वास्तविकतेला कल्पनेची गुंफण म्हणजे, ‘धागाः एक बंध प्रेमाचा’
(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई)
या, इवाई, माझ्या मागोमाग या, शामियाना अगदि गच्च भरलेला आहे, तरी बरे खुर्चीला नंबर दिलेला आहे, नाहीतर आपल्याला बसायला खुर्चीच मिळाली नसती. या इकडे, इथे आहे आपला नंबर. काही म्हणा इवाई, जागा छान मिळाली, अगदि जवळही नाही आणि जास्त दूरही नाही. इथून सगळे छान दिसते. आमच्याकडील नाटकांना अशी फार गर्दी राहत नाही. पण हा जो नाटक आहे, त्याने नुकताच शंभर प्रयोगांचा टप्पा गाठलेला आहे आणि यामधील आकर्षण म्हणजे कांची! आता ही कांची कोण आहे हे कळेलच नाटकामधून, पण या नाटकाचे लेखक युवराज गोंगले यांनी वर्तमानपत्रातील एका बातमीच्या शिर्षकावरून कथानकाला विस्तार देवून रंगमंचापर्यंत हे नाटक आणले. कथानकाबरोबर प्रादेशिक वैशिष्ट्याकडे विशेष लक्ष दिलेले आहे. नाटकाची नांदी ऐकलीय का? नांदीमधूनच नाटकाची प्रादेशिक पार्श्वभूमी लक्षात यायला लागते. स्वतः गायक आणि संगीतकार, जोडीला अध्यापक असल्यामूळे भाषिक अभ्यास या सगळ्यामूळे नाटकामध्ये ज्ञान, कला आणि कौशल्यांचा सुरेख संगम दिसून येतो. ओवी आणि आनंदा देशमूख या दाम्पत्यांच्या जीवनात नकळत आलेल्या कांचीने दिलेली कलाटणी आणि नंतर कांचीला तिच्या कायदेशीर पालकांना सोपविताना त्यांना करावी लागलेली करुण धडपड अशी अगदि मर्यादित मध्यवर्ती कथानक असलेले हे नाटक. कथानक विस्तारासाठी आणि आवर्जून झाडीपट्टीच्या मंचावर सादरीकरणाच्या उद्देशाने निर्माण केलेली काही पात्रे या सगळ्यांची गुंफण करीत एकेक धागा गुंडाळत तिन्ही अंकांपर्यंत शरीर आणि डोळे स्थिर ठेवण्यास भाग पाडणारे हे नाटक!
कथानकाचे स्थळ उस्मानाबाद जिल्ह्यातील सारंगपूर येथील आहे, हे कुणी सांगण्याऐवजी पात्रांच्या प्रादेशिक बोलीवरून जाणवते. केवळ कथानकच नाही, तर तेथील भौगोलिक वैशिष्ट्यांचीही सांगड घातली गेली असल्यामूळे सहजच प्रेक्षकांना सारंगपूरची सहलच घडत असते. तेथील जत्रा, नद्या, डोंगर यांचा उल्लेख तर होतोच, पण पात्रांची नावेही प्रदेशाला धरूनच. नारायण, आनंदा आणि ओवी यांच्यामधील संवाद ऐकताना आपण शारंगपूरातच असल्याचा भास झाल्यावाचून राहत नाही. सहसा कलाकारांच्या मूळ भाषेचा प्रभाव त्याने बोललेल्या इतर भाषेवर जाणवत असतो, पण मूलतः विदर्भातील असून क्षणभरही तो भाषिक प्रभाव आनंदा आणि ओवीच्या वर्हाडी संवादामध्ये आढळलेला नाही, पण आनंदा, ओवी आणि नारायणव्यतिरिक्त इतर जे पात्र आहेत, ते त्याच प्रदेशातील असूनही त्यांच्या भाषेत विविधता दिसून येते. शिक्षित व्यक्तीबाबत प्रमाणभाषा अपेक्षित आहे, मात्र ज्याला ‘चाकू’, ‘बंदूक’ असे शब्द ‘काचू’ आणि ‘दंबूक’ असे उच्चारावी लागतात त्या कान्या सरकारची भाषा ग्रामीण जरी वाटत असली तरी आनंदा आणि ओवीच्या भाषेला मिळती-जुळती वाटत नाही. केवळ विनोदनिर्मितीसाठी निर्माण केलेले ‘जर्मण’ आणि ‘जपान’ आणि नृत्य/लावणीसाठी निर्माण केलेले पात्र पिचकारी ह्या पात्रांची भाषासुध्दा वैदर्भिय वाटते त्यामूळे खचितच अधिक आनंद देवून जाते, पण स्थानिक भाषावैशिष्ट्यांचे खंडण झाल्याचा भास होतो, त्यामूळे हसता हसता प्रेक्षक उस्मानाबादवरून थेट चंद्रपूरात येवून पडतात.
