कोकणातील लोककला संवर्धनासाठी कोकण आयुक्त कार्यालयात स्वतंत्र विभाग निर्माण करावा- डॉ. विनय नातू
(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर- उदय दणदणे)
कोकणातील नमन व जाखडीनृत्य (कलगी- तुरा) व पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या अन्य लोककला व लोककलावंतांना राजाश्रय मिळावा यासाठी कोकणातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी विविध अधिवेशनात व विधानसभेत सरकारचे लक्ष वेधत आहेत. गेली अनेक वर्षे लोककला आणि लोककलावंतांचे नेतृत्व करणाऱ्या मातृसंस्था, नमन लोककला संस्था (भारत) मध्यवर्ती मुंबई व कलगी तुरा समाज उन्नती मंडळ (मुंबई) यांचे सातत्याने शासनाकडे पाठपुरावा चालू आहे त्याला कुठेतरी यश प्राप्त होताना दिसत आहे.
भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष व गुहागर तालुका माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी कोकण प्रदेशातील लोककलांचे संवर्धन करण्याकरीता सांस्कृतिक विभागामार्फत स्वतंत्र समिती निर्माण करण्याबाबत महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे दि. २१ मार्च २०२३ रोजी पत्राद्वारे काही महत्वपूर्ण मागणी केली आहे. पनवेल ते बांदा दक्षिण कोकणाच्या प्रदेशामध्ये अनेक लोककला दिवसेंदिवस लोप पावत चालल्या आहेत. या सर्व लोककलांचे जतन, संवर्धन होणे हे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी शासनाने काही उपाय योजना करणे आवश्यक आहे असे गुहागर तालुका मा. आमदार डॉ. विनय नातू यांनी पत्रात नमूद केले आहे. त्याचबरोबर कोकणातील नमन, जाखडी नृत्य (कलगी- तुरा), शेतीची कामे करीत असताना शेतीची विविध म्हणावयाची गाणी, अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांमधील पारंपरिक गाणी या सर्वांचे जतन होण्याचीआवश्यकता आहे. या करीता शासकीय सांस्कृतिक विभागातील अधिकाऱ्यांची समिती तसेच नोंदणीकृत असलेल्या काही लोककलाकारांच्या संस्था यांची संयुक्त समिती बनवण्यात यावी असे डॉ विनय नातू यांनी पत्रात म्हटले आहे.
त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर लोककलाप्रमाणे नमन, जाखडी, दशावतार यांना लोककलांचा दर्जा मिळावा, इ. १० वीच्या अभ्यासक्रमात लोककलांचा अभ्यासक्रम बनविण्यात यावा, सांस्कृतिक मंत्रालयाकडून महोत्सवाचे आयोजन करावे, कलाकारांच्या मानधन योजनेप्रमाणे नमन, जाखडी, यातील कलाकारांना मानधन देण्यात यावे तसेच कोकण आयुक्त कार्यालयात या करीता स्वतंत्र विभाग निर्माण करावा व नमन लोककला संस्थांना यामध्ये सहभागी करू घ्यावे, सदर विषय विद्यापीठामध्ये संशोधनाकरीता देण्यात यावा असे मुद्दे, सूचना विचारात घ्यावे असे सदर पत्रातून भारतीय जनता पार्टी (उत्तर रत्नागिरी) जिल्हाध्यक्ष तसेच गुहागर तालुका माजी आमदार डॉ. विनय नातू यांनी ही महत्वपूर्ण मागणी केली आहे.