सूर्या तुझ्या दिशेने- समीक्षण- अर्चना उके चव्हाण
(दिशा महाराष्ट्राची/ नागपूर)
लेखणीच्या सहाय्याने तुझ्या पर्यंत पोहचले थेट,
मित्रा ही आपली अनोखी भेट
प्रत्येक भेटी मागचं काही तरी कारण असतं
त्यातूनच अनोखं नातं निर्माण होत असतं.
सूर्या तुझ्या दिशेने हा गझल काव्य संग्रह माझे साहित्यिक मित्र रमेश बुरबुरे यांनी मला गेल्या दोन वर्षा पुर्वी भेट म्हणून दिला आहे. मी अधून मधून हा काव्य संग्रह वाचनास घेत असते. मला गझल लिहीण्याचा गंध नाही परंतु वाचण्याचा छंद जोपासते आणि थोडं फार लिहीण्याचा प्रयत्न करत असते.
या गझलकाराच्या (रमेश बुरबुरे) रचना मनाला मनापासून भावल्या, आवडल्या म्हणून मी थोडं मोजक्या शब्दांतून व्यक्त होण्याचा साधक बाधक प्रयत्न केला. त्यांनी सरळ, सोपी, साधी व सहजच कळेल अशा सुबक भाषेतून हृदयस्पर्शी लिखाण केले आहे.
सूर्या तुझ्या दिशेने
हा काव्य संग्रह महासूर्याच्या म्हणजेच बाबासाहेबांच्या विचारांना मानवी मेंदूत रुजविण्याचे लक्षणीय कार्य माझे सहयोगी मित्र करतांना दिसत आहेत. गझलकार रमेश बुरबुरे हे स्वतःला आजीवन विद्यार्थी संबोधतात. कारण शिक्षण अशी संजीवनी आहे जी आपण आपल्या आयुष्याच्या शेवट पर्यंत मिळवू शकतो. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे ते जो प्राषण करेल तो गुरगुरल्या शिवाय राहणार नाही.
रमेश दादा म्हणतात माझे लिखाण स्वतःला मोठे करण्यासाठी नसून पिचलेल्या पण कधीच न खचलेल्या लोकांना प्रकाशीत करण्यासाठी या गझल संग्रहाच्या माध्यमातून व्यक्त होऊन प्रेरणा देण्याचे अतुलनीय कार्य करत आहे. त्यांनी जे अनुभवले तेच लेखणीतून टिपले व सत्यात उतरवले.
शांत झालेली आग
पेटू लागली परत
हरवलेली दिशा
दिसू लागली परत
विसरुन गेलेले स्वप्न
रंगू लागले परत
असा वरील गझल काव्य संग्रहाचा निष्कर्ष निघतो.
घे जरा जयभीम कर नमो बुद्धाय मित्रा
माणसांना जोडण्याचा ना दुजा पर्याय मित्र
आघात झालेले मन
आक्रोश करू लागले
जयभीमच्या जयघोषाने
मानवी मनातील ज्वालामुखीला उधाण येऊ लागले….
मनाची मलीनता सद्धम्म दूर करते. करुणामय मैत्रीचे बीज जनामनात पेरले जाते.
आमच्या आयुष्यातील सूर्याचे तेज म्हणजे बाबासाहेबांचे बळकट, प्रेरणादायी व सकारात्मक अनमोल विचार होत. या सोनेरी सूर्याची वाट आपण सदा जपूया असे आव्हान या गझल संग्रहाच्या माध्यमातून परिवर्तनशील कार्य सातत्याने करतांना गझलकार रमेश दादा दिसत आहेत. बाबासाहेबांचे तेजस्वी विचार म्हणजे आमच्या प्रगतीची साक्ष होय. आमच्या आयुष्यात पडलेली ज्ञानाची किरणं अमूल्य आनंद देऊन जातात. येणारा प्रत्येक दिवस आम्हाला जगण्याची ऊर्जा, प्रेरणा व शिकवण देऊन जाते.
आज संविधानाच्या पुस्तकावर जरी बाबासाहेबांची स्वाक्षरी आहे तरी तेथे दिलेल्या अधिकारंचा पुरेपुर उपयोग होत आहे असे वाटत नाही. राज्यकर्ते आपले कल्याण करतील, सत्तेला जाणतील असे भोळे मत आजही आमच्या सोबत आहेत. लोकांना दिशाभूल करून मुर्ख बनविल्या जात आहे. यामुळे काळाबाजारी व बेरोजगारी वाढली आहे. या कडे आम्ही आवर्जून लक्ष दिले पाहिजे.हा आशय एवढे उपकार आहे. या रचनेतून लक्षात येतो.
गोंदला जयभीम आम्ही काळजावर,
स्वाक्षरी आहे तुझी ज्या पुस्तकावर
मी आणलेल्या समतेच्या रथाला माझ्या बांधवांनो तुम्ही सावरून धरा कारण ही वाट मी मोठ्या कष्टाने व परिश्रमाने, कित्येक जंगले दर्या खोरे तूडवीत, सागरी लाटांचा मारा सहन करीत आणला आहे. वरील आशय मी निळे वर्तूळ या रचनेतून लक्षात येतो.
