मुंडे महाविद्यालयात शिष्यवृत्ती धनादेश वाटप
(दिशा महाराष्ट्राची/ मंडणगड)
मंडणगड येथील सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाच्या लोकनेते गोपीनाथजी मुंडे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास नुकतेच मुंबई विद्यापीठ अशासकीय प्राचार्य (ए. एन. जी. सी.) संघटनेकडून गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत प्राप्त झाली आहे.
यावेळी आयोजित एका छोटेखानी कार्यक्रमात संस्थेचे सहकार्यवाह मा. श्री. विश्वदास लोखंडे व संचालक मा. श्री. आदेश मर्चंडे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राहुल जाधव होते. यावेळी शिष्यवृत्ती समन्वयक डॉ. विष्णू जायभाये, डॉ. धनपाल कांबळे, ग्रंथपाल दगडू जगताप आदी मान्यवर उपस्थित होते. अशासकीय महाविद्यालयीन प्राचार्य संघटनेच्या (ए. एन. जी. सी.) वतीने प्रतिवर्षी गरजू विद्याथ्र्यांना आर्थिक मदत दिली जाते. याबदद्ल संस्था व महाविद्यालयाच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.
यावेळी प्राचार्य डॉ. राहुल जाधव यांनी सांगितले की, प्रत्येक शैक्षणिक वर्षात मुंबई विद्यापीठ प्राचार्य संघटनेच्या वतीने आर्थिकदृष्ट्या गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली जाते. यावर्षी आपल्या महाविद्यालयातील एकूण पाच विद्यार्थ्यांना सदर शिष्यवृत्ती मंजूर झाली आहे. विद्यार्थ्यांनी या मिळालेल्या शिष्यवृत्तीचा उपयोग आपल्या शैक्षणिक कामाकरिता करावा असे सांगितले.
कार्यक्रमास शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार डॉ. विष्णू जायभाये यांनी मानले.