावेळी प्रचंड प्रमाणात झालेल्या नरसंहार पाहून हताश झाला होता. वास्तवात तो जरी जिंकला असला तरी इतका रक्तपात पाहून तो मनाने मात्र हरला होता. त्याला तथागतांच्या बौध्द धम्माने त्याला शांतीचा मार्ग दाखवला. बौध्द धम्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी त्यांनी आपल्या राज्यात आणि राज्याबाहेर अनेक लेणी, स्तुप बांधली, अनेक धम्माचे ज्ञान बालपणापासूनच मुलांमध्ये रुजविण्यासाठी त्याने तक्षशिला,नालंदासारखी अनेक विद्यापिठे, शाळा बांधल्या. इतकेच नाही तर त्याने आपला मुलगा महेंद्र आणि मुलगी संघमित्रा यांना बौध्द धम्माच्या प्रचार व प्रसारासाठी श्रीलंकेत पाठविले होते. आज भारताच्या संविधानाची शान असणारे अशोकचक्र बुध्द धम्माचीच देण आहे.
चीन, जपान, म्यानमार अशा जगातील प्रगत देशाने बुध्दाचे तत्वज्ञान स्विकारले आहे. आपल्या भारतीय घरामध्ये दिवाणखान्यात आणि शोपीस म्हणून तथागत गौतम बुध्दांच्या मुर्त्या, तसबीरी आल्या पण त्यांचे विज्ञानवादी आणि अहिंसेचे विचार आपल्यात रुजले गेले नाहीत. इकडे फक्त काही जण कर्मकांडाला खतपाणी घालणाऱ्या धर्माला गोंजारतात.आपल्या मुलांना आपल्या धम्मातील पंचशील व त्रिरत्ने त्यांना पाठ नसतात. काही आपल्यातीलच महाभाग तर नवसाला पावणाऱ्या देव देवतांचे दर्शन घ्यायला तासनंतास रांगत उभे राहतात. पण दर रविवारी सर्व कुटुंबियांसोबत बुध्द विहारात जाण्यासाठी त्यांना वेळ नसतो. हीच आपल्या धम्माची सर्वात मोठी शोकांतिका म्हणावी लागेल.
आज प्रत्येक घरा घरात बौध्द संस्कार रुजवायची वेळ आली आहे. तसेच प्रत्येक घरात बुद्ध पौर्णिमा साजरी होणे गरजेचे आहे. त्यासाठी मुलांनाही पंचशील, त्रिरत्न, बुध्द वंदना याचे ज्ञान द्यायला हवे. पिढ्यान पिढ्या धम्माचे संस्कार रुजवणे गरजेचे आहे. आपले कुटुंब बुध्दमय झाले तर समाज हाईल. समाजानंतरच संपूर्ण भारत देशच बुध्दमय होईल आणि हेच स्वप्न आपल्या डॉ. बाबासाहेबांनी पाहिले होते.सुरवातीला सांगितल्याप्रमाणे जागतीक पातळीवर वाढता अहिंसावाद आहे तो कुठेतरी थांबायला हवा. त्यासाठी प्रत्येकाने युध्दाऐवजी बुद्धांनी दिलेल्या मार्गाचा अवलंब करायलाच हवा. ‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ म्हणणाऱ्या तथागतांनी सांगितलेले अष्टांगिक मार्ग, पंचशील व त्रिरत्ने हे आपल्या जीवनाला नवी कलाटणी देणारे आहे. आज बुद्ध पौर्णिमा आहे. त्या निमित्ताने तरी आपण साऱ्यांनीच तथागातांनी दिलेल्या प्रज्ञा, शिल, आणि करुणा या सुत्रांचा मनापासून स्विकार करुन बुद्धांच्या धम्माला शरण गेलो तरच आपण सारे आणि हे विश्व प्रबुध्द होऊ शकते. हीच आजच्या बुद्ध पौर्णिमा दिनानिमीत्त अपेक्षा !