सेन्सेक्स ६३७ अंकांनी कोसळला; शेअर बाजारात नफावसुली
(दिशा महाराष्ट्राची / मुंबई- गुरुदत्त वाकदेकर)
शेअर बाजारात नववर्षाच्या पहिल्या दोन दिवसांत जोरदार खरेदी झाल्यानंतर बुधवारी गुंतवणूकदारांकडून नफावसूली झाली. त्यामुळे बाजारात मोठी घसरण झाली. सेन्सेक्स ६३७ अंकांनी घसरल्यानंतर पुन्हा ६१ हजारांखाली, तर निफ्टीही १८,१०० खाली गेला. दरम्यान, क्रूड तेल दरात घसरण झाल्याने भारतीय चलन बाजारात रुपयाला १८ पैशांनी बळ मिळून ८२.३२ दर झाला.
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स बुधवारी दिवसअखेरीस ६३६.७५ अंकांनी घसरून ६०,६५७,४५ वर बंद झाला. तर निफ्टी १८९.६० अंकांनी घटून १८,०४२.९५ वर बंद झाला. दरम्यान, बुधवारी सकाळी शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्स ६१,२९४वर आणि निफ्टी १८,२३० वर उघडला होता. सेन्सेक्स वर्गवारीत टाटा स्टीलचा समभाग सर्वाधिक २.३२ टक्के घसरला. त्यानंतर पॉवरग्रीड, टाटा मोटर्स, विप्रो, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, एचडीएफसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीज यांच्या समभागात घट झाली. फक्त दोन कंपन्या मारुती सुझुकी आणि टीसीएस यांच्या समभागात ०.२२ टक्का वाढ झाली. बीएसई मिडकॅपमध्ये ०.९७ टक्का आणि स्मॉलकॅपमध्ये ०.७९ टक्का घसरण झाली, तर क्षेत्रनिहाय पाहता धातू कंपन्या २.८३ टक्के, बांधकाम १.९९ टक्के, युटिलिटी १.७४ टक्के, ऊर्जा १.७० टक्के, तेल आणि वायू १.५२ टक्के आणि वीज १.५१ टक्के घसरल्या.
आशियाई बाजारात सेऊल, शांघायमध्ये वाढ तर टोकियोमध्ये घसरण झाली. युरोपमधील बाजारात दुपारपर्यंत सकारात्मक व्यवहार सुरू होते. आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड १.८६ टक्के घटून ८०.५७ अमेरिकन डॉलर्स प्रति बैरल दर झाला, तर विदेशी गुंतवणूक संस्थांनी ६२८.०७ कोटींच्या समभागांची विक्री केली.