दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकरीता मराठी पत्रकार संघ शाखा दापोलीचे आमरण उपोषण सुरू
(दिशा महाराष्ट्राची / दापोली)
दापोली उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे भरण्याकरीता मराठी पत्रकार संघ शाखा दापोलीने आज दिनांक २६ जानेवारी २०२३ पासून रुग्णालय आवारातच आमरण उपोषण सुरू केले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे यांना काही महिन्यांपूर्वी ईमेल द्वारे या संदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला होता. परंतु आजतागायत हा विषय गांभीर्याने न घेतल्यामुळे सदर उपोषण सुरू करण्यात आले असल्याचे कळते. दापोली उपजिल्हा रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक व्यतिरिक्त सर्व तज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. डॉक्टर नसल्यामुळे एखाद्या पेशंटला थेट मुंबई तसेच इतर हॉस्पिटलमध्ये जाणे भाग पडते. अशा प्रसंगी उचित वेळी एखादा पेशंट पोहोचला नाही तर त्याच्या जीवाची हानी होण्याची दाट शक्यता असते.
दापोली उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची जनरल सर्जन, एमडी मेडिसिन, स्त्री रोगतज्ञ, बालरोगतज्ञ, भूलतज्ञ, अस्थिरोग तज्ञ, नेत्ररोग तज्ञ आधी रिक्त पदे पूर्ण वेळ तातडीने भरण्याकरिता सदर उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या उपोषणाला अनेक सामाजिक संस्था, अनेक छोट्या मोठ्या संघटना सहभागी आहेत. हा प्रश्न किती दिवसात मार्गी लागतो ते लवकरच कळेल अन्यथा अशा गैरसोईमुळे अजून किती लोकांना त्रास सहन करावा लागेल हे सांगता येणार नाही. हा विषय गंभीर आहे. मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात अनेक वेळा सांगतात की हे सरकार जनतेचे सरकार आहे. तर मग या जनतेच्या सरकारमध्ये जनतेचा किती विचार केला जातो ते प्रत्यक्षात अनुभवायला मिळेल.