व्यर्थ न हो बलिदान ! – मेघना सुर्वे
(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई)
भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास आपण साऱ्यांनीच शाळेत वाचला असेल. ब्रिटीशांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळावे यासाठी अनेक देशभक्तांनी, क्रांतीकारकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. अगदी १३- १४ वर्षाच्या शिरीषकुमारपासून ते २०- २५ वर्षाच्या भगतसिंग , राजगुरु, सुखदेव सारख्या तरूणांनीही देशासाठी हौतात्म पत्करले. ‘प्राण गेला तरी बेहत्तर, पण देश स्वतंत्र झालाच पाहिजे या इर्षेने पेटलेल्या देशभक्तांनी अनेक आंदोलने, मोर्चे, प्रभातफेऱ्या, उपोषणे केली. संपूर्ण देश एकजूट होऊन स्वातंत्र्याची पहाट होण्याची वाट पाहत होता. शेवटी देश स्वातंत्र्याच्या ध्यासाने पछाडलेल्या वीरांच्या बलिदानातून तो सोन्याचा दिवस उजाडला आणि १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपला भारत स्वातंत्र्य झाला .
हे सारं लिहिण्याचं कारण म्हणजे आज २३ मार्च ‘शहीद दिवस’. कदाचित बहुतेकांना या तारखेच महत्व माहित नसेल. थोडक्यात सांगायच झाले तर २३ मार्च हा भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव या क्रांतीकारकांचा स्मृतीदिन होय. गेल्या काही वर्षात समाज माध्यमातून या दिवशी देशभक्तीचे स्टेटस लावलेले दिसतात. आजच्याच दिवशी या तिघांना फाशीची शिक्षा देण्यात आली होती. या मागचा इतिहास पाहिला तर ‘सायमन कमिशन’ला विरोध होत असताना देशभरात ‘सायमन गो बॅक’ ही मोहिम चालवली गेली होती. १९ २८ रोजी सायमन कमिशन लाहोर शहरात गेले असताना तेथे लाला लजपतराय यांच्या नेतृत्वाखाली निर्दशने सुरु झाली. पोलिसांनी केलेल्या बेदम लाठी हल्ल्यात लालजींना बराच मार लागला आणि नंतर काही दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. याचा बदला घेण्यासाठी भगतसिंग आणि त्यांच्या अन्य क्रांतीकारी मित्रांनी स्कॉटची हत्या करण्याचे ठरवले. लालाजींच्या मृत्यूला कारणीभूत झालेल्या स्कॉट ऐवजी त्याचा सहकारी सॉन्डर्सवर गोळी झाडली. पुढे ‘डिस्प्युट बिल आणि पब्लिक सेफ्टी बिल हे अन्यायकारक कायदे ब्रिटिश सरकारने मंजूर करून घेण्यासाठी केंद्रीय विधानसभेपुढे आणले असता प्रेक्षकात कमी शक्तिशाली बॉम्ब टाकून व ब्रिटिश सरकारच्या धिक्काराची पत्रके भिरकावून भगतसिंग आणि त्याच्या सहकाऱ्यांनी ब्रिटिश सरकारला हादरून सोडले. पण ते पकडले जाऊन त्यांच्यावर खटले भरले. तुरुंगात असताना देखील या तरुण क्रांतीकारांनी तुरूंगातूनच आपले क्रांतीकारी विचार रुजवायला सुरुवात केली होती. त्यांना मरणाची भीती नव्हतीच. उलट भगतसिंग म्हणायचा ”जिंदगी तो अपने दम पर जी जाती है , दुसरो के कंधोंपर तो सिर्फ जनाजे उठाये जाते है.“ पुढे भगतसिंग , राजगुरू आणि सुखदेव यांची फाशी रद्द व्हावी यासाठी देशभर आंदोलने, मोर्चे निघाले परंतु नंतर न्यायालयाच्या निर्णयानुसार या तिघांना लाहोरच्या तुरुंगात २३ मार्च १९३१ रोजी फाशी देण्यात आली. अवघ्या २३- २४ वर्षाच्या तरूण वयात हे तिघे शहीद झाले.
भगतसिंग ,सुखदेव व राजगुरू यांचे चरित्र आपण सिनेमा आणि पुस्तकातून जाणले असेल पण प्रत्यक्षात आयुष्यात या क्रांतीकारकांसारखे तरुण आजच्या युगात सापडणे जरा कठीण आहे. आपले सर्वस्व देशाला अर्पण करणाऱ्या या क्रांतीकारी तरुणांचा जोश काही वेगळाच होता. सशस्त्र क्रांती युवकांना आकर्षिक करीत होती. जालियनवाला बाग सारखे हत्याकांड देशातील गावागावात- शहरात आणि गल्ली बोळात घडत होते. त्यात अनेक अबाल – वृद्ध, स्त्री- पुरूष, तरूण- विद्यार्थी यांना आपले प्राण गमावावे लागत होते. याचा राग प्रत्येकाच्या मनात खदखदत होता आणि याचा स्फोट होऊन प्रत्येक घरात क्रांतीची मशाल पेटून उठली. शेवटी याच मशालीने पुढे आपल्या सार्यांना स्वातंत्र्याचा प्रकाश दाखवला. कित्येकांच्या त्यागातून, समर्पणातून मिळालेल्या या स्वातंत्र्याला जीवापाड जपणे हे आपले सर्वांचे आद्य कर्तव्य आहे.
