माय मराठीचा अभिमान- मेघना सुर्वे
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा
हिच्या संगाने जागल्या, दर्याखोर्यांतील शिळा
वरील कवितेच्या ओळी या कविवर्य कुसुमाग्रज उर्फ मराठीतील थोर लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक वि. वा. शिरवाडकर यांच्या आहेत. यांच्या बद्दल बोलायचे झाले तर वि.स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे शिरवाडकर दुसरे साहित्यिक ठरले आहेत. आज त्यांची जयंती होय.
कविवर्य कुसुमाग्रज यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस म्हणजे २७ फेब्रुवारी हा ‘मराठी राजभाषा दिन“ म्हणून ओळखला जातो हे आपल्यापैकी सर्वांनाच आतापर्यंत माहित झाले असेलच. संत ज्ञानेश्वांनी “माझा मराठीची बोलू कौतुके । परि अमृतातेहि पैजासी जिंके । ऐसी अक्षरे रसिके | मेळवीन ।। अशी उपमा देत मराठी भाषा ‘अमृताहूनही गोड’ असल्याचे सांगितले आहे.अशा मराठी भाषेविषयी बोलावे तितके कमीच आहे. मराठीतल्या अनेक कलाकृती अजरामर ठरलेल्या आहेत. मराठी साहित्य, वाड्मयाप्रमाणेचे मराठी नाटक, चित्रपट, लघु चित्रपट, मराठी लोकसंगीत अशी नानाप्रकरचे कलाविष्कार मराठीत खच्चून भरलेले आहे.
कला आणि क्रीडाप्रमाणेच विविध क्षेत्रात मराठीचा झेंडा अटकेपार रोवला गेला आहे. अशी ही मराठी मुलखाची किर्ती भल्याभल्यांच्या छातीत धडकी भरविणारी आहे. तसे पाहिले तर मराठी भाषेचा उगम हा इसवी सनाच्या ९व्या शतकाचा. तेव्हापासून ती जनमाणसात बोलली जात असे. मराठी ही इंडो-युरोपीन भाषाकुळातील एक भाषा आहे. भारतात बोलणाऱ्या प्रमुख २२ भाषांपैकी मराठी एक भाषा आहे. महाराष्ट्र आणि गोव्यात मराठी ही राज्यभाषा मानली जाते. तसेच मराठी मातृभाषा बोलणाऱ्यालोकसंख्येनुसार मराठी ही जगातील पंधरावी व भारतातील चौथी भाषा आहे. जगभरात मराठी बोलणारी कोट्याधीश लोकसंख्या असणारी लोक आपल्याला सापडतील.
महाराष्ट्रात अनेक प्रांतामध्ये वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात. त्यात कोकणी, संगमेश्वरी , मालवणी तर पश्चिम महाराष्ट्रात विदर्भाय, खान्देशी, नागपुरी, कोल्हापुरी तर बेळगाव या महाराष्ट्रातील सीमाभाषात कानडी आणि मराठीअशी मिश्रीत भाषा बोलली जाते. अशी आपली मराठी भाषा पावलोपावली नव्या रंगात नव्या ढंगात बदलत जाते. मराठी भाषेविषयी आदर आणि सन्मान आपल्या सर्वांनाच आहे. अगदी परदेशात एखाद्या मराठी खेळाडूने जर मराठीत संवाद साधला तर त्याचा सार्थ अभिमान वाटतो. त्याचप्रमाणे एखाद्या अमराठी प्रसिध्द अभिनेत्याने मराठीमधून भाषण केले, तर त्याचे फार कौतुक वाटते. आजमात्र या मराठी भाषेचा मनोऱ्याची पडझड होताना याची देही याची डोळा पहावे लागतेय. “कालाय तस्य नम“ असे नुसते म्हणून चालणार नाही. तर त्यासाठी कृतीशील व्हावे लागेल. आज जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याचा विचार गंभीरपणे करायलाच हवा.
रोजच्या दैनंदिन व्यवहारीक जीवनात आपण किती मराठी भाषेचा उपयोग करतो. साध रिक्षा किंवा टॅक्सीवाल्याला सुध्दा आपण ‘भैय्या स्टेशन चलोगे क्या?“ असे हिंदीत म्हणतो. बाहेर खरेदीला किंवा हॉटेलात जातानासुध्दा आपण तिथे हिंदी किंवा जमल्यास इंग्रजीतच संवाद साधतो. काहीजण तर मराठी भाषा बोलताना इंग्रजी, हिंदी अशा भाषेची सरमिसळ करुन मराठी भाषेचा जणू चांगला उद्घारच करतात. एकमेकांना भेटताना देखील hi hello how are you?