आनंदाचा फुलांचा धंदा, गाडीवरून पडून झालेली दुःखापत, यातून आलेले वंधत्व, दुसरीकडे संपत्तीच्या हव्यासापायी भावाच्या मुलींला मारून स्वतःच्या मुलाला वारसदार बनविण्यासाठी एका बापाचा कपटी डाव, तर तिसरीकडे अफाट ज्ञान आणि अनुभवाचा गर्व बाळगून, स्त्रीला गुलाम म्हणून वागविणारा वकिल…. अशा तिहेरी कुटूंबांना एकत्र आणत निर्माण केलेली परिस्थिती लेखकाच्या अनुभवाची चुणूक दाखविते. झाडीपट्टीच्या मंचावरील चाकोरीबध्द कथानक, प्रसंग आणि पात्रांना फाटा देत वेगळ्या मसाल्यासह सामाजिक संदेशाचीही उधळण नाटकातून केलेली आढळते. स्त्रीशिक्षण, स्त्रीभ्रुणहत्या, बेरोजगारी, अज्ञान- अशिक्षितपणा अशा मुद्द्यांवर भाष्य केलेले आढळते, अर्थातच कथानकाच्या अधिन राहून.
गोंगले दाम्पत्यांना मुलगी होती, म्हणून त्यांनी हे कथानक निवडले, कि मूळात त्यांच्या मुलीचा जन्मच या नाटकासाठी झाला, असा एक भाबडा प्रश्न निर्माण होतो, कारण या कथानकातून कांचीचे पात्र वगळणे किंवा ते दृश्य आभासी किंवा अदृश्य दाखवून कथानकाला वाट करून देणे, कधीही शक्य झाले नसते, त्याचबरोबर कांचीचे पात्र त्या वयाच्या इतर मुलीने साकारताना तो प्रसंग तितका परिणामकारक ठरला नसता. कांची ही खर्या आयुष्यातही आनंदा देशमुख (युवराज गोंगले) आणि ओवी देशमुख (ममता गोंगले) यांची मुलगी आहे हे प्रेक्षकांना जेव्हा कळते, तेव्हा या दाम्पत्यांविषयी आत्मियता अधिकच वाढते. छोट्या आर्द्राने(कांची) मात्र आई-वडीलांसोबत हे नाटक करतांना कुठेही संकोच वा कृत्रिमपणा जाणवू दिला नाही. मुलांमध्ये आई- वडिलांचे गूण नकळत संक्रमित होत असले, तरी या स्तरावरील अभिनयासाठी आई- वडीलांनी आर्द्राकडून घेतलेल्या मेहनतीची कल्पना करवत नाही. संवादाचे पाठांतर आणि कृतींचा सराव हा मेहनतीने करता येतो, मात्र एखादी भुमिका जगणे आणि तसे नकळत घडणारे वर्तन हे उपजतच यावे लागतात. रडण्याची क्रिया करता येईल, पण डोळ्यातून सहज अश्रू येण्यासाठी त्या प्रसंगामध्ये स्वतःला ठेवून ती भावना अनुभवावी लागते आणि हे सगळे पाच वर्षाच्या आर्द्राला कसे बरे सांगितले असेल! म्हणूनच अशा कलाकारांना निसर्गाचा चमत्कारच म्हणावेसे वाटते.
