मला माझा देश हवाय – दंगलकार नितीन चंदनशिवे
(दिशा महाराष्ट्राची / सांगली)
दारुड्यांची भीती वाटत नाही हल्ली
गुंडांच्या भीतीनेही हादरत नाही गल्ली
दारुडे त्यांच्या बाटलीत मस्त आहेत
गुंडांच्या हातातच तिजोऱ्यांच्या किल्ल्या आहेत
भीती बंदुकीची वाटत नाही
भीती तलवारीची ही वाटत नाही
आता भीती वाटतेय रंगांची
बाजूला राहणाऱ्या शेजाऱ्याची
शेजारी आता
कट्टर हिरवा झालाय
कट्टर भगवा झालाय
कट्टर निळा झालाय
भारतात गावं शहरं किती माहीत नाही मला
पण प्रत्येक गावात
प्रत्येक शहरात भारत आहे
तो भारत संपत चाललाय याची भीती वाटतेय हल्ली
इथल्या धर्मांच्या घोषणेने
विविधतेने नटलेली गल्ली हादरून गेलीय
आणि दिल्ली झोपेचं सोंग घेऊन
घोरत पडलीय हल्ली
दिल्ली जागीच होणार नाहीय का?
याची भीती वाटतेय हल्ली
गांधींच्या पुतळ्यासमोर नथुराम उभा आहे
पण गांधीच्या छातीवर
रहीम सोबत असलेला राम धोक्यात आहे
मानवतेचा राम पळवून नेलाय
याची भीती वाटतेय हल्ली
येशूच्या रक्ताचे घोट देऊन
फादरी विकत घेतायत भूक गरीबाची
सुळावरचं प्रेमाचं फुल
कुठं गेलं माहीत नाही
पण प्रभू पुन्हा येणार अशा अफवा वाढल्यात
येशू पुन्हा येऊन करणार काय..?
याची भीती वाटतेय हल्ली
मदरसेच्या फळ्यावर उलट्या बाजूने
काय लिखाण चालुय कळत नाहीय
पण अल्लाही मानवतेचा दर्या आहे
हे सांगणारं कुराण
कुठं लपवून ठेवलं मौलवींनी?
उद्या तलवारी नागड्या होतील तेव्हा,
माझा अस्लम,माझा तौफिक आणि शोएब
नेमके कुठून येतील
याची भीती वाटतेय हल्ली
भाकरीवर बलात्कार करून करून
सुंदर असणारी भूक करपुन गेलीय ओ
संविधान धोक्यात आहेच
पण डोक्यात असणारे हे धर्म
आपला हजारो वर्षांपासूनचा इतिहास
बॉम्ब टाकून सांगत राहतील
इतिहासाचं माहीत नाही
पण इथला भूगोल कायमचा संपेल
आणि माणूस सुद्धा
याची भीती वाटतेय हल्ली
आता पहा ना
माणसाला माणूस म्हणून
जिवंत ठेवू पाहणारी माझी कविता
धर्माच्या भक्तांना नकोशी वाटेल
पण तरीही माझी कविता
एका हातात तिरंगा
आणि एका हातात उजेड घेऊन
इथल्या गावा गावात
इथल्या शहरा शहरात फिरत राहील
पण,
कवितेचाच खून होत असतो
याची भीती वाटतेय हल्ली
दंगलकार नितीन चंदनशिवे
मु. पो. कवठेमहांकाळ,
जि. सांगली.
070209 09521 ( संपर्क करू शकता)