देश स्वातंत्र्य होऊन ७५ वर्ष झाली तरी आजही आपण अनेक समस्यांनी ग्रासलेले आहोत. जागतिक पातळीवरचा दहशतवाद, बेरोजगारी, बेकारी, दारिद्र्य , भ्रष्टाचार, दिवसा ढवळ्या होणारे स्त्रियांवरील अत्याचार, राज्यात पसरणारा दुष्काळ, गगनाला भिडणारी महागाई, समाजात असणारा पराकोटीचा जातीवाद-धर्मवाद, गावागावात असणारा शिक्षणाचा अभाव यातून उद्भवणारी गुन्हेगारी या प्रत्येकाचा परिणाम कळत नकळत इथल्या लोकांवर किंबहुना युवा पिढीवर होतो. केशरी, पांढरा, हिरवा, निळा असे रंग शौर्य, शांती, समृद्धी, प्रगती याचे प्रतिक असणाऱ्या तिरंग्यासाठी अनेकांनी आपल्या छातीवर गोळ्या झेलल्या आहेत. पण आता याच रंगांची विभागणी होऊन वेगवेगळे जाती, धर्म, पक्ष स्थापन झाले. तरूणांना हाताशी धरून गल्ली-बोळातून नवनवे पक्ष स्थापन करून ‘कार्यकर्ता’ तयार करणी फॅक्टरी निर्माण होऊ लागली. देशभरात कुठेना कुठे जातीय दंगली, बॉम्बस्फोट, जाळपोळ होतात आणि याचा निषेध करण्यासाठी मग दगडफेक, मुंबई बंद, नाकाबंदी, दुकानांची नासधुस, सरकारी मालमत्तेचे नुकसान या तरुणांकडून करवून घेतले जातात. त्यांची माथी भडकवली जातात.
कॉर्पेरेट विश्वात राहून फक्त नाव, पैसा मिळवायचा, उच्चशिक्षण घेऊन मोठ- मोठ्या आंतराष्ट्रीय कंपन्यात नोकरी मिळवायची किंवा कायमच परदेशात स्थाईक होण्याची स्वप्न पाहणारे तरूण फक्त स्वत:चाच विचार करतात. ‘दुसरा मरतोय ना मरु दे मला काय त्याचं, त्या पेक्षा आपल मस्त चाललंय“ म्हणत आयुष्य आनंदात जगत आहेत. नशेत तरर॑र होऊन गाडी चालवून फुटपाथवरच्या लोकांना चिरडणाऱ्या अभिनेत्याला आजची युवा पिढी ‘आयडल’ मानत आहे. पण ज्यांनी केवळ देशाच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या देशबांधवाच्या कल्याण्यासाठी सारं आयुष्य पणाला लावलं अशा भगतसिंग, राजगुरु, सुखदेव यांच्यासारख्या युवकांचा आदर्श मात्र कोणाला फारसा घेता येत नाही. आजचे तरूण पद, पैसा, प्रतिष्ठच्या मागे धावत आहेत. त्यासाठी रोज नव नवी स्वप्ने जन्माला येतात. कोणाला अभिनेता, इंजिनियर, डॉक्टर, गायक बनून सुखमय जीवन जगायच आहे. पण ‘मला या देशासाठी काही तरी करायच आहे* अशी इच्छा मनात बाळगून मनापासून देशसेवा करण्याचे ध्येय खूप कमी तरूणांमध्येच असते. म्हणतात ना ‘छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण ते शेजाऱ्यांच्या घरात’ अशीच काहीशी मानसिकता आपल्याकडे झाली आहे.
शेवटी सांगायचा मुद्दा हा की, नुसते एका दिवसापुरते देशप्रेम नसावे. त्यासाठी मनापासून देशप्रेम प्रत्येकाच्या मनात असायला हवे. समाजातील कर्मठ सत्ताधाऱ्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता आज समाज ज्या दिशेने भरकटत चालला आहे. त्याला योग्य दिशा देण्याची गरज केवळ या युवापिढीकडेच आहे. आपल्या क्रांतीकारी बांधवांनी पाहिलेले आधुनिक भारत देशाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी साऱ्यांनीच पुढाकार घेतला पाहिजे. भले आपल्याला भगतसिंग, सुखदेव, राजगुरु या शहीदांसारखे होता येणार नाही पण त्यांचा विचारांचा आदर्श मनात ठेवून समता, स्वातंत्र्य आणि बंधुता यांच्या साथीने येणाऱ्या भावी पिढीला सुख, समृद्धी आणि प्रगतीने बहरलेला खरा ‘यंग इंडिया’ देऊ शकतो आणि हे जर असच झाले तरच खऱ्या अर्थाने भ्रगतसिंग, सुखदेव, राजगुरु या शहीद झालेल्या क्रांतीकारकांचे बलिदान व्यर्थ होणार नाही.
मेघना सुर्वे
८४३३५०२९९४
[email protected]