अशा प्रकारचे आदरातिथ्य चालूच असते. तर दिवस भरात आपण sorry thank you please excuse meअसे कितीतरी वेळा बोलत असू याची तर गणतीच नाही. एखाद्याला मोबाईल नंबर जरी द्यायचा झाला तर तो आपण इंग्रजी अंकामधून वाचतो किंवा लिहून देतो. त्याचप्रमाणे सध्या मोबाईलमध्ये मराठी देवनागरी लिपी डाऊनलोड असली तरी आपण इंग्रजीतच अक्षरे टाईप करतो. मोठमोठे कंपनींची बीले, औषधांची नावे, ही इंग्रजीमधूनच असतात. मुंबईतील बहुतेक दुकानांवरची पाटी मराठी भाषेत असतात पण जरी दुकानाच नाव मराठीत असले तरी आतल्या दुकानातील वातावरण इंग्रजाळलेले असते. तसेच काही खाजगी कंपन्यातील व्यवहारसुध्दा इंग्रजीमधूनच चालतात तर तिथे कर्मचाऱ्यांनी आपआपसातील संवाद देखील इंग्रजी भाषेतून म्हणावा असा नियमच असतो. उच्चभ्रु अशा हायफाय सोसायटीत राहणाऱ्या काही मराठी माणसांना ‘मराठी भाषा“ बोलणे म्हणजे एक प्रकारचे लज्जास्पदच वाटते. हे म्हणजे या मराठीचाच घोर अपमान झाल्यासारखे आहे. म्हणूनच सुरेश भट म्हणतात की, ‘पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी“ अशीच गत सध्या सर्वत्रच दिसत आहे.
संस्कृत, तमीळ, तेलगु, कन्नड, मल्लयाळम, उडिया या भाषांना अभिजात भाषेचा र्दर्जा मिळाला. तरी देखील मराठी भाषेला अशाच प्रकारचा अभिजात र्द्जा मिळावा म्हणून गेली अनेक मराठी साहित्यिक, विचारवंत लढत आहेत.दरवर्षी “मराठी साहित्य संमेलन होत असतात तेव्हाही “मराठी भाषा “अभिजात भाषा व्हावी हाच सूर निघतो. अगदी संसदेत देखील यावर चर्चा होताना दिसते. जसे नवजात बालकाला आईचे दूध पोषक असते तसेच आपल्या मातृभाषेतील संस्कार आपल्याला घडविण्यात मदत करत असतात. मूल जन्माला येतं तेव्हा त्याच्या कानांवर पडणारा पहिला शब्द त्याच्या मातृभाषेतील असतो. त्याच भाषेतून त्याचा आधी कुटुंबाशी मग जगाशी संबंध येतो. म्हणूनच आपली मातृभाषेतील शिक्षण महत्वाचे असते.
या स्पर्धात्मक युगात जो तो आपल्या अस्तित्वासाठी झगडत आहे. देशात आज खाजगीकरणाचे वारे वाहत असताना शिक्षणक्षेत्रालाही याचा फटका बसलेला आहे. याचे सहज लक्ष्य ठरत आहेत त्या मराठी शाळा. इंग्रजी माध्यमांची वाढती मागणी मराठी शाळांचे अस्तित्वच पणाला लावत आहे. मराठी माध्यमात शिकलेल्या मुलांमध्ये पुढे महाविद्यालयात इंग्रजी भाषा येत नाही म्हणून त्याबाबतीत त्यांच्यात न्युनगंड निर्माण होतो असा काहीसा समज निर्माण झाला आहे. मुलांना पुढील आयुष्यातील उच्च शिक्षण घेताना इंग्रजी भाषेचा काही अडसर होवू नये, आपल्या मुलांनी चांगल्या प्रकारे इंग्रजी बोलावे म्हणून पालक इंग्रजी माध्यमांनाच जास्त पसंती देतात. आता ग्रामिणभागातही इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरु झाल्या आहेत.पण याइंग्रजीच्या हट्टापायी आपण आपल्या माय मराठीलाच विसरतो. आजकाल बरीच मराठी घरातील मुले इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेतात. शाळेत अनेक भाषेची मुले येतात त्यांच्या बरोबर मुले खेळताना, अभ्यास करताना, हिंदी किंवा इंग्रजी भाषेतच संवाद साधतात. अगदी सोसायटीच्या परीसरात, बागेमध्ये खेळताना देखील हिंदीत भांडत असतात, गंम्मत म्हणजे हीच मुले घरी आई-बाबांशी आणि घरातल्या मंडळींशी हिंदीत किवां इंग्रजीतच संभाषण करतात. मुले मराठीत का बोलत नाही? असा प्रश्न पालकांना केला तर “आमच्या मुलांना मराठीच बोलता येत नाही?“ असे उत्तर मिळते. आता यात दोष कोणाचा पालकांचा, शाळेचा, की मुलांचा हेच कळत नाही. पुर्वी प्रत्येक मराठी घरांमध्ये अभ्यास करताना “क,ख, घ,ग, अ- आईचा,ब-बाळाचा“असा सुर उमटायचा. आता हीच जागा a for apple b for ball ने घेतली आहे. ”येरे येरे पावसा““ म्हणारी पिढी जाऊन Rain, Rain, Go Away म्हणणारी पिढी उदयास आली आहे. मान्य आहे की, इंग्रजी भाषा ही काळाची गरज आहे. पण त्यासाठी मराठीचा गळा घोटणे कितपत योग्य आहे. याचा गंभीर विचार करायालाच हवा. खंत इतकी की, या महाराष्ट्रातच मराठी शाळा वाचवण्यासाठी लोकांना आंदोलने करावी लागत आहेत.
