आम्हाला समाजाकडून सहानुभूती नको तर साथ हवी- ‘तर्पण’च्या सिंहावलोकनात अनाथ निराधार मुला मुलींची निखळ भावना
(दिशा महाराष्ट्राची/ मुंबई- मेघना सुर्वे)
इतर सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे आम्हालाही आनंदाने आणि आत्मनिर्भरतेने जगण्याचा अधिकार आहे. आम्हीं भोगलेल्या त्रासाच्या आठवणी खूप कटू आहेत. पण म्हणून आम्हाला सहानुभूती नको तर समाजाकडून आम्हाला साथ हवी आहे, अश्या निखळ भावना अनाथ, निराधार मुली मुलांनी व्यक्त केल्या.
उत्तनमधील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे तर्पण फाउंडेशनच्यावतीने आयोजित सिंहावलोकन वर्कशॉपमध्ये महाराष्ट्रातून आलेल्या अनेक अनाथ निराधार मुलामुलींनी आपली मते, मनातील सर्व इच्छा,आकांशा बोलून दाखिवल्या. अनाथ निराधार म्हणून भोगलेल्या त्रासाच्या आठवणी त्यांच्या बोलण्यातून जाणवत असल्या तरी, आज आत्मविश्वासाने ही मुले वावरत आहेत. तर्पण फाउंडेशनचे संस्थापक श्रीकांत भारतीय यांनी आमच्या वेदनांवर मायेची फुंकर मारल्याची कृतज्ञ भावनाही या मुलांनी बोलून दाखविली.
वयाच्या 18 व्या वर्षी अनाथआश्रम मधून बाहेर पडलेल्या ५०० हुन अधिक मुलामुलींचे पालकत्व तर्पण फाउंडेशनच्या माध्यमातून श्रीकांत भारतीय आणि त्यांच्या पत्नी श्रेया भारतीय यांनी स्वीकारले आहे. या मुलामुलींच्या कॉलेज -होस्टेलच्या फीसह गरजेनुसार मुलांना अभ्यासासाठी टॅब, मुलींना सुरक्षेसाठी मोबाईल, कोविडकाळात अन्नधान्यासह आवश्यक वस्तूंचं कीट, स्ेवटर आणि रेनकोट वितरण याबरोबरच या मुलांना सरकारी नोकरीत 1 टक्का आरक्षण, कागदपत्रांसाठी सहकार्य, संजय गांधी निराधार योजनेतील अनुदान मिळवून देणं आदी शासन स्तरावरील कामही मोठ्या जोमानं तर्पण फाउंडेशनच्या वतीने सुरू आहेत.
या कार्यक्रमांतर्गत ‘तर्पण’च्या आतापर्यंतच्या वाटचालीचं सिंहावलोकन करून पुढील वर्षभराच्या कामाचा रोडमॅप ठरवणे हे प्रयोजन होतं. तर्पणचे सर्व संचालक आणि मुलं एका टेबलवर बसून सोबत जेवत होती. सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्या आदरणीय लोकांनी वर्कशॉपला आवर्जून भेट दिली. रवी व्यास, जयंत कुलकर्णी, गौरांग प्रभू , प्रभारंग फिल्म चे संचालक संदीप माने, उर्मिला चोपडा हिरवे यांच्यासह वेगवेगळ्या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ व्यक्तींनी या कार्याला सद्भावनांचं बळ दिलं. श्रीकांतजींच्या निरपेक्ष सेवाभावाची मोठी ताकद या सगळ्यामागे होती.
अनाथ मुलांचे प्रश्न त्यांनी स्वत: मांडावेत आणि त्या प्रश्नांची उत्तरंही त्यांच्या सहभागातूनच मिळवावीत, अशा प्रकारचं हे वर्कशॉप खरं तर एका वेगळ्या सामाजिक उत्थानाचं प्रतीक होतं.