खून सत्याचा कुणी योजून केला.
साक्षही देतील मुडदे झाकलेले.
अतोनात चिंता असूनही माझी रमाई घाबरली नाही,दीनपणाने हरली नाही. ही पुण्यायी माते तुझ्या मुळेच आज आम्हा लाभली. बाबासाहेबांना विद्वत्तेच्या शिखरावर नेऊन ठेवणारी दिव्य शक्ती तू, जणू चंद्राची शीतल छाया तू. सदर आशय चंद्रमा सारखी या रचनेतून गझलकार व्यक्त करत आहेत.
झेलले चारही हे ऋतू जीवनी,
बदलली ना कधी मौसमा सारखी.
समाजाचा विटाळ असून शेणाचा मरा सोसणारी, शाळेची पायरी कायम चढविणारी, मुलींच्या शिक्षणाची दारं उघडी करणारी, शिक्षणाची बीजं रोवून पाहिला अभ्यासाचा धडा गिरवणारी क्रांती ज्योती सावित्री. लढलीस तू खांद्याला खांदा लावून ज्योतीबांच्या तलवारीच्या पात्यांपरी सदर आशय विज ती होऊन लढली या रचनेतून लक्षात येतो.
शिक्षिका झाल्या लाखो या जगी पण
मायची आलीच नाही सर कुणाला
लिहिणाऱ्याचे शब्द लेखणी टिपत असते. अचूक उतरण्याची तिची सतत तयारी असते. रमेशा तुझ्या शब्दात ती जादू दिसते जी शोधून पण कुणाकडे नसते. मित्रा तुझ्या मनातील भावनांना तुझ्या धारदार लेखणीची जोड मिळाली तेव्हा अक्षरे गिरवू लागली तलवारीच्या पात्यांवरती….!
वरील आशय सूर्या तुझ्या दिशेने या रचनेतून गझलकार रमेश दादा व्यक्त होतांना दिसत आहेत.
सूर्या तुझ्या दिशेने मी झेप घेतलेली
भलतीच थक्क झाली दुनिया बघून सारी….!
जेव्हा बाबासाहेब चालत तेव्हा अनेकांचे हृदय भरून येई.खूप कर्तृत्ववान, जो बाबांनी हात आम्हाला दिला तर सारा इतिहासच बदलला. हा आशय सर्व नार्रांच्या वरी या रचनेतून आपल्या लक्षात येतो.
१) काय सांगू काय आहे आज जयभीम
चळवळीच्या आमच्या आगाज जयभीम
२) रक्त सळसळते कुणी नारा दिला तर
सर्व नार्रांच्या वरी सरताज जयभीम
तुम्ही किती अंतर चालत गेलात त्या पेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात हे महत्वाचे आहे. असे अवर्णनीय कार्य मित्रा तुझ्या क्रांतिकारी लेखणीतून तू घडण्याचा प्रेरणादायी प्रयत्न करत आहे….!!!
वरील आशय सदा कटिबद्ध आहे
या रचनेतून स्पष्ट होतो.
काल होतो आजही उपलब्ध आहे
धम्म कार्याला सदा कटिबद्ध आहे.
मी म्हणेल तो न्याय म्हणजेच सत्तेवर त्याच्या निर्णया नुसार त्याचे अधिराज्य असेल.एखाद्याच्या हातात सत्ता आल्यास सामाजिक, आर्थिक व्यवस्थेवर दुष्परिणाम होऊ लागतात. राजकिय अर्थव्यवस्थेवर आघात येतो. मूठभर लोकांची पिळवणूक केल्या जाते. अनेक संघटना निर्माण करून स्वतःचा स्वार्थ साधला जातो. संघटनेचे अनेक तुकडे न करता एकच संघटना असल्यास एकीला बळ येईल व बाबासाहेबांच्या विचारांना एकजुटीने पुढे नेता येईल. तेव्हा निळाई निळ्या गगनात स्वच्छ पणे एकीने कार्यक्षम राहील.
वरील आशय पोरगी माझी नाजूक या रचनेतून लक्षात येतो.
१) आमचे नेते निघाले फक्त सत्ता भोगणारे
एकही वाली न झाला बा भीमा प्रमाणे….
२) शेपटी हलवू नको रे लांडग्यासमोर कोण्या
पाहिजे वागायला तू लेकरा वाघाप्रमाणे
१) तुझीच तुला आहे ओळख
का होतेस इतकी त्रस्त
जाणून घे तू तुझे अस्तित्व
लेखणीच्या पाती जणू तूझे शस्त्र
स्पर्श केला तर तुझा पडल फडशा
गाय तू समजू नकोस या वाघिणीला
२) क्रुरतेच्या जाळ्याला
कर जाळून भस्म खुशाल
दिव्याची तू ज्योत नसून
क्रांतीची आहेस मशाल
तू कमी समजू नको रणरागिणीला
बांधून बारूद फिरते ओढणीला
वरील आशय बांधुनी बारूद फिरते या रचनेतून स्पष्ट होतो आहे.