एकीकडे उच्चवर्णीयांच्या खाजगी आंतरराष्ट्रीय शाळांना मान्यता मिळते. तर दुसरीकडे तळागाळातील सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या पालिका आणि अनुदानित मराठी शाळांचे अनुदानच नाकारुन त्या बंद करण्यात येत आहे. मातृभाषेतून किंवा राज्यभाषेतून शिक्षण घेणे हा आपला हक्कच आहे आणि तो नाकारणे म्हणजे एकप्रकारे कायद्याची पायमल्ली करण्यासारखेच आहे. मराठी भाषेला कमी लेखणाऱ्यांसाठी एक गोष्ट सांगाविशी वाटते की, कित्येक मान्यवर मराठी माध्यमातून शिकून जागतिक पातळीवर किर्ती कमवत आहेत. डॉ. रघुनाथ माशेलकर, डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारखे शास्त्रज्ञ आपल्या मराठी मातृभाषेतूनच शिकले आहेत हे विसरुन चालणार नाही.
आज काही खाजगी मराठी शाळेत सेमी इंग्रजी वर्ग चालवले जात आहेत. मराठी शाळा आणि भाषा टिकविण्याचा हा एक उत्तम उपाय जरी मानला गेला तरी. जनमानसात मराठी भाषा ही दुय्यमच मानले जाते. इतकी की, आज मराठी वाचन, कादंबऱ्या वाचणारा समुह मागे पडताना दिसत आहे.मराठीत अनेक दर्जेदार साहित्य असूनही आजच्या तरुणांना मराठी धड वाचताही येत नाही. मराठी भाषेचा उदो उदो करणाऱ्यांची बहुतांश मुले ही इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेताना दिसतात हे काय वेगळे सांगायला नकोच. “मुंबईतील मराठी जगलीच पाहिजे” अशा आर्त टाहो फोडून भाषण ठोकरणारे केवळ मतांसाठीच इथले मराठी मातीशी नाते जोडण्यास पटाईत आहेत. “मराठी पाऊल पडती पुढे” असे आपण गर्वाने म्हटतो, पण याच मराठीचे पाय मागे खेचणारे देखील कमी नाहीत. असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाहीत.
जगात चीन, जपान, रशिया हे देश आज जागतिक बाजारपेठेत अव्वलस्थानावर आहेत. पण त्यांच्या देशात सर्व व्यवहार ते त्यांच्या मातृभाषेतच करतात. इंग्रजीवाचून तिथे कोणाच काही अडत नाही. तिथेच नाही तर ते जगभर जिथे जातात तिथे ते स्वत:च्याच भाषेत बोलतात. व्यवहारासाठी दुभाषी घेतात. खेदाची बाबही आहे की, आपल्या इथल्या तथाकथित इंटरनॅशनल स्कूल्स असे दुभाषी निर्माण करण्याचे कारखाने ठरत आहेत. अन्यथाशाळा ,महाविद्यालयांमध्ये फेंन्च, जर्मन, चिनी, जपानी, इटालियन, लॅटिन, रशियन अशा भाषा शिकविण्यामागचा उद्देश काय ? असो
आजच्या दिवसाचे महत्व जाणून आजच्या दिवशी सर्वत्र ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी , जाहलो खरेच धन्य एकतो मराठी“ हे गाणं आपआपल्या समाज माध्यमांवर ठेवलेले दिसेल किंवा एकायला मिळेल. प्रत्येक संस्था, संघटना मराठी भाषा जागवण्याचा जिवतोडीने प्रयत्न करीत असले तरी त्यांच्या प्रयत्नाला यश येणे महत्वाचेच आहे. मुंबईतील मराठी माणूस जागवायचा असेल तर इथली मराठी खरी जिवंत राहायला हवी. त्यासाठी इंग्रजी, हिंदीप्रमाणेच मराठीलाच तितकेच महत्वाचे आणि मानाचे स्थान मिळायला हवे. त्यासाठी इंग्रजी शाळेत शिकत असलेल्या आपल्या मुलांना पालकांनी मराठी साहित्याची, मराठी वाचनाची, मराठीची संस्कृतीची खरी ओळख करुन द्यायला हवी. त्यासाठी ‘मी मराठी, आमचा मराठी बाणा“असे नुसते बोलण्यापेक्षा ते कृतीतून दिसायला हवे. मराठी भाषेची लाज न बाळगता आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगायला हवा.आज ना उद्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळेलच पण येणाऱ्या काळात जागतिक भाषेपैकी एक भाषेचा दर्जाही लवकरच मिळेल हीच अपेक्षा! म्हणूनच माधव ज्यूलियन आपल्या माय मराठी भाषेबद्दल म्हणातात की,
मराठी असे आमुची माय बोली
जरी आज ही राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माऊलीला
यशाची पुढे दिव्य आशा असे!
– मेघना सुर्वे ८४३३५०२९९४