आज पार्ल्यात नमन प्रयोगाला होणार विक्रमी गर्दी- आयोजकांनी दिल्या रसिक प्रेक्षकांना काही महत्त्वाच्या सूचना
(दिशा महाराष्ट्राची / ठाणे- उदय दणदणे)
आज पार्ल्यात रसिक प्रेक्षकांच्या विक्रमी गर्दीत नमन लोककलेचं सादरीकरण होताना दिसेल असे आयोजकांच्या वतीने सांगण्यात आले आहे. नमन लोककलेला उंच दर्जा मिळावा, आपल्या कोकणात पूर्वजांनी जपलेली ही लोककला प्रकार आहे, नमन ही लोककला मुंबई सारख्या शहरात सादर होत असताना आयोजकांच्या वतीने रसिक प्रेक्षकांना काही महत्वपूर्ण सूचना करण्यात आल्या आहेत.रसिकांनी नाट्यगृहात येताना मद्यपान करून येऊ नये शिवाय नाट्यगृहात खाद्यपदार्थ आणू नये, आणल्यास ते जमा केले जाते,आयोजकांना त्याचा दंड बसतो, तेव्हा आजच्या आयोजनाला सर्वांचे सहकार्य राहील असे नम्र आवाहन करण्यात आले आहे.
कोकणची पारंपारिक लोककला म्हणून ” नमन” या कलेकडे पाहिले जाते. शिमगोत्सवात कोकणात बहुतांशी गावातल्या प्रत्येक वाडीत नमनाचा सुर चांगलाच गवसलेला असतो. खेळे तसेच श्री गणपती आराधना (गण) गवळण, पारंपारिक सोंगे, सामाजिक किंवा प्रबोधनाचा संदेश देणारी नाट्यकृती “फार्स” तर सोबत काल्पनिक, पौराणिक किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित वगनाट्य सादर केले जाते. ढोलकी, मृदुंग, टाळ ही पारंपरिक वाद्य आणि विविध चालबद्ध गाणी यांचा मेळ नमन लोककलेत असतो.
नमन या लोककलेत आता अनेक बदल झालेत. वेशभूषा, प्रकाश योजना, संगीत आणि वाद्यवृंद यांनी सध्याची हि नमन लोककला वेगवान आणि रंगीतसंगीत बनली आहे. आता मुंबई रंगमंचावर पहिला नमन प्रयोग पाहणे कोकणवासी व नमन प्रेक्षकांसाठी जणू पर्वणीच असते.
कोकणातील नमन लोककलेचं जतन संवर्धन होण्याबरोबरच मुंबई रंगमंचावर नमन लोककलेला बहुमान मिळवून देण्यासाठी आयोजकांचे फार मोठे योगदान आहे.
रसिक मनोरंजनासाठी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी कोकणातील एक अग्रगण्य संस्था तसेच “ऋणानुबंध पुरस्कार – २०२२” ने सन्मानित असणाऱ्या श्री पाणबुडी देवी कलामंच ( मुंबई ) तर्फे अल्पावधीत नमन कलेच्या प्रवाहात वेगळीच थाप उमटविणाऱ्या माऊली कलामंच ( मुंबई ) यांचे स्त्री पात्रांनी नटलेले मुंबईतील लोकप्रिय नमन आज गुरुवार दि. १२ जानेवारी २०२३ रोजी रात्रौ ८.३० वा. मा. दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विले पार्ले ( पूर्व )मुबंई येथे सादर होणार आहे. दरम्यान प्रदिप रेवाळे लिखित/दिग्दर्शित “पावनखिंड” ही ऐतिहासिक नाट्यकृती सादर होणार आहे. सैतानी वादळ, झुंज, पोशिंदा, सारख्या सामाजिक संदेश देणाऱ्या नाट्यकृती आजवर नाट्य- नमन दिग्दर्शक व कलाकार प्रदिप रेवाळे यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविताना दिसतात. आता पावनखिंड नाट्यकृती मधून रंगभूमीवर नेमकं काय पहावयास मिळेल? ही उत्कंठा मात्र रसिक प्रेक्षकांना लागून राहिली आहे. दर्जेदार आयोजनात होणाऱ्या ह्या नमन प्रयोगाला उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी संतोष घाणेकर- ९८३३६८९६४२, रमेश भेकरे- ९५९४३५२८६३, रमेश कोकमकर- ८८५०४२२७११ यांच्याशी संपर्क साधावा.