जागृती मित्र मंडळ, जागृतीवाडी उन्हवरे आयोजित ”जागृती चषक- २२” यंदा “केदारनाथ क्रिकेट संघ कात्रण” यांनी पटकावला
( दिशा महाराष्ट्राची / ठाणे )
रविवार दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी जागृती मित्र मंडळ, जागृतीवाडी उन्हवरे आयोजित जागृती चषक- २२ मोठ्या जल्लोषात किंग मैदान उसरगाव, दिवा येथे संपन्न झाला.
जागृती मित्र मंडळाने खूपच छान आयोजन करत अतिशय सुंदर पध्दतीने क्रिकेट स्पर्धा पार पाडली. जागृती चषक- २२ आयोजित स्पर्धेमध्ये केदारनाथ क्रिकेट क्लब, कात्रण आणि साईनाथ क्रिकेट संघ देगांव या दोन तुल्यबळ संघांमध्ये अंतीम सामना रंगला. अंतीम सामना अतिशय चूरशीचा झाला पण अखेर सुरेख खेळ करत केदारनाथ क्रिकेट संघ, कात्रण या संघांने विजेतेपद पटकावत जागृती चषक- २२ वर मोठ्या अभिमानाने आपल्या संघाचे नाव कोरले. त्याचबरोबर साईनाथ क्रिकेट संघ, देगांव हा उपविजेता संघ ठरला.
जागृती चषक-२२ या स्पर्धेतील “उत्कृष्ट फलंदाज” म्हणून केदारनाथ क्रिकेट संघ कात्रण संघांच्या पूर्ण स्पर्धेमध्ये सातत्याने कामगिरी करणार्या प्रशांत मळेकर याची तसेच “उत्कृष्ट गोलंदाज” म्हणून ह्याच संघाच्या टिच्चून गोलंदाजी करणार्या संकेत मळेकर यांची निवड करण्यात आली. स्पर्धैच्या मालिकावीरासाठी साईनाथ क्रिकेट संघ देगांव ह्या संघाच्या स्वप्निल बारे तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून जागृती क्रिकेट संघांच्या धनराज गंधेरे याची निवड करण्यात आली. संपूर्ण स्पर्धेमध्ये विजेतेपदासोबतच आणखी बरिच पदके आणि बक्षिसेही आजच्या स्पर्धेचे विजेते केदारनाथ क्रिकेट संघ कात्रण ह्या संघांने पटकावली.
आजच्या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाने सांघिक खेळ करत उपस्थित सर्व क्रिकेटरसिकांची मने जिंकली. खूप वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर आज आमच्या संघाचे जेतेपद मिळवण्याचे स्वप्न सर्व खेळाडूंच्या एकजूटीमुळे शक्य झाले असे मत केदारनाथ क्रिकेट संघांचे कर्णधार संजय मळेकर यांनी स्पष्ट केले.