“लेखकाचा कुत्रा” ठरला खासदार करंडक २०२३ च्या पर्व ३चा मानकरी
(दिशा महाराष्ट्राची / मुंबई- गुरुदत्त वाकदेकर)
‘चिंतामणी कलामंच आयोजित राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा – महासंग्राम खासदार करंडक २०२३ (पर्व-३)’ ह्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या अंतिम फेरीत पुणे येथील मिलाप थिएटरची ‘लेखकाचा कुत्रा’ ही एकांकिका सर्वोत्कृष्ट ठरली तर ठाण्याच्या सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ‘डोक्यात गेलंय’ ह्या एकांकिकेला सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय क्रमांक जाहीर झाला.
दक्षिण मुंबईचे खासदार मा. श्री. अरविंद भाई सावंत यांच्या सहकार्यामुळे सदर स्पर्धा यशस्वीपणे राबविण्यात येते. त्यांचे खाजगी सचिव प्रशांत इंदुलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धेचे आयोजन केले जाते. भारत पेट्रोलियम, इंडिअन ऑईल, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, एचपीसीएल, बीएसई यांचे प्रायोजकत्व तसेच राज शेट्टी, मोहन शेट्टी यांचे बहुमूल्य सहकार्य या स्पर्धेसाठी लाभले.
‘महासंग्राम खासदार करंडक २०२३ (पर्व-३)’ स्पर्धेची अंतिम फेरी १० जानेवारी २०२३ रोजी ठाण्यातील डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात संपन्न झाली. या स्पर्धेत मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, रत्नागिरी या केंद्रांमधून एकूण (१०) एकांकिका सादर झाल्या.
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – प्रणव जोशी / निलेश माने (लेखकाचा कुत्रा), सर्वोत्कृष्ट लेखक – विशाल कदम (लेखकाचा कुत्रा), सर्वोत्कृष्ट नेपथ्य – सिद्धेश नांदलस्कर (डोक्यात गेलंय !), सर्वोत्कृष्ट संगीत – निनाद म्हैसळकर (नर्मदे हर हर), सर्वोत्कृष्ट प्रकाशयोजना – श्याम चव्हाण (स्टार), सर्वोत्कृष्ट अभिनेता प्रथम – प्रणव जोशी (लेखकाचा कुत्रा), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रथम – निकिता घाग (फ्लायिंग राणी), सर्वोत्कृष्ट अभिनय उत्तेजनार्थ – अनिल आव्हाड (स्टार), सारिका देवळेकर (डोक्यात गेलंय !) आणि ज्ञानेश्वरी मंडलिक (हायब्रीड) यांना अजित भगत (दिग्दर्शक), समीर पेणकर (लेखक) आणि सुदेश म्हशिलकर (अभिनेता) या मान्यवर परीक्षकांच्या हस्ते तसेच चिंतामणी कला मंच संस्थेचे संस्थापक प्रथमेश पिंगळे आणि सचिव परेश मेस्त्री यांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात आले.
“एकांकिका स्पर्धा आयोजित करणे ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यात सर्व गोष्टी जुळवून आणाव्या लागतात. ती जबाबदारी सगळेजण पेलवू शकतात असं नाही. त्यातही फक्त ती जबाबदारी पेलवण नाही, तर तेवढी बुद्धिमत्ता देखील असावी लागते. आणि ती ह्या संस्थेने, ह्या तरूण उत्साही युवावर्गाने एवढ्या लहान वयात अत्यंत चोखपणे सांभाळली आहे.” असे गौरवोद्गार अजित भगत यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
भगत पुढे म्हणाले, मानवी भावभावनांचा खेळ आणि त्यातून होणारी जगण्याची घुसमट जेव्हा रंगमंचावर उमटते तेव्हा रसिकही या विषयांकडे एका वेगळ्या नजरेने बघताना विचार करु लागतात. विविध एकांकिकांतून असे सामाजिक विषय सादर झाले आणि उपस्थितांना एक वेगळा विचार देऊन गेले.
या स्पर्धेचे परीक्षण नाट्यसृष्टीतील नावाजलेले लेखक आणि दिग्दर्शक अजित भगत, समीर पेणकर आणि अभिनेते सुदेश म्हाशिलकर यांनी केले. स्पर्धेचे सूत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन स्पर्धा प्रमुख पूजा मोहिते यांनी केले. ‘महासंग्राम खासदार करंडक २०२३ (पर्व-३)’ यशस्वीपणे पार पडण्यासाठी अनिरुद्ध कुपटे, कल्पेश सकपाळ, दिव्या पेटकर, आकाश घडवले, रोहित जाधव, आविष्कार भालेराव, प्रणय अहेर, गौरव बोधले, इंद्रायनी देवाडिगा यांनी विशेष परिश्रम घेतले.