Home लेख प्रजासत्ताक भारताचा विजय असो- मेघना सुर्वे

प्रजासत्ताक भारताचा विजय असो- मेघना सुर्वे

Spread the love

प्रजासत्ताक भारताचा विजय असो- मेघना सुर्वे

 


(दिशा महाराष्ट्राची/ ठाणे)


 

२६ जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन. या दिवसाच महत्व काही वेगळ सांगाची गरज नाही. दिल्लीपासून गल्लीपर्यंत हा दिवस आज साजरा होत आहे. आठवड्यापूर्वीच या दिवशाची तयारी सर्व शासकीय कार्यालयात आणि शाळांमध्ये चालू असते. गेल्या दोन वर्षानंतर मोठ्या उत्सवाने प्रजासत्ताक दिन साजरा होत आहे.१५ ऑगस्ट १९४७ ला फाळणीची जखम घेऊन भारताला स्वातंत्र्य मिळाले खरे! पण देशावरचा मालकी हक्क व अधिकार आपल्याला म्हणजे सर्वसामान्यांना मिळाला नव्हता. तो विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी अथक परिश्रमातून सर्वोत्तम असे संविधान लिहून मिळवून दिला, तोच हा दिवस. २६ जानेवारी १९५० रोजी त्यांनी या देशाला राज्यघटना बहाल केली. आज भारत हा जगातला सर्वात मोठी लोकशाही असलेला देश म्हणून गणला जात आहे. लोकांनी, लोकांचे आणि लोकांसाठी चालवलेले राज्य म्हणजे लोकशाही अशी व्याख्या अब्राहम लिंकनने केली होती. पण विविध जाती आणि धर्माच्या छायेत असलेल्या भारतात उच्च निचतेमुळे सर्वांनाच समान हक्क मिळत नव्हते. म्हणून डॉ. बाबासाहेबांनी समता, स्वातंत्र्य आणि बंधुता त्याचबरोबर समान हक्क आणि न्याय यावर आधारलेली बुद्धकालीन गणराज्य पणित लोकशाही दिली जी आज महत्वाची मानली जात आहे.

आज प्रजासत्ताक दिन आपण साजरा करतोय खरा! पण बऱ्याच ठिकाणी आपण पाहिले असेल की, प्रजासत्ताक दिन साजरा होत असताना मुलांच्या स्पर्धा, नेत्यांची भाषणे, देशभक्तीपर गीते असा सर्व परिपुर्ण कार्यकमाबरोबर `सत्यनारायणाची पुजा’ ही प्रत्येक ठिकाणी जणू आवश्यकच ठरलेली असते. वर्षानुवर्ष या देशात जी मनुवादी विचारसरणी आहे ती मानसिकता जाता जात नाही हे यावरुन कळते. `सत्यनारायण पुजा’ ही तसे पाहिले तर एका विशिष्ट धर्माची पूजा- प्रथा आहे. जी व्यक्तिगत असते. पण या मनुवाद्यांनी त्याला इतक महत्व दिल की, अशा प्रकारच्या पूजा आणि हवन सार्वजनिक ठिकाणी देखील होत आहेत. काही वर्षापासून शासकीय कार्यालयात अशा पूजेला बंदी असली तरी बऱ्याच खाजगी ठिकाणी अशा पुजा होत असतातच. देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्यांनी स्वत:च्या प्राणांचीही पर्वा केली नाही तसेच हे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी अनेकांनी आपले आयुष्य वेचले, अशा थोर महापुरुषांच्या स्मृतीचे विस्मरण होणे हीच या प्रजासत्ताक दिनाची मोठी शोकांतिका आहे. देशातील थोर कांतीकारक आणि समाजसुधारकांपेक्षा इथल्या व्यवस्थेला आजही `सत्यनाराण’ मोठा वाटतो.

एखाद्या मंत्र्याला आमदार, खासदार असे पद मिळाल्यावर तो मंत्री संविधानाशी निष्ठा बाळगण्याची शपथ घेतो पण काही दिवसांनी `भगवत गीता’ हा राष्ट्रीय ग्रंथ करा अशी मागणी उचलून धरत सरळ सरळ संविधानालाच विरोध करतो. आज रेल्वे स्टेशनवर, लोकल ट्रेनमध्ये `भगवत गीता’ विकणारे दिसत असतात. एका वरीष्ठ धर्मातील धर्मग्रंथ असणारा भगवत गीता श्रेष्ठ की, सर्वाना समान न्याय हक्क देणारी राज्यघटना श्रेष्ठ? हे कळायला काही आपण दुधखुळे नाही. मुळात `भगवत गीता’ हा एका धर्माचा ग्रंथ मानला जातो आणि भारतात तर मुस्लिम, ख्रिश्चन, शिख, बौध्द, जैन अशा विविध धर्माचे लोक राहतात. प्रत्येक धर्मांचे आपले आपले धर्मग्रंथ आहेत. मग फक्त एकाच धर्मातील ग्रंथाला इतके महत्व का दिले जाते? हे लक्षात येत नाही. यावरुनच भारताला हिंदूस्थान करु इच्छिण्याची मनिषा बाळगणाऱ्या मनुवाद्यांकडून आपण आणखी काय अपेक्षा करावी. लोकशाहीने आपल्याला व्यक्तीस्वतंत्र दिल असलं तरी एखाद्या समुदायाच्या धर्मांतराला विरोध करणे किंवा जबरदस्तीने लोकांना ‘जय श्री राम’ , वंदे मातरम वदउन घेणे हे कितपत योग्य आहे.

