गोवंडीमध्ये संकल्प संस्थेचा असंघटित कामगार महिलांसोबत जागतिक महिला दिन साजरा
(दिशा महाराष्ट्राची/ गोवंडी/ अश्विनी निवाते)
गोवंडी विभागातील शिवाजी नगर मधील समाज कल्याण केंद्र येथील भव्य सभागृहात वस्ती स्तरावर नागरिकांच्या मूलभूत गरजांच्या संदर्भात व्यापक काम करणाऱ्या संकल्प संस्थेचे अध्यक्ष विनोद हिवाळे यांच्या नेतृत्वाखाली जागतिक महिला दिन कार्यक्रम शनिवार २५ मार्च २०२३ रोजी करण्यात आले होते.
या प्रबोधनात्मक कार्यक्रमाच्या समन्वयक शकीला तांबोळी यांनी शिस्तबद्धरीत्या आखणी केली होती. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य नशा बंदी मंडळ सरचिटणीस वर्षा विद्या विलास, महाराष्ट्र राज्य अंधश्रद्धा निर्मूलन कार्यकर्ता वंदना शिंदे, अभिनेत्री, नृत्यांगना, मॉडेल व इंडिया नेक्स्ट सुपर मॉडेल २०२३ स्मिता धुमाळ, पी. एस. आय. दिपाली पावसे, ए. पी. आय प्रियंका चव्हाण, सामाजिक कार्यकर्त्या स्मिता कवडे उपस्थित होत्या. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संकल्प संस्थेच्या वनिता सावंत आणि कार्यक्रमाची प्रस्तावना सविता हेंडवे यांनी सादर केली.
सदर कार्यक्रमामध्ये असंघटित क्षेत्रातील १२० महिलांनी मोठ्या प्रमाणात हिरीरीने सहभाग नोंदवला होता. शिवाय या कार्यक्रमामध्ये महिलांसाठी स्त्री पुरुष समानता विषयावर साप सीडी खेळाच्या माध्यमातून चर्चासत्र घेण्यात आले. तसेच विविध मनोरंजन खेळाच्या माध्यमातून सामाजिक विषयावर प्रबोधनात्मक स्पर्धा घेऊन विजेता महिलांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले. पोषण आहार या विषयावर महिलांनी कौशल्यपूर्ण पथनाट्य सादर केले. फरीदा अत्तार यांनी आई या विषयावर एक खूप छान गीत सादर केले. तर उपस्थित मान्यवरांनी महिलांना अतिशय मोलाचे मार्गदर्शन लाभले. सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांना संकल्प संस्थेतर्फे सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
राजू जगताप, मंगेश पडवळ, सूर्यकांत चव्हाण, प्रमोद गायकवाड, प्रकाश पवार यांचे कार्यक्रमाला विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीमा परीहार, कपिल क्षीरसागर, विनोद कांबळे,अशपाक तांबोळी यांनी खूप मेहनत घेतली.
कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेल्या सर्व महिलांना संकल्प संस्थेने भेटवस्तू देण्यात आली. कार्यक्रमाची सांगता आणि आभार प्रदर्शन कपिल क्षीरसागर यांनी केले.