९ एप्रिल २०२३ रोजी गुहागर येथे विद्यार्थ्यांसाठी सीमाशुल्क अधिकारी सत्यवान रेडकर यांचे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यानाचे आयोजन
(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर/ उदय दणदणे)
शिक्षण हे आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक आवश्यक साधन आहे. शिक्षणाने जीवनात अनेक मार्ग सुकर होत असतात. उच्च स्तरीय शिक्षण लोकांना सामाजिक आणि कौटुंबिक आदर ठेवण्यास आणि एक वेगळी ओळख निर्माण करण्यास मदत करते. शिक्षणाचा काळ हा सामाजिक आणि वैयक्तिकरित्या सर्वांसाठी महत्वाचा काळ असून आपले जीवन समृद्ध अधिक गतिमान होण्यासाठी तरुणांना करिअर आणि व्यवसायिक विषयी मार्गदर्शन होणे काळाची गरज आहे.
हीच काळाची गरज ओळखून गुहागर तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते संयोजक प्रशांत भेकरे, महेश शिगवण, संतोष गावडे, दिनेश कदम तसेच जनविकास समिती पालपेणे (कुंभार वाडी) गुहागर यांच्या विशेष सहकार्याने गुहागर तालुक्यात रविवार दिनांक ०९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ९. ३० वा. श्री छत्रपती शिवाजी महाराज सभागृह, पहिला माळा, पाटपन्हाळे ग्रामपंचायत ता. गुहागर, आणि दुपारी १२.०० वा. वरदान न्यू इंग्लिश स्कूल, पालपेणे, ता. गुहागर येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनपर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
आजवर १५० हुन अधिक विविध ठिकाणी शासकीय स्पर्धा परीक्षा संदर्भात संपूर्ण कोकण तसेच महाराष्ट्रात आपल्या शैक्षणिक व्याख्यानांनी जनजागृती करणारे, कोकणात शासकीय कर्मचाऱ्यांचे गाव निर्माण करण्यासाठी अविरतपणे शैक्षणिक ज्ञानदान करणारे, कोकण भूमिपुत्र, तसेच मुंबई सीमाशुल्क (भारत सरकार) कनिष्ठ अनुवाद अधिकारी मा. सत्यवान यशवंत रेडकर यांचे अमूल्य मार्गदर्शन गुहागर मधील विद्यार्थ्यांना, युवक- युवतींना नियोजित ठिकाणी दिलेल्या वेळेत, निशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन होणार आहे.
भविष्यातील सरकारी अधिकारी घडविण्यासाठी ही एक शैक्षणिक चळवळ असून गुहागर तालुक्यातील सर्व विद्यार्थी, युवक- युवतींनी बहुसंख्येने उपस्थित राहून निशुल्क व्याख्यान शैक्षणिक मार्गदर्शनाचा आवश्यक लाभ घेऊन कालानुरूप आपल्या जीवनात आमूलाग्र बदल करून परिवर्तित व्हावे, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संयोजक प्रशांत भेकरे आणि सहकारी यांनी केले आहे.
उपस्थितांनी सदर व्याख्यानमालेत वही पेन सोबत घेऊन येणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी – ९५९४९८४२०९ / ७७६८०७५६३१ / ९८८१७७६१२३ / ९६८९०७१४९९ या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा असे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे