रयतेचा जाणता राजा- छत्रपती शिवाजी महाराज- मेघना सुर्वे
(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)
नरसिंह हे ! नरसिंह हे!
इंद्र जिमि ज़ृंभ पर
बाडव सअन्भ पर
रावण सदंभ पर
राघुकुलराज है!
हे कविराज भूषण यांनी लिहिलेल्या गौरव काव्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांची महती सांगितली गेली. अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत व स्फुर्तीस्थान म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना आपण संबोधतो. श्रीमंत योगी, रयतेचा जाणता राजा, गजपती, भूपती अशी अनेक नावे महाराजांना दिली गेली. महाराजांना मराठा साम्राज्याचे संस्थापक मानले जाते. लोकांच्या मनावर राज्य करणारे शिवराय हे भारतातील एक महान पुत्र होतेच तसेच ते एक अद्भुत आणि महान योद्धा देखील होते. १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी किल्ल्यावर राजमाता जिजाऊ आणि शहाजीराजे भोसले यांच्या पोटी या महान महापुरुषाचा जन्म झाला. आई शिवाईच्या नावानं महाराजांना ‘शिवाजी’ हे नाव पडले. जेव्हा जवळजवळ संपूर्ण उत्तर भारत मोगलांच्या अधीन होता तेव्हा शिवाजी महाराजांनी १६७४ मध्ये पश्चिम भारतात मराठा साम्राज्याचा पाया घातला. त्यांनी डेक्कन राज्यकर्ते आणि मोगलांशी युद्ध करून मराठ्यांना संघटित केले आणि पूर्ण स्वराज्याचे स्वप्न प्रत्येक भारतीय हृदयात भरले. आज आपल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जी जगभर, देशभर, महाराष्ट्राच्या घराघरात आणि मनामनात साजरी होते. आजच्या आधुनिक युगातही सामाजिक माध्यमातून मोबाईलच्या व्हाट्सअपच्या स्टेटस मधूनही शिवरायांना वंदिले जाते. आज जगभरात मराठी माणूस छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे ओळखला जातो.
शहाजीराजे सतत दौऱ्यावर असत त्यामुळे लहान शिवबाची जबाबदारी जिजाऊंनी घेतली होती. जिजाऊंनी लहानपणापासूनच शिवरायांवर स्वराज्याचे धडे गिरवले. रामायण, महाभारत यातील गोष्टींमधून जिजाऊंनी छोट्या शिवबांवर धार्मिक संस्कारही केले आणि तलवारबाजी, घोडस्वारीचे प्रशिक्षण देऊन शिवरायांना शूर, धाडसी, बलवान आणि शक्तिशाली बनवले. राज्यातील सरदार, मावळे यांच्या मुलांबरोबर त्यांच्यातलेच एक होऊन लहान शिवबा खेळ खेळत असे. म्हणूनच स्वराज्यासाठी अनेक मावळे शिवबांच्या साथीने प्राणपणाने लढले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी वयाच्या १६व्या वर्षी आपल्या सोबत्यांसोबत मावळ्यांना घेऊन रायेश्वर मंदिरामध्ये स्वराज्याची स्थापना करून पाहिला तोरणा किल्ला जिंकून स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर शत्रूच्या आणि मुघलांच्या ताब्यात असलेले किल्ले कधी गनिमी कावा करत तर कधी रक्तरंजित लढाई करत आपल्या हुशारीने तह करत परत जिंकले आहेत.
महाराजांना हिंदू नरसिन्हा म्हंटले गेले. राजे नेहमी धार्मिक कार्यात दान धर्म करीत. अनेक देवळांचा जीर्णोद्धार त्यांनी केला आहे. राजांनी हिंदू धर्मासोबतच इतर धर्माचाही आदर केला. मोघलांनी अनेक देवळे उद्धवस्त केली असली तरी महाराजांनी कधीच मास्जिद किंवा दर्ग्यावर हल्ला केला नाही. साधू संतांसोबतच मौलवी यांना त्यांनी मान दिला आहे. राजधानी रायगडमध्ये मुस्लिम भाविकांसाठी एक विशाल मशिदीची बांधणी केली. गडावर दिवाळी– होळी सोबत ईदही साजरी व्हायची. राजे आपल्या राज्यात जेव्हा जनतेची खुशाली घेण्यास फिरत तेव्हा ते जनतेच्या झोपडीत जाऊन जमिनीवर बसून त्याची कांदा भाकर खात असत म्हणूनच त्यांना “रयतेचा राजा” म्हणत. आज दोन धर्मातील लोकांना भांडताना पाहतो पण आपल्या राजांनी कधी जातपात धर्म पाळले नाही. शिवाजी महाराजांच्या सैन्यात अनेक मुस्लिम सरदार आणि सुभेदार होते. शिवाजींनी त्यांच्या कारभारात मानवतावादी धोरणे अवलंबली. जी कोणत्याही धर्मावर आधारित नव्हती. तसेच धोरण सैन्याच्या नेमणूका आणि प्रशासकीय नेमणूकीत स्पष्ट दिसत आहे. शिवाजी महाराजांचा तोफखाना इब्राहिम खानच्या ताब्यात होता. त्यांचे गुप्तहेर सचिव मौलाना हैदर अली होते तर नौदल सिह्दी संबल यांच्या हाती होती. महाराजांना आग्राच्या किल्ल्यातून पळून जाण्यात मदत करणारा मदारी मेहतर हा सुद्धा एक मुस्लिम होता. इतकंच काय महाराजांवर चाल करीत आलेला सय्यद बंडाचे हात मोडून महाराजांना वाचवणारा जीवा महाला वंचित समाजाचा होता. महाराजांनी संपूर्ण आयुष्यात कधीच जातीवाद पाळला नाही. अफझल खानच्या वधानंतर महाराजांनी प्रतापगडाखाली त्याची कबर बांधली आणि तिथे दिवाबत्ती करण्यासाठीही पगारी माणसे ठेवली, असे होते आपले राजे जे शत्रूच्या मरणानंतर त्यांनी आपले वैर संपविले होते.
महाराजांचा पराक्रम आणि लढाया यांचे वर्णन वाचताना अंगावर काटा उभा राहतो. प्रतापगडावरील अफझल खानाचा वध, पुण्यातील लाल महालात झालेला जगातील पहिला ‘सर्जीकल स्ट्राईक’ यात जीव घेऊन पळून जाणाऱ्या शाहिस्तेखानाची महाराजांनी हाताची ४ बोटेच छाटली होती. औरंगजेबाने फसवून महाराजांना आग्रा येथे बोलावून कैद केले. पण राजांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मिठाईच्या पेठाऱ्यातून लपून आपली अणि संभाजी राजांची सुटका केली. सुरत हा हिंदू-मुस्लिमांसाठी हज करण्यासाठी प्रवेशद्वार होता. महाराजांनी सुरतच्या व्यापार्यांना लुटण्याचा सैनिकांना आदेश दिला, पण राजांनी कोणत्याही सामान्य माणसाला आपल्या लुटल्याचा बळी दिला नाही. राजांच्या राज्यात महिलांना मानसन्मान होता. परस्त्री मातेसमान मानणारे महाराज माहिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना कठोर शासन करत होते. कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेचा राजांनी केलेला मानसन्मान जगजाहीर आहे. महाराजांनी शेतकऱ्यांसाठी देखील धोरण आखले होते. “शेतकऱ्याच्या शेतातील भाजीच्या देठाला हात लावाल तर त्याचे हात कलम केले जातील” असे सांगणारे शिवराय किती थोर असतील याचा आपण विचार करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराज एक शासक नव्हते तर ते उत्तम मॅनेजमेंट गुरु देखील होते. त्यांचे व्यवस्थापन कौशल्य अद्वितीय होते. त्यांना प्रचंड दूरदृष्टी होती आणि त्या काळात त्यांनी दूरदृष्टीने भविष्याचा विचार करून विविध योजना आखल्या. डज, इंग्रज यांना “तुम्ही व्यापारी म्हणून आलात, पण इथले मालक बनण्याचा प्रयत्न करू नका” असे ठणकावून सांगितले होते.
महाराजांनी आपली सेना बऱ्यापैकी कार्यक्षमतेने उभी केली. त्यांच्याकडे एक मोठी नेव्हीही होती. शिस्तबद्ध सैन्य आणि प्रस्थापित प्रशासकीय संघटनांच्या मदतीने राजांनी एक कार्यक्षम आणि पुरोगामी सभ्य शासन स्थापन केले. शत्रूंवर अचानक हल्ला होण्यासारख्या पद्धतींसह त्यांनी सैनिकी रणनीतीमध्ये नाविन्यपूर्ण पद्धतींचा अवलंब केला. महाराज हे कुशल प्रशासक म्हणून जगभरात ओळखले जातात. प्रशासकीय कामात मदत करण्यासाठी राजांनी अष्टप्रधान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठ मंत्र्यांचा एक बोर्ड तयार केला प्रधानमंत्री संबोधिले, राजा सर्वात महत्वाचे पद होते. शिवाजी महाराजांना संस्कृतचे चांगले ज्ञान होते आणि संस्कृत भाषेला चालना मिळण्यासाठी ‘सिंधुदुर्ग’, ‘प्रचंडगड’ आणि ‘सुवर्णदुर्ग’ अशी संस्कृतमध्ये आपल्या किल्ल्यांची नावे ठेवली. राजदरबारात त्यांनी मराठी व संस्कृत भाषेला प्रोत्साहन दिले. स्वतंत्र शासकांप्रमाणेच त्यांनी स्वत:च्या नावाने एक नाणे आणले. ज्याला ‘शिवराई’ असे म्हणतात आणि हे नाणे संस्कृत भाषेत होते.
रायगडावर ६ जून १६७४ला शिवाजी महारांचा राज्याभिषेक ‘काशिच्या गागाभट्ट यांच्या हस्ते झाला आणि छत्रपती शिवाजी महाराज या मराठी मुलखाचे ‘छत्रपती’ बनले. रयतेचे जाणते राजे झाले. अठरा पगड जातींना एकत्र करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले. पुढे ३ एप्रिल १६८०ला महाराजांचे रायगडावर निधन झाले आणि वीर हिंदू सम्राट इतिहासात कायमचा अमर झाला. महाराज केवळ ५० वर्ष जगले पण इतक्या आयुष्यात त्यांनी अनेकांच्या पिढ्या घडविल्या, मराठी मातीचा आणि त्यातील माणसाचा स्वाभिमान तेवत ठेवला. शिवाजी महाराज एक शूर पुरुष होते, ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठा, हिंदू साम्राज्यासाठी वाहिले. मराठा इतिहासातील पहिले नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे आहे. आज केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या थाटामाटात आणि कार्यक्रमाने साजरी केली जाते. त्यांचे शिवचरित्र शब्दात सांगताच येणार नाही.डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भारताला मोलाचे संविधानही दिले. ”भारतीय संविधानाची निर्मिती करीत असताना माझ्या पुढे छत्रपती शिवरायांचे स्वराज्य उभे होते,” असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. बाबासाहेब नेहमी आपल्या पत्राची सुरुवात देखील ‘जय शिवराय’ असे करत होते. इतकेच नव्हे तर महाड सत्याग्रहाची सुरुवात बाबासाहेबांनी रायगडावरती जावून शिवरायांना अभिवादन करुन केली होती. छत्रपती शिवरायांना स्वराज्य पाहिजे होते. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जातीच्या बेड्या तोडून बहुजनाचे स्वातंत्र्य पाहिजे होते.
आज महाराजांचा विरोध करून , त्यांच्या पुतळ्याची विटंबना करून , भगवे झेंडे जाळून राजाचे महत्व कमी होणार नाही, कारण त्यांच्या कर्तृत्वाची, त्यांनी केलेल्या पराक्रमाची महती सूर्य, चंद्र याप्रमाणे अखंड टिकणार आहे. सह्याद्रीच्या कडाकपारित राजांचा पराक्रम गुंजत आहे. इथल्या प्रत्येक गडकिल्ल्यावर तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, प्रतापराव गुजर, शीवा काशीदसारख्या स्वराज्याच्या मावळ्यांच्या रक्ताचा अभिषेक झाला आहे. त्यामुळे या गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखायला हवं, गडकिल्ले म्हणजे दारूच्या पार्ट्या करण्यासाठी, अश्लिल चाळे करण्यासाठी वा फोटो काढण्यासाठी नाहीत तर महाराष्ट्राचे ऐतिहासिक सौंदर्य आहे हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. गडकिल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी इथल्या शासन, प्रशासनाने गांभीर्याने पाहायला हवे.१८८० मध्ये महात्मा ज्योतिराव फुले रायगड किल्ल्यावर गेले असता त्यांना दाट जंगलात छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी सापडली, जी छत्रपती संभाजी महाराजांनी बांधली होती. त्यांनी जागा साफ करुन तिला पूजनीय स्वरूप प्राप्त करून दिले हे मात्र आपण विसरलो.
आज आपण महाराजांना चौकातल्या पुतळ्यात पाहिलं, महाराजांना गाडीतल्या काचेवर पाहिलं, महाराजांना पुस्तकातही पाहिलं, महाराजांना घरातल्या दिवाणखान्यातही पाहिलं पण… महाराजांना आत्मसात आणि आचरणात आणायचं तेवढं राहूनच गेलं. आज आपल्या मुलांना सुपर मॅन, स्पायडर मॅन, शक्तीमान, किंवा क्रिश सारखे सिनेमा पाहायला आवडतात पण छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या जीवनातील सुपर हिरो होते. त्यामुळे आजच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल माहिती असायलाच हवी. मुलांना पुस्तकातून, सिनेमा, नाटकातून छत्रपती शिवाजी महाराज समजायला हबेत. सुट्टीत मुलांना वॉटर पार्क व मॉलमध्ये फिरवण्यापेक्षा गडकिल्ल्यांवर फिरायला न्या, राजांचा इतिहास त्यांच्यात रुजवा, तरच इथल्या प्रत्येक घराघरात शिवबाचा मावळा तयार होईल. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार असेच येणाऱ्या पिढ्याही आत्मसात करत राहतील. तीच छत्रपती शिवाजी महाराजांना खरी मानवंदना असेल ! जय शिवराय!
मेघना सुर्वे
[email protected]