बेस्ट उपक्रमाच्या वीज ग्राहकांसाठी विविध देयकांचे प्रदान करण्यासाठी मुंबईतील २०१ ठिकाणी सुविधा
(दिशा महाराष्ट्राची / मुंबई- गुरुदत्त वाकदेकर)
वीज ग्राहकांना वीजदेयकाचे प्रदान सोयीस्कर व्हावे, या हेतूने बेस्ट उपक्रमाने मुंबईतील २०१ ठिकाणी विविध बँकाच्या माध्यमातून अतिरिक्त वीजदेयक भरणा केंद्रे सुरु केली आहेत. त्यापैकी ठाणे जनता सहकारी बँकेच्या ५५ शाखांमधून, स्टेट बैंक ऑफ इंडियाच्या ५२ शाखांमधून भारत देयक प्रदान प्रणालीच्या (BBPS) अंतर्गत असलेल्या बँकाच्या ४२ ठिकाणी तसेच कोटक महिंद्र शाखेच्या ३४ शाखांमधून, येस बँकेच्या १५ शाखांमधून आणि इंडस इंड बँकेच्या ३ शाखांमधून वीजदेयकाचे प्रदान करण्यासाठी बेस्ट उपक्रमाने त्यांच्या मुंबईतील सर्व शाखांना प्राधिकृत केले आहे. सदर वीजदेयक भरणा केंद्रांच्या ठिकांणांची यादी बेस्ट उपक्रमाच्या www.bestundertaking.com या वेबसाईटवर संदर्भाकरिता उपलब्ध आहे.
वीजग्राहक त्यांच्या घराजवळील किंवा कार्यालया नजिकच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या सोयीने वीजदेयकाचे प्रदान करून वेळेची बचत करु शकतात. बेस्ट उपक्रमाद्वारे सर्व वीजग्राहकांना असे आवाहन करण्यात येते की, त्यांनी या नवीन सुविधेचा लाभ घेऊन सुलभरीतीने वीजदेयकाचे प्रदान करावे त्याचप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने देखील वीजदेयकांचे प्रदान करुन वीजग्राहक प्रोत्साहनपर रकमेचा लाभ घेऊ शकतात.
त्याचबरोबर सदर ठिकाणी बेस्ट उपक्रमाच्या वीजग्राहकांना अतिरिक्त सुरक्षा ठेच देखील भरता येईल, याची सर्व वीज ग्राहकांनी नोंद घेऊन या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन बेस्ट उपक्रमाच्या जनता संपर्क अधिकारी मनोज वराडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.