पालशेत गावचे सुपुत्र शाहीर सुधाकर गावणकर यांना लोककला भूषण पुरस्कार २०२३ जाहीर
(दिशा महाराष्ट्राची/ गुहागर- उदय दणदणे)
कोकण व्हिजन फाउंडेशन ,कोकण रिपोर्टर आणि सहयाद्री समाचार न्यूज चॅनेल यांच्या माध्यमातून कोकणातील लोककलेत उल्लेखनीय कार्य करणारे लोककलावंत यांना “लोककला भूषण पुरस्कार- २०२३” जाहीर झाले असून गुहागर तालुक्यातील पालशेत गावचे सुपुत्र शाहीर सुधाकर रामचंद्र गावणकर यांची उपरोक्त संस्थेच्या वतीने “लोककला भूषण पुरस्कार-२०२३” साठी निवड झाली असून सदर पुरस्कार रविवार दिनांक ०५ मार्च २०२३ रोजी सकाळी १० वा. लक्ष्मीबाई बांदल हायस्कूल सभागृह, (कावीतळ तळी) चिपळूण येथे विविध मान्यवरांच्या शुभहस्ते सदर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
शाहीर सुधाकर गावणकर हे गेली ३० ते ३५ वर्षे लोककलेत कार्यरत असून कलगी- तुरा लोककलेच्या माध्यमातून समाज प्रबोधात्मक कार्यक्रमातून लोकांच मनोरंजन करत आहेत. नमन आणि शक्ति- तुऱ्यात त्यांनी अनेक काव्यलेखन करून स्वतः गायली आहेत. अनेक गाणी त्यांची रेकॉर्डिंग होऊन कॅसेटच्या माध्यमातून शाहीर सुधाकर गावणकर यांची ओळख सर्वदूर झाली.
मुंबई रंगमंचावर तसेच कोकणात विविध ठिकाणी जवळजवळ दोन दशक त्यांनी शक्ती- तुरा कार्यक्रम केले आहेत. त्याचबरोबर विविध नाटकात व नमनात कलाकार म्हणून काम केले आहे. ते स्वतः लेखक/दिग्दर्शक असून त्यांनी लिहिली “चंडिकेच्या मंदिरात चार बळी”, औदसेचा फेरा, लक्ष्मी औदसा, ही वगनाट्य खूप गाजली आहेत. शाहीर सुधाकर गावणकर यांच्या मार्गदर्शनाखाली कलानिकेतन नृत्य कलापथक पालशेत ( झिंबरवाडी) ह्या त्यांच्या शाखेने आजवर विविध स्पर्धेत सहभागी होत उत्कृष्ट तसेच प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले आहेत.
शाहीर सुधाकर गावणकर यांना कोकण मराठी शाहीर परिषद यांच्या वतीने “कोकण भूषण पुरस्कार-२०१८ ने सन्मानित करण्यात आले होते. महाराष्ट्र संस्कृती पूर्वापार चालत आलेली जाखडी नृत्य (कलगी तुरा) लोककलांचे जाहीर कार्यक्रम व जतन करीत असल्याबद्दल २३ फेब्रुवारी २००७ रोजी त्यावेळचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. मा. आर आर (आबा) पाटील यांनी शाहीर सुधाकर गावणकर यांना कौतुकास्पद शुभेच्छा दिल्या होत्या. अशा विविध शुभेच्छा पुरस्कार त्यांना लोककलेची सेवा करण्यास उर्जादायी ठरत आहेत.
“लोककला भूषण पुरस्कार २०२३” जाहीर झाल्याबद्दल शाहिर- सुधाकर गावणकर यांचे सर्व स्तरातून अभिनंदन सह शुभेच्छा दिल्या जात आहेत. आज उतार वयात अनेक संकटे परिस्थितीवर मात करत आपलं आयुष्य लोककलेप्रती वाहून घेणारे शाहीर सुधाकर गावणकर गेली चार पाच वर्षे शासनाच्या वृद्ध साहित्यिक व कलाकार मानधन योजनेअंतर्गत लाभ मिळण्यासाठी शासन दरबारी उंबरटे झिजवत आहेत. शासनाकडून मदत मिळेल या कामी कोकणातील लोकप्रतिनिधी लक्ष देतील अशी अपेक्षा! मात्र अशा विविध सामाजिक संस्थांकडून लोककलावंताना सन्मानपूर्वक पुरस्काराने गौरविण्यात येते ही नक्कीच भूषणावह बाब आहे.