सर्वसाधारण प्रसंग हाताळणे एका सामान्य मंचासाठी सोयीचे होते, मात्र न्यायालयासारखा प्रसंग बरेचदा टाळून त्याचा निकालच प्रेक्षकांपर्यंत सुत्रधारामार्फत पोचविला जातो, मात्र न्यायालयाचा प्रसंग उभा करून अडाणी ओवी देशमूखला वकिलाच्या रुपाने उभी करून चमत्कृतीतून अभिसंधान साधलेले आहे. प्रादेशिक बोलीभाषा बोलणारी ओवी जेव्हा प्रमाण भाषा, प्रसंगी इंग्रजीचे दमदार संवाद बोलायला लागते, तेव्हा आतापर्यंत अशिक्षित म्हणून बाळगलेली प्रेक्षकांची समज भंग पावते आणि प्रसंगाला वेगळी मज्जा देवून जाते. प्रासंगिक असले, तरी भारतीय दंड विधानाबाबत कायदेशीर अभ्यास आणि सल्ला घेवून साधर्म्य जपलेले दिसून येते. अशा प्रसंगामध्ये छोट्या पण महत्त्वाच्या भुमिकेसाठी स्वतंत्र कलाकार बाळगणे शक्य नसते, मग दुहेरी भुमिका किंवा प्रयोग सहाय्यकांव्दारे अशा भुमिका तात्पुरत्या पार पाडल्या जातात, पण न्यायाधिशाची भुमिका जरी छोटीसी असली, तरी कथानकाला प्रभावित करणारी असल्यामूळे स्वतंत्र कलाकार वापरलेला आहे, तशीच न्यायालयातील शिपायाची भुमिका वकिलाच्या सहाय्यकाची भुमिका केलेल्या मंगेश जांभूळेनी केलेली आहे. असे करणे नाटकाच्या कथानकाला प्रभावित करीत नसले, तरी प्रेक्षकांच्या विचारांना प्रभावित करणारे नक्कीच ठरते. हळुहळू समोर येणार्या चमत्कृतीमध्ये सहाय्यकाचे शिपाई बनणे, हिसुध्दा अशीच एक चमत्कृती आहे, कि काय असा प्रेक्षकांचा समज होतो आणि त्याचा उलगडाही पुढील प्रसंगामध्ये होत नाही, त्यामूळे त्यासाठी स्वतंत्र कलाकारच वापरणे योग्य झाले असते.
नारायण काकाची भुमिका कथानकामध्ये केवळ दुवे जोडणारी असली, तरी अरविंद शिवणकर यांनी या भूमिकेला न्याय देत दमदार अभिनयाचे कसब दाखविलेले आहे. अगदि पहिल्या प्रवेशामध्येच नारायणकाका अर्भकाला घेवून येतो, तेव्हा पाऊस पडत असतो, पण पावसाची तिव्रता दाखविण्यासाठी नारायणकाकाला या एका प्रसंगापुरते आलेचिंब दाखविता आले असते, प्रसंगामध्ये अजून परिणामकारक वास्तविकता आली असती. रात्रीची गोठवणारी थंडी आणि केवळ पडद्यांच्या आडोशाने काढावी लागणारी रात्र याचे भान ठेवून थंडीमध्ये तसे दाखविणे कदाचित शक्यही झाले नसते.
नाटकातील प्रचलित एक पात्र म्हणजे खलनायकाचे, जे सहसा गुंड, राजकारणी किंवा सावकार अशा ढंगामध्ये दाखविले जाते, मात्र ते वकीलाच्या रुपात दाखविणे पारंपारिक नाटकांच्या मांडणीच्या पलिकडचे होते, पात्र वकिलाचे असले, तरी आवाजाची पिच ही पारंपारिक खलनायकाची, त्यामूळे त्या प्रसंगापूरते तरी प्रस्तूत नाटकांतील वैशिष्ट्यांचा विसर पडतो.
दिग्दर्शन, अभिनय आणि कथानकाच्या बाबतीत सरस असलेले हे नाटक संगीताच्या बाबतीत मागे पडेल, तर नवलच! नाटकाच्या यशस्वितेमध्ये आणि लोकप्रियतेमध्ये भर घातली आहे, ती नाटकातील शिर्षक गीताने. पारंपारिक संगीत आणि प्रादेशिक भाषेचा गोडवा इथेही जाणवतो. नाटकामध्ये प्रसंगानुरुप मोजकीच गाणी असली, तरी नाट्यरसिकांच्या कानांची तृषा तृप्त करणारी अशीच आहेत. नाटकातील शिर्षक गीतांसह सर्वच गाणी स्वतः युवराज गोंगले यांनी लिहून संगीतबध्द केलेली आहेत. एकूणच नाटकाच्या प्रभावाचा विचार केल्यास निखळ, भावनिक मनोरंजनातून हृदयाला हात घालत प्रबोधनाची हळूच फुंकर घातलेली आढळते. केवळ एक नाटक पाहून समाज सुधारणेची अपेक्षा ठेवणे बालिशपणाचे ठरेल, मात्र हे नाटक समाज प्रबोधनाच्या चळवळीचा एक भाग नक्कीच बनू शकेल……यात अजिबात शंका नाही.
✒️ नंदकिशोर मसराम कुरंडीचक, आरमोरी
प्रायोगिक नाटक संशोधक व समीक्षक
8275187344