इन्वेस्टमेंट
( दिशा महाराष्ट्राची )
आपल्या जीवनात इन्वेस्टमेंट ..गुंतवणूकीला खुप महत्व दिलं जातं. मुलं जन्माला आली की त्यांच्या शिक्षण, लग्न यासाठी लागणाऱ्या खर्चाचा पर्यायाने गुंतवणुकीचा विचार केला जातो. मग नंतर म्हातारपण सुरळीत जावं त्याची तजवीज म्हणून गुंतवणूक केली जाते. काही ठिकाणी तर पै पै साठवून, काटकसर करून गुंतवणूक केली जाते. मध्यमवर्गीयामध्ये तर कटाक्षाने याकडे लक्ष दिलं जातं.
दुसरीकडे दैनंदिन आयुष्यात लहान सहान आजारांकडे दुर्लक्ष केलं जातं. पौष्टिक आहाराचा तर विचारच केला जात नाही. पर्यायाने सगळा साठवलेला पैसा डॉक्टरला घालावा लागतो. म्हणजेच पै पै करून पैसा साठवतो आणि आजार झाले की dr. ला घालवत असतो. त्याऐवजी वेळीच पौष्टिक आहार आणि गुंतवणूक याचा ताळमेळ राखला गेला तर योग्य प्रमाणात गुंतवणूक आणि आरोग्यही चांगले राखले जाऊ शकते. म्हणजेच गुंतवणुकीतला काही भाग कमी करून तोच पैसा आपण नेहमीच्या पौष्टिक आहारासाठी वापरू शकतो.
त्यामुळे आरोग्य चांगले राहून पुढे साठवलेला पैसा जेणेकरून आजारपणासाठी खर्च न करता त्याचा योग्य ठिकाणी उपयोग करू शकतो.
दुसरी एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की एकदा का शरीराचे अवयव खराब झाले की कितीही खर्च केला तरीही ते पूर्ववत होऊ शकत नाही. जसे ह्रुदयाचे आजार, किडनी, हाडांचे, सांधेदुखी यांसारखे आजार कितीही पैसा खर्च केला तरी शरीराची झालेली हानी, झिज भरून निघत नाही. आयुष्यही काही वर्षांनी कमी होतं जाते. शिवाय आजारी माणसाला सहन कराव्या लागणाऱ्या वेदना या तर शब्दात व्यक्त शकत नाही. सोबतच घरातल्या बाकीच्यां माणसांचे जे हाल, जो त्रास होतो तो वेगळाच.
आजकाल रेडी टू इट चा जमाना आला आहे. ग्रेव्ही.. सूप अशा preservative गोष्टी फार मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. भले ही त्याची ठराविक दिवस validity असली तरीही ते ताज्या अन्ना एवढ नक्कीच पौष्टिक असू शकत नाही. बाहेर जाताना किंवा ऑफीसमध्ये जाताना tiffin घेऊन जात असले तरीही मधल्या वेळेच्या भुकेसाठी किंवा ऑफीसमधून निघाल्यावर हल्ली सर्रास oily junk फूड खाल्लं जातं. त्याऐवजी आपण एखादं फळ किंवा सुकामेवा, घरी बनवलेले लाडू यासारखे पदार्थ सोबत ठेवू शकतो. सेंडविच, दही, ताक, फ्रुट ज्यूस हेही उत्तम. शोधले तर अनेक चांगले पर्याय मिळतील. पण आपली पावले तर नेहमी वडापाव, मंच्युरियन वासाकडेच ओढली जातात.
हल्ली माणसाची पूर्ण लाइफस्टाइल बदलत आहे. खाण्यापिण्यासोबत झोपेच्या चुकीच्या सवयी, रात्री उशिरा झोपत असलो तरीही सकाळी मात्र वेळेवरच उठावं लागतं. त्यामुळे झोप अपुरी होते. पूर्ण झोप, योग्य पौष्टिक आहार आणि थोडासा व्यायाम किंवा चालणं या गोष्टींमध्ये काळजीपूर्वक थोडासा बदल केला तर नक्कीच आपण आजारांपासून दूर राहू शकतो. किवा कमीत कमी कंट्रोलमध्ये तरी ठेवू शकतो.
पौष्टिक अन्न थोडं महाग पडतं. पण हा जास्तीचा खर्च आणि गुंतवणूक यांचा ताळमेळ बसवून आपण नक्कीच आजारांना थोडं दूर ठेवून चांगलं जीवन जगू शकतो.
©®विनया कविटकर