या निमित्ताने अजून एक गोष्ट नमूद करावीशी वाटते ती म्हणजे येथे पत्येक वस्तीवर निळा, भगवा, हिरवे रंगाचे त्या त्या धर्माचे प्रतिक असलेले झेंडे दिसतात. पण त्या सर्व रंगांना एकत्रित बांधून घेणारा तिरंगा मात्र आज हरवत चालला आहे. तसेच १५ऑगस्ट व २६ जानेवारीला अभिमानाने मिरवलेला जाणारा तिरंगा दुसऱ्या दिवशी केराच्या पेटीत पहायला मिळतो. मागच्या वर्षी स्वातंत्र भारताचा ७५ वा अमृत महोत्सव साजरा करताना ‘ हर घर तिरंगा’ हि मोहीम राबवली पण दुसऱ्या दिवशी त्या तिरंग्याची काय अवस्था झाली हे काही वेगळं सांगायची गरज नाही. ज्या तिरंग्यासाठी छातीवर गोळ्या झेलल्या गेल्या त्याच तिरंग्याची ही अवस्था होताना मनाला निश्चितच वेदना होतात. म्हणूनच तिरंग्याचा मान सन्मान राखणे तर आपले आद्य कर्तव्यच आपण मानावयास हवे.

मंत्रयुग जाऊन आज तंत्रयुग आले. अवकाशातील चंद्रमोहीम यशस्वी करुन देशाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले. त्यामुळे आता मांजर आडव गेले तरी चार पाऊल मागे जाण्याची वृत्ती बदलायला हवी. आंतरराष्ट्रीय स्तरावर भेडसावणारी दहशदवादाची समस्या ते देशांतर्गत असलेला नक्षलवाद, अंधश्रध्दा, बेरोजगारी, वाढती महागाई, भ्रष्टाचार, महिला अत्याचार, बालकामगार, शैक्षणिक तसेच महाराष्ट्रातील शेतकऱयांच्या आत्महत्या, दुष्काळ अशा अनेक समस्या देशाच्या विकासाला बाधक आहेत. त्याचबरोबर दोन गटातील, जाती-धर्मातील दंगली, दलित-वंचितांवर होणारे अत्याचार या घटना लोकशाहीला काळीमा फासत आहेत. ह्या गोष्टी कुठेतरी थांबायला हव्यात. `मी प्रथमत भारतीय आणि अंतिमत भारतीय’ हे बाबासाहेबांचे वाक्य असे मनाशी पक्के बिंबविले की, मी हिंदू, मी मुस्लिम असे न म्हणता `आम्ही भारतीय’ असे छातीठोकपणे सांगावयाचा अभिमानच वाटेल.

भारताचा विकास करण्यासाठी आज टाटा-बिर्ला, तुम्हां-आम्हांपासून ते आजच्या दिवशी तिरंगा झेंडे विकून हातावर पोट भरणाऱ्या लोकांपर्यत सर्वांचाच हातभार आहे. देशात असलेली आर्थिक प्रगती सुधारण्यासाठी प्रत्येक घटक आज झटत आहे. मग तो उच्चपदावरचा शासकीय अधिकारी असो वा देहविकीय करणारी गणिका असो. ह्या साऱ्यांचेच प्रयत्न देशाला एका उंचीवर नेण्यासाठी कळत न कळत मदत करीत आहेत. इथली विविधतेने नटलेल्या परंपरा आणि प्रथेत ही संविधान हे या अखंड भारताचे अस्तित्व सिध्द करते. हीच भावना शेवटपर्यंत राहण्यासाठी आपण सर्वांनीच प्रयत्नशील असायला हवे.

शेवटी सांगायच तात्पर्य काय की, या दिवशाचे भान ठेऊन कोण्या भाकडकथा रचलेल्या सत्यनारायणावर विश्वास ठेवून पुजा घालण्यापेक्षा असंख्य क्रांतीवीरांच्या आणि देशभक्तांच्या आहुतीने मिळालेले स्वातंत्र आणि संविधानाच्या रूपाने मिळालेली लोकशाही जपणे महत्वाचे आहे. हीच खरी देशाला या प्रजासत्ताकदिनास मानवंदना ठरेल!

लेखिका मेघना सुर्वे -८४३३५०२९९४

मेघना सुर्वे

मेघना सुर्वे

Related Posts

Leave a Comment