आमच्या आयुष्यातील प्रत्येक वळणावरील सकाळ ज्या महासूर्याच्या विचारांनी झाली आहे त्यांच्या मुळेच नवा दिवस, नवीन कल्पना, नव चैतन्य, नवा उत्साह व एक नवा विचार, नवा संकल्प घेऊन उगवत आहे. हा आशय धरूनी बोट सूर्याचे या रचनेतून स्पष्ट होत आहे.
तिमीराच्या दरार्याने आता उजळायला पाही
धरूनी बोट सूर्याचे नव्याने या दिशा दाही…..!
माणसाला माणसाशी जोडतो भीम आहे.जगाला शांतीचा संदेश देणारी भीमबुद्धांची वाणी आहे.हा आशय खर्याचा जीव घेणारे या रचनेतून स्पष्ट होतो आहे.
१) खर्याचा जीव घेणारे विनाकारण नको आहे
तुझ्या देशात बुद्धा हे शासन नको आहे
२) जयंती साजरी करतो भीमाची धुमधडाक्याने
घरी माझ्या मला दसरा दिवाळी सण नको आहे.
पेटता दिसता मला दुसऱ्या कुणाची झोपडी
या भावस्पर्शी गझलेच्या ओळीतून एकमेकांत सहकार्याची भावना जागृत असावी. शेजारील घर जळत असतांना आपलेही घर जळल्या शिवाय रहात नाही. म्हणून त्यांची वेळीच मदत करून सहकार्य करावे. महामानवाचे तत्व अंगिकारणार्यांच्या मनात करुणा, मैत्री सदा वास करते.
कोण आपुले कोण परके हेच समजत नाही. कधी कधी विश्वास हा एक संभ्रम असतो. विश्वासघातकी आमच्या जवळच असतात. ह्याचे उदाहरण म्हणजे आजच्या काळात निर्माण झालेली गटबाजी. हा लपंडाव अनेक माध्यमातून आपल्या निदर्शनास येत आहे.
प्रवाहा विरुद्ध वाहणाऱ्यांना घेऊन समतेच्या प्रवाही !
वरील आशय शृंखला जातीयतेच्या या रचनेतून स्पष्ट होतांना दिसत आहे.
वाढवा सगळे मिळोनी धम्मचक्राच्या गतीला
अन्यथा ठरणार कारण हे स्वतःच्या अवनतीला
खोली जब मेरे भीमने किताब
हर शख्स बन गया विद्वान
किया जब कलम ने हिसाब
तब बना इस देश का संविधान
वरील आशय रक्षा तुझी नि माझी या रचनेतून स्पष्ट होत आहे
जे हक्क पाहिजे ते सारेच दान करते
रक्षा तुझी नि माझी संविधान करते
त्या महासूर्याच्या तेजाने सोनेरी पहाट मंद वाहणाऱ्या वार्याची झुळूक घेऊन येते. कोवळी किरणे मंद प्रकाशझोत देऊन जातात. हा आशय बस निळ्या शाईमुळे या रचनेतून लक्षात येतो. बाबासाहेबांचे सकारात्मक विचार आमच्या जीवनातील उर्जेचे स्त्रोत होय. भंगार झालेल्या आयुष्यातील काळोखाला ज्ञानरुपी किरणांनी उजळून काढले व दुर्लक्षितांना ज्ञानाच्या अथांग सागराने अक्षररुपी तरंग दिले. बाबासाहेबांच्या परिश्रमाचा थेंब थेंब शाई होऊन कागदावर आकार घेत आहे.
१) एकट्याने कार्य बाबा काल केले
तू स्वतःच्या जीवाचे हाल केले.
२) बस निळ्या शाईमुळे तर जिंकला तो
बा भीमाने हात कोठे लाल केले.
बुद्ध, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारधारेला साहित्याच्या माध्यमातून मानवी मेंदूला परिवर्तीत करण्याचे व चालना देण्याचे कार्य सातत्याने माझे साहित्यिक बंधू अवर्णनीय असे कार्य करत आहेत. बुद्ध, फुले, शाहू ,आंबेडकर या महामानवांच्या कार्याला त्रिवार अभिवादन करते तसेच माझ्या साहित्यिक मित्राला पुढील वाटचालीस हार्दिक मंगलमय शुभेच्छा देते आणि नव नवीन काव्य माला अशीच बहरत राहो, फुलत असो ही सदिच्छा व्यक्त करते.
◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆◆
अर्चना उके चव्हाण, नागपूर.
8624062012
डॉ. बाबासाहेब आंबेडकर साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र (रत्नागिरी) – नागपूर जिल्हाध्यक्षा