सन्मित्र लोककला मंडळ- पालपेणे आयोजित नमन कार्यक्रमातून प्रथमच ४ संकासुर मुंबई रंगमंचावर- अवघ्या कोकण कलाविश्वात उत्सुकता शिगेला
(दिशा महाराष्ट्राची / ठाणे : उदय दणदणे)
कोकण म्हणजे लोककलेचं माहेरघर कोकणची लोकप्रिय नमन लोककला आज अनेक गाव- वाडी कुशीत जोपासली जात आहे. नमन सादरीकरणात खेळे हा प्रकार आकर्षण ठरत असतो. कोकणात गुहागर तालुक्यातील देवखेळयांची फार मोठी परंपरा आहे. त्यात संकासुर व नटवा, कोलीन, पुरुष-पात्रमय पारंपरिक वेशभूषेत सादरीकरण होत असलेलं हे नृत्य, गुहागर तालुक्यातील नमन मंडळाचं विशेष आकर्षणाचा भाग असतो. त्याच धर्तीवर गुहागर तालुक्यातील कला ,क्रीडा, शैक्षणिक ,सामजिक क्षेत्रात अग्रस्थानी राहून कार्यरत असलेले व गेली ३२ वर्षे देवखेळयांची व नमन लोककलेची परंपरा आजवर कायम जोपासणारे गुहागर तालुक्यातील श्री सन्मित्र लोककला मंडळ (पालपेणे) होय.
गेली २० वर्षे उपरोक्त मंडळाच्या वतीने मुबंई रंगमंचावर दर्जेदार कार्यक्रमाचे आयोजन करत नमन लोककलेत बदलत्या काळानुसार नाविन्यपूर्ण बदल घडवून सादरीकरणात सातत्य राखत कोविड वैश्विक महामारीनंतर पुन्हा जोमाने मुबंई रंगमंचावर या मोसमातील नमन प्रयोग, पारंपरिक गण, स्तवन, आणि संगीतमय गवळण तसेच श्रीछत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ऐतिहासिक नाट्यकलाकृती, विजय मांडवकर व महेंद्र मांडवकर लिखित/ दिग्दर्शित, सह- संजय टाणकर- दिग्दर्शित- “शिवतंत्र” वगनाट्याचा शुभारंभ प्रयोग रविवार दिनांक-१२ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी- १० वा. श्रीछत्रपती शिवाजी मंदिर, दादर (प) मुबंई येथे आयोजित करण्यात आला आहे.
शिमगोत्सवात देवखेळयांतील पारंपरिक वेशभूषेत, मृदुंगाच्या ठेक्यावर नाचणारे “संकासुर” हे लक्षवेधी ठरत असतं. गुहागर तालुक्यात येणाऱ्या पर्यटकांनाही ते आकर्षित करत असते. गुहागर तालुक्यातील श्री सन्मित्र लोककला मंडळ (पालपेणे) प्रथमच मुंबईत होत असलेल्या नमन कार्यक्रमात खेळे सादरीकरणात ४ संकासुर एकाचवेळी रंगमंचावर घेऊन येत असल्याचे हा नमन प्रयोग खास आकर्षणाचा भाग तितकंच कुटुंबासमवेत पाहण्यायोग्य हा नमन कार्यक्रम रसिकजनांसाठी पर्वणीय असणार आहे.
मन मोहित करणारी ही नाट्यकृती,गेली अनेक वर्षे रसिक मनावर मोहर उमटविताना ह्या मंडळाचे लेखक/ दिग्दर्शक विजय मांडवकर आणि महेंद्र मांडवकर सह. दिग्दर्शक- संजय टाणकर, गायिका तेजल गोताड- पवार, गायक राहुल मांडवकर, गीतरचना तेजल गोताड- पवार, महेंद्र मांडवकर, विजय मांडवकर, नृत्य दिग्दर्शक तेजल गोताड- पवार, संगीत- संदेश गोताड, ढोलकी/मृदुंग- संग्राम मांडवकर, निलेश मांडवकर आणि शुभम सावंत, ऑक्टोपॅड- पंकज जाधव आणि मंडळाचे यशस्वी कलाकार यांच्या अथक परिश्रमातून निर्मिती होत असलेल्या ह्या नमन प्रयोगाला तमाम कलाप्रेमी रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन नमन लोककला संस्था (कार्यक्षेत्र-अखंड भारत) संस्थेचे अध्यक्ष- रविंद्र मटकर तसेच सचिव व गुहागर तालुका शाखेचे अध्यक्ष- सुधाकर मास्कर आणि संयोजकांवतीने करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संतोष मांडवकर -81697 84544 महेंद्र मांडवकर- 9004197373 यांच्याशी संपर्क साधावा.